सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय २९ वा

अध्याय एकोणतीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
 
रामकथा परम पावन ॥ सुधारसाहूनि गोड गहन ॥ देव करिती सुधारसपान ॥ परी कल्पांतीं मरण न चुकेचि ॥१॥
अमृत गोड लागे रसनेसी ॥ ते तृप्त न करी कर्णनेत्रांसी ॥ रामकथा नव्हे तैसी ॥ सर्व इंद्रियांसी तृप्त करी ॥२॥
सुधारस सेवितां मद चढे ॥ कथामृतें मद मत्सर झडे ॥ त्रिविधतापदुःख सांकडें ॥ सहसा न पडे सद्भक्तां ॥३॥
कथामृत करितां श्रवण ॥ जे करणार सुधारसपान ॥ त्यांचिये मस्तकीं ठेवूनि चरण ॥ कथा नेत पलीकडे ॥४॥
अमृत सदा इंद्र भक्षित ॥ सर्व लोकी रामकथामृत ॥ स्वर्गी राहणार समस्त ॥ सदा इच्छिती रामकथा ॥५॥
ते कथासुधारसपान ॥ श्रवण करा तुम्हीं भक्तजन ॥ गतकथाध्यायीं रावणी येऊन ॥ रणमंडळीं उभा ठाकला ॥६॥
घेऊनि शिळा तरुवर ॥ वर्षों लागले रीस वानर ॥ सेनामुखीं रुद्रावतार ॥ उभा देखिला इंद्रजितें ॥७॥
परम दुरात्मा तो रावणी ॥ अंतरीं कापट्यविद्या स्मरूनि ॥ कृत्रिम जानकी निर्मूनी ॥ रथावरी बैसविली ॥८॥
तप्तकांचनर्णी ते वेल्हाळ ॥ वस्त्राभरणीं मंडित सकळ ॥ मुखशशांक अति निर्मळ ॥ विराजे सर्व लक्षणीं ॥९॥
हें कृत्रिमरूप निर्मिलें ॥ जें कोणासी कदा न कळे ॥ बहु विचक्षण जरी आले ॥ तेही साच मानिती ॥१०॥
असो कृत्रिमरूप निर्मोनी ॥ इंद्रजित म्हणे मारुतीलागुनी ॥ अरे पाहा हे जनकनंदिनी ॥ तुझी स्वामिणी कीं वानरा ॥११॥
हे रामाची अंगना होय ॥ इणेंचि आमुचा केला कुळक्षय ॥ त्रेतायुगामाजी पाहें ॥ कृत्या केवळ जन्मली ॥१२॥
पंचवटीपासून साचार ॥ इजकरितां संहारिले असुर ॥ प्रहस्त अतिकाय महोदर ॥ देवांतक नरांतक ॥१३॥
कुंभकर्णादि यामिनीचर ॥ इनेंचि ते ग्रासिले समग्र ॥ हे अत्यंत सुंदर ॥ म्हणोनि रायें आणिली ॥१४॥
वृंदावनफळ दिसे सुढाळ ॥ फणस म्हणोनि घेतले कनकफळ ॥ मुक्तहार म्हणोनि शंखपाळ ॥ सर्प हातीं धरियेला ॥१५॥
कीं रत्नें सुंदर म्हणोन ॥ खदिरांगार घेतलें भरून ॥ कीं नक्षत्रबिंबे जळी देखोन ॥ व्यर्थ जाळें पसरिलें ॥१६॥
इयेतें लंकेसी आणून ॥ व्यर्थ कष्टला दशानन ॥ हे पापिणी कलहा कारण ॥ राक्षसवन जाळिलें ॥१७॥
ऐसी ही परम चांडाळीण ॥ इसी काय व्यर्थ ठेवून ॥ तत्काळ शस्त्र काढून ॥ कृत्रिमसीता वधियेली ॥१८॥
सीतेचे शिर खंडून ॥ दाखवी मारुतीलागून ॥ म्हणे रामासी सांग जाऊन ॥ जाईं उठून अयोध्ये ॥१९॥
ऐसें बोलून इंद्रजित ॥ निकुंभिलेसी गेला त्वरित ॥ हवन आरंभिलें अद्भुत ॥ अक्षय्य रथ काढावया ॥२०॥
असो इकडे अंजनीनंदन ॥ जानकी वधिली हे देखून ॥ वक्षस्थळ बडवून ॥ मूर्च्छित पडे धरणीये ॥२१॥
घटिका एकपर्यंत ॥ निचेष्टित पडिला हनुमंत ॥ सावध होऊनि किंचित ॥ शोक करिता जाहला ॥२२॥
स्फुंदस्फुंदोनि रडे मारुती ॥ आतां काय सांगू मी राघवाप्रती ॥ सीतेकारणें अहोरात्री ॥ स्वामी माझा कष्टतसे ॥२३॥
