गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (13:08 IST)

कोरोना : तुमच्या स्वयंपाक घरातल्या हळदीवर अमेरिकेने दावा सांगितला होता तेव्हा...

अनघा पाठक
हळद, काढा, आयुर्वेदिक औषधं सध्या परवलीचे शब्द झालेत. तुमच्यापैकी अनेक जण रोज रात्री दूध-हळद घेतल्याशिवाय झोपत नसतील.
 
आयुर्वेदाच्या परंपरागत उपचार पद्धतीत हळदीचा वापर अनेक शतकांपासून होतोय. मानवी शरीरात तीन तऱ्हेच्या प्रवृत्ती आहेत - वात,पित्त आणि कफ असं आयुर्वेद म्हणतं आणि हळद ही एकमेव औषधी वनस्पती आहे जी या तिन्ही प्रकारच्या दोषांना बरं करते. असंही मानलं जातं की, हळदीत अँटीऑक्सिडंट आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.
 
फक्त औषधी गुणधर्मच नाही, हळदीचं स्थान भारतीय स्वयंपाकघरात अढळ आहे. हळदीशिवाय ना कुठली भाजी पूर्ण होत ना वरण. शुभकार्याला हळद हवीच.
 
खेळता खेळता पोरं धडपडली तर थोडी हळद लावून पुन्हा हुंदडायला मोकळी आणि एखाद्या सुबक ठेंगणीला अजून छान दिसायचं असेल तर घरगुती लेपात चिमूटभर हळद हवीच. इतकी हळद आपल्या जगण्यात मिसळून गेलीये.
 
पण जर तुम्हाला म्हटलं या हळदीवर एकेकाळी अमेरिकेच्या एका कंपनीनी दावा सांगितला होता तर? त्याहीपुढे जाऊन जर त्यावेळेस आपल्या शास्त्रज्ञांनी हा दावा मोडून काढून खटला जिंकला नसता, तर आज आपल्या घरात हळद वापरायला कदाचित आपल्याला त्या अमेरिकन कंपनीची परवानगी घ्यावी लागली असती.
 
मग नक्की काय घडलं तेव्हा? हातातून गेलेली हळद आपल्या शास्त्रज्ञ आणि कायदेतज्ज्ञांनी कशी पुन्हा आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यात आणून ठेवली? ही त्याचीच गोष्ट.
कसं लढलं गेलं हळदीचं युद्ध?
हल्दीघाटीची लढाई तुम्ही ऐकली असेल, पण या हळदीच्या युद्धाची रम्यकथा तितकीच सुरस आहे. ती सुरु होते 1995 साली जेव्हा दोन भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी दावा केला की त्यांनी हळदीतले औषधी गुण 'शोधून काढले' आहेत.
 
सुमन के दास आणि हरिहर पी कोली तेव्हा मिसीसिपी मेडिकल सेंटरमध्ये काम करत होते. त्यांनी हळदीच्या औषधी गुणांचा दावा अमेरिकेच्या पेटंट ऑफिसमध्ये दाखल केला आणि गंमत म्हणजे 1995 साली त्यांना याचं पेटंट मिळालं.
 
याचा सरळ सरळ अर्थ होता की आता हळदीचा वापर तिच्या औषधी गुणांसाठी कोणीही करू शकणार नव्हतं. इतकंच नाही तर हळदीच्या औषधी गुणांसाठी विक्री आणि वाटप करण्याचे संपूर्ण अधिकार त्यांना गेले. अर्थातच भारतात अनेक जणांना याचा धक्का बसला.
 
पेटंटच्या नियमानुसार निसर्गात उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक गोष्टीचं पेटंट घेता येत नाही त्यामुळे हळदीच्या झाडावर, पिकावर कोणाचा अधिकार नव्हता.
 
पण हळदीची पूड, जी आपण अनंतकाळापासून स्वयंपाकात वापरतोय, त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी हे पेटंट दिलं होतं. म्हणजे तुम्ही फोडणीला हळद टाकू शकत होता, पण आयुर्वेदिक औषधांमध्ये हळदीचा वापर करणं यावर बंधन आली होती.
 
भारतातल्या अनेक शास्त्रज्ञांनी आपल्या पारंपारिक ज्ञानाची चोरी होत असल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर 1996 साली 'द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च' (CSIR) या संस्थेने अमेरिकेच्या पेटंट ऑफिसला हे पेटंट रद्द करण्याची विनंती केली. पण यासाठी हे सिद्ध करणं आवश्यक होतं की, हळदीच्या जे औषधी गुणधर्म नव्याने 'शोधून काढण्याचा' दावा या संशोधकांनी केला होता, ते भारतात आधीपासूनच ज्ञात होते.
 
आता आली का पंचाईत? म्हणजे मान्य आहे की हळद भारतीय उपचार पद्धतीत शतकानुशतकं वापरली जात होती, आजीबाईच्या बटव्याचा महत्त्वाचा भाग होती. सर्दी झाली की, आई दूध-हळद घेऊन मागे लागत होती, लचकलेल्या पायाला हळदीचा शेक दिला जात होता, पण ते सिद्ध कसं करणार?
 
कारण अमेरिकन पेटंट संस्था फक्त लिखित स्वरूपातले पुरावे मान्य करते म्हणजे या नव्या संशोधकांचं पेटंट रद्द करायला 1995 च्या आधी कोणत्यातरी लिखित स्वरूपात हळदीच्या औषधी गुणांचं वर्णन हवं. पण आपलं आयुर्वेदाचं ज्ञान मौखिक परंपरेतलं. पिढ्यानपिढ्या एकाकडून दुसऱ्याकडे झिरपलेलं.
भारतातले जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर तेव्हा CSIR चे महासंचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांची टीम झडझडून कामाला लागली. आयुर्वेदात हळदीच्या ज्या औषधी गुणांचा उल्लेख केलाय त्याचे लिखित स्वरूपातले पुरावे शोधण्याचं काम सुरू झालं.
 
उर्दू, संस्कृत, हिंदी अशा भाषांमधले प्राचीन काळी लिहिले गेलेले 32 उतारे शोधले गेले ज्यात हळदीच्या गुणांचा उल्लेख होता. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर एक प्राचीन संस्कृत लेख आणि 1953 साली इंडियन मेडिकल असोसिएशनने हळदीच्या औषधी गुणधर्मांवर प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट पुरावा म्हणून अमेरिकेच्या पेटंट ऑफिसमध्ये सबमिट करण्यात आला.
 
या संपूर्ण घटनेबद्दल डॉ माशेलकरांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. ते म्हणतात, "आम्ही संस्कृत, पाली, हिंदुस्थानी अशा अनेक भाषांमधले उतारे अनुवादित करून त्यांचा अभ्यास केला. हे नियमांनी खेळण्याचं युद्ध होतं आणि या देशांना त्यांचेच नियम पाळून हरवायचं होतं."
 
1997 साली अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसने भारताने सादर केलेले पुरावे पाहून हळदीच्या औषधी गुणांसाठी दिलेलं पेटंट 'त्यात काही नवीन नाही' असं म्हणत रद्द केलं.
 
1997 साली प्रसिद्ध झालेल्या लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या अंकात लिहिलं होतं की, 'भारताने आपल्या शतकानुशतकं चालत आलेल्या आजीबाईच्या बटव्यातल्या औषधीची स्वायत्तता राखली आणि हळदीची लढाई जिंकली.'
 
याच मुलाखतीत डॉ माशेलकर म्हणतात की, हळदीच्या पेटंटच्या लढाईने काय केलं असेल तर तिसऱ्या जगातल्या गरीब देशांना विश्वास दिला की आपल्या पारंपारिक ज्ञानाची कोणी चोरी करू शकत नाही आणि केलीच तर ती रोखण्यासाठी आपल्याला रस्ते उपलब्ध आहे. दुसरं म्हणजे आपल्या पारंपारिक ज्ञानाचा डेटाबेस तयार करणं किती महत्त्वाचं आहे हेही आपल्याला कळालं.
 
"आपलं ज्ञान आपण फक्त आपल्या डोक्यात ठेवून 'हो आम्हाला हे कधीपासून माहीत होतं' म्हणू शकत नाही. आधुनिक जगात तसंच चालत नाही, त्यांचं डॉक्युमेंटेशन लागतंच. आणि तिसरं म्हणजे, या लढाईने आम्हाला पुढच्या लढाया लढण्यासाठी बळ दिलं. हळदीची लढाई संपली म्हणून युद्ध संपलं नव्हतं. पुढे कडूनिंबाचे कीटकनाशक गुणं, बासमती तांदूळ, कारल्याचे डायबेटिजविरोधी गुणधर्म अशा कित्येक लढाया आम्हाला लढायला लागल्या. "
 
बायोपायरसी
हळदीच्या पेटंटच्या लढाईनंतर एका नव्या संकल्पनेला जन्म मिळाला. बायोपायरसी - म्हणजे जेव्हा संशोधक स्थानिक आणि पारंपारिक लोकांच्या ज्ञानाचा वापर करून त्यावर आधारित पेटंट घेतात आणि त्यातून नफा कमावतात.
 
यात स्थानिक लोकांच्या पेटंट कायद्याबद्दलच्या अज्ञानाचा, त्यांच्या ज्ञानाच्या लिखित पुराव्याच्या अभावाचा फायदा घेतला जातो. फक्त भारतच नाही, तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेल्या अनेक विकसनशील किंवा गरीब देशांच्या बाबतीत हे घडलं आहे.
 
यावर उपाय म्हणून भारताने आपल्या सगळ्या पारंपारिक ज्ञानाचं डिजिटायझेशन करण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. डॉ माशेलकर म्हणतात, "मी वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाझेशनचा (WIPO) चा अध्यक्ष असताना अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसला प्रश्न विचारला होता की, तुम्ही अशी चुकीची पेटंट का देता? त्याने आमच्यासारख्या देशांचं किती नुकसान होतं. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मजेशीर होतं. त्यांनी म्हटलं, की आमच्याकडे कोणतंही पेटंट आल्यावर आम्ही त्यातली माहिती स्कॅन करतो आणि आमच्या डेटाबेसमध्ये हे अस्तित्वात आहे का तपासतो. तुमच्या हळदीचं पेटंट आलं तेव्हाही आम्ही असंच केलं. तेव्हा अशी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती, त्यामुळे आम्ही ते पेटंट मंजूर केलं. यावरून लक्षात येतं की आपल्या ज्ञानाचं डॉक्युमेंटेश असणं किती महत्त्वाचं आहे ते."
 
हळद प्रकरणानंतर भारताने ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी (TKDL) हा प्रकल्प हाती घेतला. याचा मुख्य उद्देश आपली स्थानिक, पारंपारिक झाडं, आणि त्यांच्या पासून तयार होणारी औषधं यांची नोंद करणं हा आहे. बायोपायरसी थांबवणं आणि आपल्या ज्ञानाची बेकायदेशीर पेटंट थांबवण्याचं कामही याव्दारे केलं जातं. त्याव्यतिरिक्त देशांतर्गत रिसर्चला प्रोत्साहन देण्यांचं कामही याअंतर्गत केलं जातं.