रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By वेबदुनिया|

श्रीदत्ताचे जन्मस्थान 'दत्तशिखर'

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गांव आहे. माहूर गांवाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्रीरेणुकादेवीचे स्थान असून दुसर्‍या शिखरावर श्री दत्ताचा जन्म झाला आहे. म्हणूनच माहूरगडाप्रमाणे हे दत्तक्षेत्रही प्रसिद्ध आहे. उंच पर्वतावर श्रीदत्तात्रेयाचे मंदिर आहे. मूळ मंदिर मुकुंद भारती यांनी इ.सन 1219 मध्ये बांधले. तेथे दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. सुप्रसिद्ध दत्तोपासक दासोपंत एक तपाहून अधिक काळ येथे राहिले. त्यानी तेथे तप:साधना केली. माहूर हे महानुभाव संप्रदायाचे एक प्रमुख क्षेत्र आहे. दत्तात्रेय हे या संप्रदायाचे मूळ आहे, असे मानले जाते. दत्तजयंती आणि गुरू पौर्णिमेला येथे भावीक मोठ्या संख्येने येत असतात. 

देवीच्या साडेतीन पीठांपैकी माहूरच्या रेणुका देवीचे पूर्ण शक्तीपीठ आहे. रेणुकादेवीला एकवीरादेवी असेही म्हणतात. माहूर गडावर दत्तात्रेयांचा जन्म झाला. तेथेच दत्तात्रेयांचे वास्तव्य एका शिखरावर असल्याने दत्तभक्तांच्याही आवडीचे हे स्थान आहे.

रेणुकेच्या शिखरावरुन पूर्वेकडे दोन-तीन मैलांच्या दत्तशिखर आहे. यवतमाळ, नांदेड येथून खाजगी गाडया व बसनने दत्तस्थानापर्यंत जाता येते. यवतामाळकडून आल्यास आधी माहूर हे गाव लागते. नांदेड- किनवट मार्गाने आल्यास आधी दत्तशिखर लागते.

येथील दत्तमंदिर हे प्राचीन असून जुन्या बांधणीचे आहे. श्रीदत्ताचे मुख्य दर्शन एका खोल अशा अंधार्‍या खोलीतून केले जाते. या अंधार्‍या खोलीत दत्तांच्या पादूका व शिवलिंग आहे. मंदिरात सती अनसूया, विठ्‍ठल, रखूमाई या देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात श्रीलक्ष्मी- नारायणाचे मंदिर असून त्याच्या मागच्या बाजूस दत्ताचे धूनाधरही आहे. दत्त शिखरापासून एक मैल अंतरावर सती अनसूया मातेचे शिखर आहे. याच ठिकाणी दत्तात्रेयांचा अवतार झाला आहे, असे म्हणतात.

रेणूका मातेचे दर्शन घेणारा भावीक दत्तशिखरावर आल्याशिवाय राहत नाही. माहुर गावापासून येथे येण्यासाठी नियमीत बसेस चालतात. काही‍ दिवसांपूर्वी येथे नवीन पुलाचे बांधकाम झाल्याने एस.टी. बसेस महाराष्ट्रातील सर्व भागातून थेट माहूर गडावर येतात. खाजगी मोटारी थेट गडावर मातेच्या व दत्ताच्या पायथ्याशी जातात.

महाराष्ट्रातील प्रमुख श्रीदत्तमंदिरे  
 महाराष्ट्रात श्रीदत्ताची बरीच मंदिरे आहेत. काही महत्त्वांची मंदिरे पुढील प्रमाणे- 
पीठापू
श्री श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदत्तात्रेयाचे पहिले अवतार मानला जातो. पीठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. श्रीदत्तजयंतीला तेथे मोठी यात्रा भरत असते..

लाड कारंजा
लाड कारंजा हे श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. श्रीनरसिंह सरस्वती हा श्रीदत्ताचा दुसरा अवतार मानला जातो. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ या शहरांच्या मध्यावर हे ठिकाण आहे.

औदुंबर
कृष्णाकाठचे औदुंबर हे श्रीदत्तभक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे. हे एक चरणतीर्थ आहे. श्रीनरसिंह सरस्वतींच्या पादुका तेथे आहेत. औदुंबर येथे श्रीदत्ताला प्रिय असलेला औदुंबर वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतो. संत एकनाथ, जनार्दनस्वामी यांचे वास्तव्य काही काळ औदुंबर येथे होते.

नृसिंहवाडी  
कृष्णा-पंचगंगा नदींनी पवित्र झालेली नृसिंहवाडी ही तर श्रीसद्‍गुरूंची राजधानी म्हणजेच तपश्चयेर्ची महत्त्वाची भूमी होती. तेथे नरसिंह दत्तमहाराजानी औदुंबराच्या वृक्षाखाली तपानुष्ठान केले. हे जागृत देवस्थान मानले जाते.

अक्कलकोट
श्रीदत्त संप्रदायिकांचे परम पवित्र असे हे स्थान. श्री अक्कलकोटस्वामींची ही पवित्र भूमी म्हणून याचे माहात्म्य मोठे आहे. तेथे एका वटवृक्षाखाली स्वामींच्या पवित्र पादुकांचे एक सुंदर मंदिर आहे.

चौल
च्यवन ऋषींच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. चौल येथील दत्तमंदिर प्रसिद्ध आहे. मुख्य मंदिराच्या जवळच टेकडीच्या पायथ्याशी एक तळे आहे. चौल हे गाव ऐतिहासिक आहे.

माणिकनगर
ही माणिकप्रभूंची तपश्चर्या भूमी. अनेक दत्तभक्त माणिकनगर येथे माणिकप्रभूंच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

नाशिक
नाशिक येथील एकमुखी दत्त प्रसिद्ध आहे. प्रति गाणगापूर म्हणून या परिसरास ओळखले जाते.