सीतेचें स्वरूप म्हणोन ॥ हृदयी धरी वृक्ष पाषाण ॥ मित्रसुत मित्र करून ॥ शक्रसुत वधियेला ॥२४॥
प्रयत्न करूनियां बहुत ॥ म्यां सीता शोधिली यथार्थ ॥ वार्ता सांगोनि रघुनाथ ॥ सुखी केला ते काळीं ॥२५॥
तैंपासोनि सीताशोकहरण ॥ मज नाम ठेवी रघुनंदन ॥ तो हा मी समाचार घेऊन ॥ कैसा जाऊं स्वामीपासीं ॥२६॥
शरजाळीं पाडिलें शक्रजितें ॥ तैं घेऊन आलों द्रोणपर्वतातें ॥ संतोषोनि रघुनाथें ॥ मज बहुत गौरविलें ॥२७॥
ते कष्ट सर्व गेले व्यर्थ ॥ मी अभागी होय यथार्थ ॥ वार्ता ऐकतां रघुनाथ ॥ काय करील कळेना ॥२८॥
म्यां पूर्वी सांगितलें रघुनाथा ॥ सुखी आहे ननकदुहिता ॥ आतां जानकी वधियेली ही वार्ता ॥ रामचंद्रासी केवीं सांगूं ॥२९॥
जेणें पूर्वीं दिधलें बहुत धन ॥ तेणेंचि पुढें घेतलें हिरून ॥ जेणें केलें बहुत पाळण ॥ तेणेंचि शिर छेदिलें ॥३०॥
सुख दिधलें जन्मवरी ॥ तेणेंचि लोटिलें दुःखसमुद्रीं ॥ जळत घरांतून काढिले बाहेरी ॥ तेणेंचि शिर छेदिलें ॥३१॥
तृषाक्रांत प्राणी पडियेला ॥ तया जीवन देऊन वांचविला ॥ सवेंच त्याचा वध केला ॥ शस्त्र घेऊनि स्वहस्ते ॥३२॥
तैसा मी रामाप्रति जाऊन ॥ कैसें सांगू हे वर्तमान ॥ मध्येंच गोष्टी ठेवितां झांकोन ॥ तरी दूषण लागतसे ॥३३॥
ऐसें विचारी हनुमंत ॥ सत्वर आला जेथें रघुनाथ ॥ अधोवदनें स्फुंदत ॥ भयभयीत कपी झाले ॥३४॥
गजबजिले रामलक्ष्मण ॥ मारुतीस पुसती वर्तमान ॥ हनुमंत वक्षस्थळ बडवून ॥ आक्रंदोनि सांगतसे ॥३५॥
जानकी आणूनि रणांगणीं ॥ इंद्रजितें टाकिली वधोनी ॥ऐसें ऐकतां चापपाणि ॥ दुःखेंकरूनि उचंबळे ॥३६॥
आकर्णनयन चांगले ॥ ते अश्रु स्रवों लागले ॥ हाहाःकार ते वेळे ॥ रामसेनेंत जाहला ॥३७॥
मंगळरूप तो रघुनंदन ॥ मंगळभगिनीचे आठवूनि गुण ॥ विलाप करितां लक्ष्मण ॥ येऊनि चरणीं लागला ॥३८॥
आकर्णनयन चांगले ॥ परब्रह्म मूस ओतले ॥ त्या जगद्वंद्याचीं चरणकमलें ॥ सौमित्रबाळें वंदिली ॥३९॥
म्हणे ब्रह्मांडनायका रघुपति ॥ मिथ्या मायेची कायसी खंती ॥ आकारा आले ते पुढती ॥ नाश पावेल निर्धारे ॥४०॥
विवेकवज्र घेऊन ॥ मोहपर्वत करावा चूर्ण ॥ सद्रुरुवसिष्ठें शिकवण ॥ हेंच पूर्वीं शिकविली ॥४१॥
तूं देवाधिदेव परब्रह्म ॥ अज अजित आत्माराम ॥ तुझे मायेचा हा संभ्रम ॥ मिथ्यामय लटिकाचि ॥४२॥
जानकी पावली मरण ॥ तुज कोठें जाईल टाकोन ॥ दीपासी प्रभा वोसंडोन ॥ जाईल हें तों घडेना ॥४३॥
कनकासी टाकूनि कांती ॥ जाऊन राहील केउती ॥ रत्नांस सांडूनि दीप्ती ॥ कोठें परती जाईल ॥४४॥
अनादि तूं तिचा नाथ ॥ तुजचि ते पावेल यथार्थ ॥ जैसा पार्वतीनें कैलासनाथ ॥ पुनः उपजोनि वरियेला ॥४५॥
आतां यावरी ऐसें करीन । सहपरिवारें वधीन रावण ॥ बंदीचें देव सोडवीन ॥ बिभीषण स्थापीन लंकेसी ॥४६॥
ऐसें बोलतां लक्ष्मण ॥ राम पाहे अधोवदन ॥ चिंताक्रांत वानरगण ॥ तटस्थरूप पाहती ॥४७॥
तो बिभीषणाचे दोघे प्रधान ॥ आले जानकीची शुद्धि घेऊन ॥ हांसतचि बिभीषण ॥ आला रामास सांगावया ॥४८॥
