सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (14:16 IST)

देवपूजा कशी करावी? संपूर्ण माहिती जाणून घ्या

नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन:शांति लाभते. घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं. कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
पूजेसाठी काही नियम-
पुजेला बसताना धूतवस्त्र अर्थात स्वच्छ, धुतलेले सोवळे किंवा इतर वस्त्र नेसून बसावे.
पुजा करताना आसानावर बसावे. आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये.
कपाळाला गंध किंवा कुंकाचे तिलक असावे.
मन एकाग्र असावे.
देवपूजा करताना मध्येच उठू नये.
देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी.
आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे.
फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी.
विड्याची पाने कायम उताणी व देठ देवाकडे असावे.
नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी.
 
षोडशोपचार पूजा – 
१) आवाहन 
२) आसन 
३) पाद्यं
४) अर्घ्य
५) आचमन
६) स्नान 
७) वस्त्र
८) यज्ञोपवीत
९) गंध
१०) पुष्प
११) धूप
१२) दीप
१३) नैवेद्य
१४) प्रदक्षिणा
१५) नमस्कार
१६) मंत्रपुष्प.
 
पूजा विधी-
* प्रथम आचमन करावे. डाव्या हातात पळी घेउन त्याने उजव्या हातावर पाणी ओतून ते पाणी प्राशन करावे, ही कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.
* पूजा करताना तसेच कोणत्याही शुभ कार्य करताना कपाळी तिलक धारण करावा. स्वत:ला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा. 
* देवपूजेच्या अंतर्गत कलश, शंख, घंटा, दीप पूजन करावयाचे असते.
* प्रथम पूजेसाठी घेतलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करावे. मंत्र ज्ञात नसल्यास स्मरण करुन कलशाला गंध, अक्षता, फुलं व्हावे.
* त्यानंतर शंख पूजन करावे. गंध-फुलं वाहून नमस्कार करावा. शंखाला अक्षता वाहू नये.
* त्यानंतर घंटेचे पूजन करावे. घंटा वाजवावी.
* दीप पूजन करावे. ब्रह्मस्वरूप दीप किंवा समईचे पूजन करुन नमस्कार करावा.
* शुद्धी म्हणजे पूजन झालेल्या शंख, कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेउन तुळसपत्र घेऊन सर्व पूजासाहित्य व स्वत:वरती प्रोक्षण करावे अर्थात पाणी शिंपडावे.
* ध्यान किंवा स्मरण करावे. अर्थात ज्या देवतेची पूजा करणार त्या देवतेचे स्मरण करावे. दररोजच्या पूजेत आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. 
 
षोडशोपचार पूजा या प्रकारे करा
 
1) आवाहन - देवाचे नाव घेत देवाला आवाहन करावे. यात देवाला अक्षता वहाव्या.
2) आसन - देवाला बसायला आसन द्यावे.
3) पाद्य - देवाचे पाय धूवावे.
4) अर्घ्य - गंध, फुलं, नाणे, सुपारी एकत्र घेउन पाण्याबरोबर देवाला अर्पण करावे.
5) आचमन - देवाच्या मुर्तीवर पळीने पाणी सोडावे.
6) स्नान - देवाला पाण्याने स्नान घालावे.
पंचामृत स्नान :- 
प्रथम दुधाने स्नान नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फुलं वाहून नमस्कार करावा.
नंतर देवाला दह्याने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फुलं वाहून नमस्कार करावा.
घृतस्नान अर्थात देवाला तूपाने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फुलं वाहून नमस्कार करावा. 
देवाला मधाने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फुलं वाहून नमस्कार करावा.
देवाला साखरेने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फुलं वाहून नमस्कार करावा.
 
गंधोदक स्नान :- 
देवाला थोडे गंध-पाणी एकत्र करून त्याने स्नान घालुन शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फुलं व्हावे व नमस्कार करावा. उदबत्ती, दिवा ओवाळून पंचामृत किंवा दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. ज्या देवाची पूजा करत आहात त्या देवाचे स्तुती मंत्र, श्लोक म्हणत देवावर पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर देवाला अत्तराने स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी. नंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावर ठेवावे.
 
७) वस्त्र - देवाला कापसाचे वस्त्र व्हावे.
८) यज्ञोपवीत - देवाला जानवे घालावे. आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.
९) चंदन - देवाला अनामिकेने चंदन लावावे. नंतर देवाला अलंकार घालावे. अलंकार नसल्यास अक्षता वहाव्या. परिमल द्रव्य अर्थात हळद, पिंजर, शेंदुर, अबीर देवाला वाहून अत्तर लावावे.
१०) पुष्प - देवाला सुगंधी फुले, माळ, गजरे, तुळस, दूर्वा, बेलपत्र अर्पित करावे.
११) धूप - देवाला उदबत्ती ओवाळावी.
१२) दीप - देवाला शुद्ध तुपाचे निरांजन ओवाळावे.
१३) नैवेद्य - देवाला नैवेद्य दाखवावा. दररोज साखरेचा नैवेद्य दाखवण्यास देखील हरकत नाही. जेवणाचा दाखवायचा असल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावे. देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करुन त्यावर नैवेद्याचे पान ठेऊन अर्पण करावे. हात धुण्यासाठी, मुख धुण्यासाठी, आचमनासाठी ताम्हनात चार वेळा पाणी सोडावे. देवाला अत्तर लावावे. नंतर देवाला विडा द्यावा. यात आपण दोन विड्याची पाने व सुपारी आणि नाणे ठेवावे. देवाला श्रीफळ तसेच इतर फळे अपिर्त करावी. नंतर देवाची आरती करावी.
 
१४) प्रदक्षिणा - प्रदक्षिणा करावी. जागा कमी असल्यास स्वत:भोवती उजव्या बाजूने फिरावे. 
 
१५) नमस्कार - साष्टांग नमस्कार करावा.
 
१६) मंत्रपुष्पांजली - दोन्ही हातात फुले घेऊन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फुलं अर्पण करावी.
 
शेवटी हात जोडून देवाची प्रार्थना करावी. काही चुक झाली असल्यास क्षमा मागावी. 
 
पंचोपचार पूजा विधी-
 
पंचोपचारपूजा म्हणजे पाच उपचारांनी जी पूजा करतात, त्याला पंचोपचारपूजा म्हणतात. 
 
गंध - देवाला गंध लावावे.
पुष्प - देवाला फुलं अर्पित करावी.
धूप - देवाला धूप किंवा उदबत्ती ओवाळावी.
दीप - देवाला तुपाचे निरांजन ओवाळावे.
नैवेद्य - देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेऊन देवाला नैवेद्य दाखवावा.