राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पुढे
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख पार झाला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे २४ तासांत कोरोनाचे १ हजार ३७२ रुग्ण आढळले असून ९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५ हजार ३५७ झाला असून मृतांचा आकडा २ हजार ४२ झाला आहे. तसेच २४ तासांत ९४३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २५ हजार १५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
९० मृत रुग्णांपैकी ६५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ६५ रुग्ण पुरुष आणि २५ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ६ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, ४६ जणांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ३८ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ८०५ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३९ हजार ९८८ वर पोहोचली आहे.
राज्यानं कोरोना बाधितांच्या बाबतीत १ लाखाचा टप्पा ओलांडला. यातील निम्माहून अधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या ५४ हजारांच्या पुढे आहे. त्या खालोखाल रुग्णसंख्या ठाणे आणि पुण्यात आहे. या शहरांमधील रुग्णसंख्या अनुक्रमे १५ हजार आणि १० हजारांहून अधिक आहे. औरंगाबाद, पालघर, नाशिक, रायगड, सोलापूर, जळगाव जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या हजारपेक्षा अधिक आहे.
देशातील एक तृतीयांश कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास तीन लाख इतका आहे. महाराष्ट्रपाठोपाठ तमिळनाडूचा क्रमांक लागतो. तमिळनाडूत कोरोनाचे ४० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यानंतर दिल्ली (३४ हजार), गुजरात (२२ हजार), उत्तर प्रदेश (१२ हजार) यांचा क्रमांक लागतो.