म्हणे जगद्वंद्या चापपाणि ॥ सुखी आहे जनकनंदिनी ॥ म्यां लंकेसी दूत पाठवूनि ॥ समाचार आतां आणविला ॥४९॥
इंद्रजित परम कपटी ॥ लटिकीच वधिली सीता गोरटी ॥ हनुमंत निष्कपट पोटीं ॥ त्यासी सत्यचि वाटलें ॥५०॥
 
अध्याय एकोणतीसावा - श्लोक ५१ ते १००
ऐकतां बिभीषणाचें वचन ॥ जयजयकारें गर्जती कपिगण ॥ वदनें टवटवलीं पूर्ण ॥ आनंद गगनीं न समाये ॥५१॥
उदयाचळीं उगवे गभस्ति ॥ एकदांचि निघे तमाची बुंथि ॥ तैसी जाहली दुःखनिवृत्ति ॥ बिभीषणें वार्ता सांगतां ॥५२॥
कीं हृदयी प्रगटतां वेदांतज्ञान ॥ सहपरिवारें जाय अज्ञान ॥ कीं गृहस्वामी उठतां देखोन ॥ तस्कर पळती अवघेचि ॥५३॥
कीं क्षुधित पीडिला अन्नाविण ॥ तों क्षीराब्धि पुढें आला धांवोन ॥ कीं वारणें गांजितां पंचानन ॥ हांक फोडोनि धांविन्नला ॥५४॥
रोगें व्यापिला बहुवस ॥ तों वैद्य पाजिला सुधारस ॥ तैसें बिभीषण बोलतां रामास ॥ मिथ्या दुःख वितळलें ॥५५॥
बिभीषणवचन पौर्णिमा थोर ॥ कळायुक्त दिसे रामचंद्र ॥ उचंबळला कपिसमुद्र ॥ सुखभरतें दाटलें ॥५६॥
बिभीषणास म्हणे रघुनंदन ॥ तुझे उपकारा मी नव्हें उत्तीर्ण ॥ क्षणक्षणां आम्हांलागून ॥ सांभाळिसी प्राणसखया ॥५७॥
असो श्रीरामाचिये कर्णी ॥ बिभीषण सांगे तेचि क्षणीं ॥ इंद्रजितें निकुंभिलाभुवनीं ॥ कपटहोम आरंभिला ॥५८॥
होमधूमें कोंदलें निराळ ॥ होमाहुतीचें दाटले परिमळ ॥ अग्नींतून रथ तेजाळ ॥ अर्ध बाहेर निघाला ॥५९॥
अश्व सारथि धनुष्य बाण ॥ यांसह तो निघे स्यंदन ॥ कार्य सिद्धि जाहलिया पूर्ण ॥ मग रावणी नाटोपे ॥६०॥
तो चार वेळां येऊन ॥ रणीं गेला जय घेऊन ॥ आतां तो होम विध्वंसून ॥ आधीं सत्वर टाकावा ॥६१॥
विलंब करितांचि येथ ॥ तिकडे निघेल अवघा रथ ॥ रथ निघाल्या इंद्रजित ॥ कालत्रयीं नाटोपे ॥६२॥
द्वादश वर्षें निराहारी ॥ असेल जो ब्रह्मचारी ॥ तयाचेनि हातें शक्रारि ॥ मरेल ऐसें भविष्य असे ॥६३॥
ऐसें ऐकतां रघुनंदन ॥ सौमित्राकडे पाहे विलोकून ॥ धनुष्य चढवूनि गुण ॥ वेगें लक्ष्मण उभा ठाकला ॥६४॥
बंधूची बाल्यदशा देखोनि ॥ स्नेहभरित होय चापपाणि ॥ अनुजासी हृदयी कवळूनि ॥ मंत्र कर्णीं सांगतसे ॥६५॥
कोण्या मंत्रें कोण अस्त्र ॥ कोण्या समयीं प्रेरावें कोणते शस्त्र ॥ तें तें सर्वही राजीवनेत्र ॥ सौमित्रासी देता जाहला ॥६६॥
मस्तकीं ठेविला कृपाहस्त ॥ म्हणे सत्वर वधोनि इंद्रजित ॥ जयलाभ घेऊनि अद्भुत ॥ कल्याणरूप येइंजे ॥६७॥
सवें मारुती बिभीषण ॥ परम बुद्धिमंत कळाप्रवीण ॥ रामें धरूनि लक्ष्मण ॥ तयांचे हातीं दिधला ॥६८॥
नळ नीळ जांबुवंत अंगद ॥ गवय गवाक्ष ऋषभ मैंद ॥ पनस केसरी दधिमुख द्विविद ॥ वीर अगाध निघाले ॥६९॥
आणि असंख्य निघती वानरगण ॥ पुढें मार्ग दावी बिभीषण ॥ निकुंभिला गड परम कठिण ॥ लंकेहूनि अगाध ॥७०॥
अंगदस्कंधी लक्ष्मण ॥ जैसा गजेंद्रावरी सहस्रनयन ॥ पुढें कडे लागले कठिण ॥ मग बिभीषण बोलत ॥७१॥
म्हणे घ्या अवघे उड्डाण ॥ निकुंभिला दुर्ग ओलांडून ॥ शक्रजित करी हवन ॥ आधीं विध्वंसोनि टाका तें ॥७२॥
