सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By

दत्ताचे 24 गुरु, त्यांपासून काय बोध घेतला जाणून घ्या

दत्ताचे 24 गुरु, गुण समजून घ्या
 
१. पृथ्वी
गुण: सहनशीलता
पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे.
 
२. वायू
गुण: विरक्ती
वारा थांबत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नये.
 
३. आकाश
गुण: अचलता
आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा, निःसंग, अभेद, निर्मळ, निर्विवाद, अलिप्त आणि अचल आहे.
 
४. पाणी
गुण: स्नेहभाव
मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे. कोणाचाही पक्षपात करू नये.
 
५. अग्नी
गुण: पवित्रता
मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे.
 
६. चंद्र
गुण: विकार बाधा न होणे
ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, त्याप्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत.
 
७. सूर्य
गुण: नि:पक्षपातीपणा
सूर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्यांचा लाभ द्यावा, पण त्याचा अभिमान बाळगू नये.
 
८. कपोत
गुण: अलिप्तता
जसा बहिरीससाणा कबुतराला परिवारासहित भक्षण करतो, तसे जो संसारात आसक्त राहणार्‍याचा काळ भक्षण करतो. यास्तव मुमुक्षूने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे.
 
९. अजगर
गुण: निर्भयता
अजगराप्रमाणे मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल, ते भक्षण करून, प्रसंगी काही मिळाले नाही, तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे.
 
१०. समुद्र
गुण: परोपकारी
समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये, सदैव आनंदी असावे.
 
११. पतंग
गुण: मोह त्याग
ज्या प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो त्याचप्रमाणे स्त्री विलासाकरता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो.
 
१२. मधमाशी आणि मधुहा
गुण: धनसंचय त्याग
ज्या प्रकारे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतू त्याचा उपभोग करू पात नाही त्याचप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते, हा उपदेश घेऊन द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे.
मधुहा
ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्यावाचून मधाची प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे साधक पुरुषाने अधिक प्रपंचात न पडता ईश्वरप्राप्तीच्या उद्योगाकडे वेळेचा उपयोग करावा. 
 
१३. गजेंद्र (हत्ती)
गुण: काम विकारावर वश करणे
हत्ती बलवान असला, तरी त्यास वश करण्यासाठी काष्ठाची एक हत्तिणीमुळे तो खड्ड्यात पडतो. त्याचप्रमाणे स्त्रीसुखास भुलणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो.
 
१४. भ्रमर
गुण: विषयांत न अडकणे
सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.
 
१५. मृग
गुण: मोह त्याग
पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही, असा कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये.
 
१६. मत्स्य
गुण: चवीत न गुंतणे
लोखंडाच्या गळाल्या बांधलेला मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे मनुष्य जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म-मरणरूपी भोवर्‍यात गोते खात राहतो.
 
१७. पिंगला वेश्या
गुण: आशेचा त्याग
एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले. अंगी आशा प्रबल असल्याने सुखनिद्रा लागत नाही. म्हणून आशेचा त्याग करणार्‍याला संसारात एकही दुःख बाधत नाही.
 
१८. टिटवी
गुण: उपाधीचा त्याग करणे
चोचीत मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात, तिला टोचा मारतात, पाठलाग करतात. शेवटी ती मासा टाकून देते. तोच एक घारी त्याला पकडले आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणार्‍या घारीचा पिच्छा पुरवू लागतात. पण आता टिटवी निश्चिंत होऊन जाते. त्याच प्रकारे संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे.
 
१९. बालक
गुण: आनंदी
जग हे प्रारब्धाधीन समजून, मानापमानाचा विचार न करता, सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा.
 
२०. कंकण
गुण: एकान्तवास साधणे
दोन बांगड्या एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. त्या प्रकारे दोन माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र वास करत असल्यास कलह होतो. म्हणून ध्यानयोगादी करणार्‍याने निर्जन प्रदेश शोधून एकटे राहावे.
 
२१. शरकर्ता (कारागीर)
गुण: एकाग्रता
एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजतगाजत थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तेव्हा कारागीर म्हणाला की मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही. या प्रकारेच मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे.
 
२२. सर्प
गुण: सावधता
दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत, सावधपणे फिरतात, वाटेल तिथे राहतात, अपकार केल्यावाचून कोप करत नाहीत. त्याप्रमाणे दोन बुद्धिमत्तांनी कधी एकत्र फिरू नये, भांडू नये, परिमित भाषण करावे, स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहावे. घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोभ जडतो.
 
२३. कोळी
गुण: ईश्वरेच्छा
ज्या प्रकारे कोळी घर बनवतो मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छामात्रेकरून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो. म्हणून जगातील घटनांना महत्त्व देऊ नये.
 
२४. भ्रमरकीट
गुण: ईश्वरस्वरुपता
भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणाने परमात्वतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो.