रविवार, 20 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (21:13 IST)

प्रबोधिनी एकादशी महत्त्व आणि पूजा विधी

कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात तसेच कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात म्हणून तिला 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हटले जाते. या एकादशीला देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी देखील म्हणतात.
 
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाहात तुळशीचा विवाह विष्णू अवतार कृष्णाशी लावतात. तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे.
 
कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते. वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. 
 
शास्त्रांप्रमाणे एकादशी व्रत केल्याने व या दिवशी कथा श्रवण केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन करावे.
 
काय करतात या एकादशीला
एकादशी या व्रताची देवता श्रीविष्णु आहे. या दिवशी क्षीरसागरात शयन करत असलेले श्री विष्णूंना उठवून मंगळ कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते.
मंदिर आणि घरामध्ये उसांचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोर, आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो.
मंडपात शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो.
मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते.
या एकादशीला शालिग्राम, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं.
एकादशीला दिवे प्रज्वलित केले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात.
 
पूजा विधी
भक्ती भावाने प्रभू विष्णूंचे ध्यान करुन व्रत संकल्प घ्यावा.
निर्जल किंवा केवळ द्रव्य पदार्थांवर उपास ठेवावा. शक्य नसल्यास फळाहार करु शकता.
उपास करणे शक्य नसल्यास या दिवशी तांदूळ आणि मीठ खाणे टाळावे.
व्रत न करणार्‍यांनी देखील शिळं अन्न, लसूण-कांदा, मास- मदिराचे सेवन टाळावे.
ऊसाने मंडप तयार करुन विष्णूंची मूर्ती स्थापित करावी. 
घरातील अंगणात विष्णूंच्या चरणांची आकृती तयार करावी आणि उन्हात पावले झाकून द्यावे.
नंतर एका खळला गेरुने चित्र काढून त्यात फळं, शिंगाडे, मिठाई आणि ऊस ठेवून टोपलीने झाकून द्यावं.
या दिवशी रात्री घराबाहेर आणि पूजा स्थळी दिवे लावावे. देवघरात अखंड दिवा लावणे श्रेष्ठ ठरेल.
संध्याकाळी पूजेत सुशोभित स्त्रोत पाठ, भागवत कथा आणि पुराण श्रवण व भजन करावे. 
नंतर देवाला शंख, घंटा वाजवून उठवावे. खेळ लीला आणि वाजत गाजत मंत्र उच्चारत प्रभूला उठवावे.
नंतर कुटुंबासह देवाची आरती करावी. 
नंतर कथा श्रवण करुन प्रसाद वितरित करावा.