मग निराळपंथें ते वेळे ॥ निकुंभिलेंत प्रवेशले ॥ तो सैन्यदुर्ग सबळ बळें ॥ सात भोंवते रक्षिती ॥७३॥
वृषभ गवय हनुमंत ॥ घेऊनियां शिळा पर्वत ॥ जेथे हवन करी इंद्रजित ॥त्या विवरांत प्रवेशले ॥७४॥
तों सभोंवती भूतें रक्षिती ॥ तितुकीं झोडून पळवी मारुति ॥ तंव तो इंद्रजित पापमूर्ति ॥ वज्रासनीं बैसला ॥७५॥
रक्तोदकें स्नान करूनि ॥ रक्तवस्त्रें नेसला रावणी ॥ सप्त प्रेते पसरूनि ॥ त्यावरी आसन घातले ॥७६॥
पिंगट जटा मोकळ्या दिसती ॥ रक्तें थबथबां गळती ॥ नेत्र लावूनि आहुती ॥ टाकीतसे त्वरेनें ॥७७॥
ब्राह्मणांची शिरें बहुत ॥ त्यांचा जवळी पडिला पर्वत ॥ अस्तिमाळां गळां डोलत ॥ उरग मृत शिरीं वेष्टिले ॥७८॥
द्विजदंतांच्या लाह्या करूनि ॥ साजुक रक्त मांस घाली हवनीं ॥ रथ निघाला अग्नींतूनि ॥ तरणीहूनि तेजागळा ॥७९॥
प्राप्त होतां दिव्य निधान ॥ जैसें अभाग्यावरी पडे विघ्न ॥ तैसें हनुमंतें पर्वत टाकून ॥ होमकुंड विध्वंसिलें ॥८०॥
अग्नि चहूंकडे विखरत ॥ गेलें परतोनि आराध्यदैवत ॥ अग्नीनें गिळिला माघारीं रथ ॥ परम अनर्थ जाहला ॥८१॥
इंद्रजिताच्या पृष्ठीवरी ॥ ऋषभ देहधर्मातें करी ॥ यज्ञपात्रें फोडोनि झडकरी ॥ होमद्रव्यें उलंडीत ॥८२॥
गजर कानीं पडतां बहुत ॥ सावध जाहला शक्रजित ॥ देखोनियां तें विपरीत ॥ परम दुश्चित ते वेळे ॥८३॥
म्हणे दैवत क्षोभलें सबळ ॥ कैसी वैरियांनी साधिली वेळ ॥ माझें आयुष्यसिंधुजळ ॥ आजपासूनि आटलें ॥८४॥
वानर तेथें गेलें समस्त ॥ परम कोपला इंद्रजित ॥ वेगें आणूनि दिव्य रथ ॥ वरी आरूढें ते काळीं ॥८५॥
अद्भुत दळ घेऊनि ते वेळां ॥ निकुंभिलेबाहेर युद्धासी आला ॥ तों कपिभारेंसी उभा ठाकला ॥ सौमित्र देखिला शक्रजितें ॥८६॥
भगणांमाजी रोहिणीवर ॥ कीं किरणचक्रीं दिवाकर ॥ तैसा वानरांत सौमित्र वीर ॥ युद्धासी सिद्ध उभा असे ॥८७॥
जैसा कुळाचळांत मेरु अद्भुत ॥ तैसा रथारूढ दिसे इंद्रजित ॥ तों राक्षसदळ लोटलें समस्त ॥ वानरांवरी ते काळीं ॥८८॥
शिळा द्रुम पर्वत घेऊनी ॥ कपी धांवले तेक्षणीं ॥ राक्षसदळा होता आटणी ॥ प्रेतें अवनीं पडताती ॥८९॥
शूल असिलता शक्ति ॥ हीं आयुधें घेऊनि हातीं ॥ वानरांसी असुर खोंचिती ॥ कपी पडती विकळ तेणें ॥९०॥
तों नळ नीळ जांबुवंत ॥ प्रतापरुद्र अंजनीसुत ॥ यांचा मार अति अद्भुत ॥ आटले बहुत निशाचर ॥९१॥
अरिप्रताप देखोनि अत्यद्भुत ॥ परम क्रोधावला इंद्रजित ॥ होम विध्वंसिला त्या विषादें बहुत ॥ दांत खात करकरां ॥९२॥
लातेनें ताडितां उरग ॥ कीं खवळे शुंडा पिळितां मातंग ॥ कीं नासिकीं ताडितां सवेग ॥ महाव्याघ्र जेवीं खवळे ॥९३॥
कीं महातपस्वी अपमानिला ॥ कीं हुताशन घृतें शिंपिला ॥ तैसा इंद्रजित क्षोभला ॥ वेगें लोटिला रथ पुढें ॥९४॥
दृष्टीं देखतां वारण ॥ खवळे जैसा पंचानन ॥ तैसा क्षोभला लक्ष्मण ॥ जो भोगींद्र पूर्ण अवतरला ॥९५॥
विद्युत्प्राय चाप चढवून ॥ त्यावरी योजिला दिव्य बाण ॥ सिंहनादें गर्जोन ॥ रामानुज सरसावला ॥९६॥
मांडिलें तेव्हां वज्रठाण ॥ कौतुक पाहती सुरगण ॥ सौमित्रासी होवो कल्याण ॥ हेंच देव चिंतिती ॥९७॥
इंद्रजित म्हणे सौमित्रासी ॥ मजसी युद्ध करूं पाहसी ॥ जैसा हरिण शार्दूलासी ॥ झोंबी घ्यावया पातला ॥९८॥
सुपर्णावरी धांवे अळिका ॥ कीं मातंगावरी गोवत्स देखा ॥ कीं बळें धांवे पिपीलिका ॥ कनकाचळ उचलावया ॥९९॥
ऊर्णनाभी भावी मनीं ॥ स्वतंतूंनीं झांकीन ॥ मेदिनी ॥ वृश्चिक नांगी उभारूनी ॥ ताडीन म्हणे खदिरांगारा ॥१००॥
 
अध्याय एकोणतीसावा - श्लोक १०१ ते १५०
सूर्य जिकीन म्हणे खद्योत ॥ मक्षिका भूगोळ हालवूं इच्छीत ॥ वडवानळ धगधगित ॥ पतंग धांवे ग्रासावया ॥१॥
मजसी तैसा युद्धासी ॥ मानववंशी तूं आलासी ॥ माझे बाण केवीं साहसी ॥ समरांगणीं न कळे हें ॥२॥
यावरी बोले लक्ष्मण ॥ तुझें दृष्टीसी दिसतों लहान ॥ भस्में आच्छादिला हुताशन ॥ क्षणें कानन जाळील ॥३॥
दृष्टीसी न भरे केसरी ॥ परी क्षणें महागज विदारी ॥ वज्र धाकुटें परि करी ॥ चूर्ण सकळ नगांचें ॥४॥
खुजट दिसे वामन ॥ परी ढेंगेंत आटिलें त्रिभुवन ॥ घटोद्भवाची तनू सान ॥ परी सागर संपूर्ण प्राशिला ॥५॥
चिमणाच दिसे चंडांश ॥ परी मेदिनीभरी प्रकाशी ॥ तेवीं नरवीर राघवेश ॥ त्याचा दास मी असे ॥६॥
तुज आजि मी समरांगणीं ॥ खंड विखंड करीन बाणीं ॥ इंद्रादि देव पाहती गगनीं ॥ मनोरथ पुरवीन तयांचे ॥७॥
ऐकतां शोभला शक्रारि ॥ दिव्य बाण ते अवसरीं ॥ सोडी रामानुजावरी ॥ प्रळय चपळेसारिखा ॥८॥
जैसें सद्विवेकेंकरून ॥ ज्ञानी क्रोध टाकी खंडोन ॥ तैसा सौमित्रें तोडिला बाण ॥ निजशरेंकरूनियां ॥९॥
परम क्षोभला इंद्रजित ॥ बाणांचा पर्जन्य पाडित ॥ एके बाणेंच सुमित्रासुत ॥ पिष्ट करूनि टाकीतसे ॥११०॥
उगवतां वासरमणी ॥ भगणें लोपती जेवीं गगनीं ॥ कीं जलदजाल तत्क्षणीं ॥ प्रभंजन विध्वंसी ॥११॥
बोध प्रकटतां अंतरीं ॥ बहुत पातकें संहारी ॥ कीं आत्मज्ञान जेवी हरी ॥ संसारदुःखें अनेक ॥१२॥
तैसे इंद्रजिताचे शर पाहीं ॥ जो जनकाचा कनिष्ठ जावई ॥ बाण सर्व छेदूनि लवलाही ॥ पाडितसे एकीकडे ॥१३॥
सौमित्र सोडी एक शर ॥ त्यापासूनि बाण निघती अपार ॥ जैसा एकुलता एक पुत्र ॥ वाढे संतति बहु त्याची ॥१४॥
कीं तैलबिंदु जळीं पडतां ॥ पसरे चहूंकडे तत्वतां ॥ कीं सत्पात्रीं दान देतां ॥ कीर्ति प्रगटे सर्वत्र ॥१५॥
कुलवंतावरी उपकार करितां ॥ ते यश प्रगटें न सांगतां ॥ तैसा एक बाण सोडितां ॥ पसरती बहु चहूंकडे ॥१६॥
लक्षांचे लक्ष बाण ॥ सोडितसे सुमित्रानंदन ॥ इंद्रजित तितुके छेदून ॥ एकीकडे पाडी पैं ॥१७॥
इंद्रजित तुकावी मान ॥ म्हणे धन्य वीर लक्ष्मण ॥ रणधीर न ढळे ठाण ॥ योद्धा निपुण होय हा ॥१८॥
असो इंद्रजितें जपोनि मंत्र ॥ सोडिलें तेव्हां पर्जन्यास्त्र ॥ हस्तिशुंडेऐसी धार ॥ मेघ अपार वर्षती ॥१९॥
ऐसे देखोनि लक्ष्मण ॥ वातास्त्र जपोनि उडवी पर्जन्य ॥ जैसे वैराग्य प्रगटतां संपूर्ण ॥ संसारदुःखें वितुळती पैं ॥१२०॥
परी वात सुटला अद्भुत ॥ इंद्रजिताचें कटक उडत ॥ रावणीनें महापर्वत ॥ आड घातले वायूसी ॥२१॥
जैसें मायाजाळ अद्भुत ॥ तैसे आड दिसती पर्वत ॥ मग सौमित्रें वज्रें बहुत ॥ सोडोनि नग फोडिले ॥२२॥
करितां सारासार श्रवण ॥ काम क्रोध जाती वितळोन ॥ तैसे पर्वत फोडून ॥ पिष्टवत पैं केले ॥२३॥
मग तो सुलोचनावर ॥ सोडी वडवानळास्त्र ॥ त्यावरी दशरथी वीर ॥ सागरास्त्र सोडीतसे ॥२४॥
सागर अद्भुत देखोनी ॥ अगस्तिमंत्र जपे रावणी ॥ तत्काळ समुद्र आटोनी ॥ क्षणमात्रें टाकिला ॥२५॥
पापास्त्र सोडी इंद्रजित ॥ नाममंत्र जपे सुमित्रासुत ॥ माहेश्वर रावणी प्रेरित ॥ सौमित्र जपे ब्रह्मास्त्र ॥२६॥
ब्रह्मास्त्र श्रेष्ठ सर्वांत ॥ तेणें माहेश्वर ग्रासिलें समस्त ॥ जांबुवंत आणि हनुमंत ॥ तटस्थ कौतुक पाहती ॥२७॥
परम कोपा चढला रावणी ॥ पांच बाण काढी निवडोनी ॥ कीं पांचही सौदामिनी ॥ मेघाबाहेर निघाल्या ॥२८॥
ते अनिवार पांच बाण ॥ सोडिले आकर्णवरी ओढून ॥ अकस्मात येऊन ॥ सौमित्राचे हृदयीं भरले ॥२९॥
मेरु मांदार होती चूर्ण ॥ ऐसे ते कठोर पाच बाण ॥ भोगींद्रावतार लक्ष्मण ॥ तेणेंचि व्यथा साहिली ॥१३०॥
सवेंचि वीर लक्ष्मण ॥ सोडिता जाहला नव बाण ॥ इंद्रजिताचें कपाळ फोडून ॥ आंत संपूर्ण रूतले पैं ॥३१॥
इंद्रजित योद्धा दारुण ॥ बाल्यदशावेष्टित लक्ष्मण ॥ स्नेहें दाटोनि बिभीषण ॥ गदा झेलीत पुढें आला ॥३२॥
गदा फिरवूनि ते वेळीं ॥ इंद्रजिता वरी टाकिली ॥ येरे शर सोडोनि पाडिली ॥ एकीकडे आडवी ते ॥३३॥
मेघनादें सोडोनि पंचबाण ॥ हृदयीं खिळिला बिभीषण ॥ जांबुवंत ते दोखोन ॥ पुढें धांवे काळ जैसा ॥३४॥
पर्वतीं वज्र पडे अकस्मात ॥ तैसा रावणीवरी जांबुवंत ॥ हस्तचपेटें त्याचा रथ ॥ अश्वांसहित चूर्ण केला ॥३५॥
विरथ होऊन इंद्रजित ॥ भूमीवरी उभा युद्ध करित ॥ तों हनुमंतें विशाळ पर्वत ॥ रावणीवरी टाकिला ॥३६॥
नळ नीळ ऋृषभ अंगद ॥ शरभ गवय गवाक्ष कुमुद ॥ केसरी पावकलोचन मैंद ॥ एकदांचि उठावले ॥३७॥
शिळा पर्वत ते अवसरीं ॥ टाकिती बळेंचि शक्रारीवरी ॥ देव पाहती अंबरीं ॥ कौतुक परम युद्धाचें ॥३८॥
इंद्रजित चतुर बहुत ॥ परम पराक्रमी रणपंडित ॥ तितुक्यांचे फोडी पर्वत ॥ बाणजाळ घालूनियां ॥३९॥
तंव इंद्रजित उडाला ॥ मेघाआड जाऊनि ते वेळां ॥ तेथोनियां वर्षों लागला ॥ बाणजाळ फार कपींवरी ॥१४०॥
सौमित्राचें ठाण गोजिरें ॥ मग काय केलें वायुकुमरें ॥ तळहातीं सौमित्र त्वरें ॥ उभा करूनि उडाला ॥४१॥
द्वादश गांवे इंद्रजित ॥ शतयोजनें उंच हनुमंत ॥ संग्राम केला अद्भुत ॥ उतरे इंद्रजित पृथ्वीवरी ॥४२॥
खालीं उतरला लक्ष्मण ॥ तों समस्त देव ऋषिगण ॥ सौमित्रासी चिंतिती कल्याण ॥ विजयी पूर्ण हो आजी ॥४३॥
पाठीसी वानरांचे भार ॥ आवेशें गर्जती वारंवार ॥ मांडलें परम घनचक्र ॥ अनिवार वीर दोघेही ॥४४॥
सिंहनादेकरून ॥ दोघेही गर्जविती गगन ॥ महाआवेशें संपूर्ण ॥ ब्रह्मांड ग्रासूं भाविती ॥४५॥
दोघांचे अंगीं रुतले शर ॥ जैसी पिच्छें पसरिती मयूर ॥ कीं पर्वतासी फुटले तृणांकुर ॥ तैसे वीर दिसती ॥४६॥
याउपरी सौमित्रवीर ॥ तूणीरांतूनि काढी दिव्य शर ॥ जैसा तृतीय नेत्रींचा वैश्वानर ॥ अकस्मात प्रगटला ॥४७॥
जैसा माध्यान्हींचा गभस्ति ॥ तैसीं बाणांचीं मुखें दिसती ॥ तयांची किरणें प्रकाशलीं क्षितीं ॥ न लक्षवे कोणातें ॥४८॥
रामनाममुद्रांकित ॥ देदीप्यमान बाण समर्थ ॥ सुमित्रासुताचे मनोरथ ॥ पूर्णकर्ता निर्धारें ॥४९॥
तो बाण धनुष्यावरी ॥ सौमित्रें योजिला झडकरी ॥ आकर्ण ओढोनि अंतरीं ॥ काय चिंतिता जाहला ॥१५०॥
 
अध्याय एकोणतीसावा - श्लोक १५१ ते १९४
म्हणे पूर्णब्रह्मसनातन ॥ मायातीत शुद्धचैतन्य ॥ तो सूर्यवंशी रघुनंदन ॥ जरी हें साच असेल ॥५१॥
मी स्त्री असोनि ब्रह्मचारी ॥ चतुर्दश वर्षें निराहारी ॥ कायावाचामनें अंतरीं ॥ रामउपासक जरी असें ॥५२॥
मंगळभगिनी जगन्माता ॥ सत्य असेल पतिव्रता ॥ रामदासत्व हनुमंता ॥ जरी साच घडलें असेल ॥५३॥
शिवकंठीचें हालाहल ॥ नामें शमलें असेल सकळ ॥ तरी या बाणें शिरकमळ ॥ इंद्रजिताचें खंडेल ॥५४॥
ऐसें चिंतोनी निज मनीं ॥ बाण सोडिला तत्क्षणीं ॥ शक्रारीचा कंठ लक्षोनी ॥ गगनमार्गे जातसे ॥५५॥
यावरी विंशतिनेत्रपुत्र ॥ बाण देखोनि परम तीव्र ॥ मग स्वयें निर्वाण शर ॥ योजूनि आकर्ण ओढिला ॥५६॥
तंव इतुक्यांत अकस्मात ॥ बाण पावला कृतांतवत ॥ तेणें कंठ आणि भुजा त्वरित ॥ छेदोनि नेलीं गगनमार्गे ॥५७॥
वक्र सुरीनें त्वरित ॥ कृषीवल कणसें छेदित ॥ तैसें शिर भुजेसहित ॥ बाणें नेलें ते काळी ॥५८॥
भुज उसळून अद्भुत ॥ लंकेवरी जाऊनि पडत ॥ शिर भूमंडळीं उतरत ॥ कंदुकवत ते काळीं ॥५९॥
तों ऋषभें धांवोनि सत्वर ॥ वरिच्यावरी झेलिलें शिर ॥ जाहला एकचि जयजयकार ॥ सुमनसंभार देव वर्षती ॥१६०॥
इंद्र संतोषला बहुत ॥ म्हणे आजि माझे भाग्य उदित ॥ दिशा पावलों यथार्थ ॥ सुमित्रासुत प्रसादें ॥६१॥
शक्राचा हर्ष ते काळीं ॥ न मायेचि नभमंडळीं ॥ दुंदुभींची घाई लागली ॥ ऋषिमंडळी आनंदत ॥६२॥
पुष्पवृष्टि वारंवार ॥ सौमित्रावरी करी देवेंद्र ॥ इंद्राचा उजळला मुखचंद्र ॥ निष्कलंक क्षयरहित ॥६३॥
इंद्रजित पडिला मेदिनीं ॥ दीनवदन पळे वाहिनी ॥ प्राण जातां तेचि क्षणी ॥ इंद्रियें जैसीं निस्तेज ॥६४॥
दीप गेलिया प्रभा हारपे ॥ कीं शशी मावळतां चांदणें लोपे ॥ कीं गायन राहतां संपें ॥ स्वर करणें सर्वही ॥६५॥
कीं वृक्ष उन्मळतां क्षिती ॥ अंडज नीडें सांडूनि पळती ॥ शक्रारि पडतां ते रीतीं ॥ सेनासमुदाय फुटला ॥६६॥
जय पावून संपूर्ण ॥ परतला वीर लक्ष्मण ॥ वारंवार बिभीषण ॥ स्तुति करी सौमित्राची ॥६७॥
मग हनुमंताचे स्कंधावरी ॥ सौमित्र बैसला ते अवसरीं ॥ तनु जर्जर शरप्रहारी ॥ जाहली असे तेधवां ॥६८॥
सुवेळागिरि लक्षून ॥ चालिले तेव्हां वानरगण ॥ समस्त सांगे बिभीषण ॥ आल्या पंथें चलावें ॥६९॥
इंद्रजिताचें विशाळ शिर ॥ झेलीत नेत ऋषभ वानर ॥ दृष्टीनें पाहील रघुवीर ॥ म्हणोनि संगें घेतलें ॥१७०॥
असो इकडे श्रीराम ॥ जो स्कंदतातमनविश्राम ॥ सौमित्राकारणें परम ॥ चिंताक्रांत जाहला ॥७१॥
सुग्रीवाप्रति रघुनंदन ॥ म्हणे निकुंभिलेसि गेला लक्ष्मण ॥ तेथें कैसे वर्तमान ॥ जाहलें असेल कळेना ॥७२॥
इंद्रजिताचे युद्ध कठिण ॥ आम्हांसी नागपाशीं बांधिलें जाण ॥ शरजाळीं सेना संपूर्ण ॥ खिळोनियां पाडिली ॥७३॥
योद्धा इंद्रजित विशेष ॥ बाळदशा सौमित्रास ॥ ऐसें बोलोनि अयोध्याधीश ॥ अश्रु नयनीं आणिले ॥७४॥
सुग्रीव म्हणे रघुपती ॥ आपण खेद न करावा चित्ती । इंद्रजितासी वधोनि त्वरितगतीं ॥ आतां येईल सौमित्र ॥७५॥
ऐशी चिंता करितां अकस्मात ॥ तों वानर आले पुढें धांवत ॥ सांगती आला सुमित्रापुत्र ॥ इंद्रजिता वधोनियां ॥७६॥
परम आनंदला रघुवीर ॥ सामोरा धांवे मित्रकुमर ॥ तों समीप देखिला सौमित्र ॥ बाळसूर्य जयापरी ॥७७॥
हनुमंताचे स्कंधावरून ॥ खालीं उतरला लक्ष्मण ॥ सुग्रीव आणि बिभीषण ॥ हस्त धरूनि चालत ॥७८॥
हळू हळू चाले लक्ष्मण ॥ शर अंगीं रुतले तीक्ष्ण ॥ दृष्टीं देखोनि रघुनंदन ॥ केलें नमन साष्टांगीं ॥७९॥
मग उठोनि राजीवनेत्र ॥ प्रीतीनें हृदयीं धरी सौमित्र ॥ वृत्र वधितां सहस्रनेत्र ॥ गुरु जैसा आलिंगी ॥१८०॥
श्रीराम म्हणे सौमित्रातें ॥ तुवां वधोनि इंद्रजितातें ॥ ब्रह्मांड भरलें पुरुषार्थे ॥ पराक्रम करूनियां ॥८१॥
कोणासी नाटोपे रावणी ॥ तो त्वां वधिला समरांगणीं ॥ देवांसहित वज्रपाणि ॥ आनंदमय जाहला ॥८२॥
ऐसें बोलोनि रघुनाथ ॥ सौमित्र मस्तकी ठेवी हस्त ॥ श्रम हारपला समस्त ॥ आनंदभरित लक्ष्मण ॥८३॥
बिभीषण जांबुवंत ॥ समस्तांसी भेटला रघुनाथ ॥ शब्दरत्नें गौरवित ॥ धन्य म्हणे सीतामनोहर ॥ धन्य धन्य ऋृषभा तूं ॥८५॥
आरक्त पुष्पें पूजा करून ॥ हें शिर ठेवावें जतन ॥ मागों येईल त्यालागून ॥ द्यावें लागेल शिर हे ॥८६॥
सुषेणासी म्हणे रघुवीर ॥ तूं वैद्य आणि प्रतापशूर ॥ तरी सौमित्रासी करावा उपचार ॥ देह जर्जर बाणीं जाहला ॥८७॥
मग सुषेणें औषधी आणून ॥ दिव्यदेही केला लक्ष्मण ॥ असो यावरी बिभीषण ॥ वर्तमान सर्व सांगे ॥८८॥
कैसा जाहला संग्राम ॥ वीरद्वयांचा पराक्रम ॥ ते ऐकोनि मेघश्यम ॥ आश्चर्य परम करितसे ॥८९॥
म्हणे धन्य धन्य इंद्रजित वीर ॥ पुरुषार्षासी नाहीं पार ॥ दीन करून देव समग्र ॥ बंदी जेणें घातले ॥१९०॥
याउपरी सुलोचना ॥ शिर मागों येईल राजीवनयना ॥ ते सुरस कथा ऐकतां श्रवणां ॥ सौख्य होईल अतयंत ॥९१॥
रामविजयग्रंथ प्रचंड ॥ त्यांत रसभरित युद्धकांड ॥ श्रवणें पुरे सर्व कोड ॥ न लगे चाड आणिकांची ॥९२॥
ब्रह्मानंदा श्रीरामा ॥ जगद्वंद्या पूर्णब्रह्मा ॥ श्रीधरवरदा अनामा ॥ पूर्णकामा अभंगा ॥९३॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनत्रिंशतितमोध्याय गोड हा ॥१९४॥
अध्याय ॥२९॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