सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ७

श्रीगणेशाय नमः ॥ श्री अयोध्याधीशाय नमः ॥
जय जया भार्गवरामा अनंत अवतारा पूर्ण कामा भक्तेष्टदा स्वानंदधामा सर्व मंगला नमोस्तुते ॥१॥
पर्शुराम आश्रमाप्रती ब्रह्मवर्चसी महामती अस्ताव्यस्त स्थिती जगती लक्षूनि पाहिली ॥२॥
शुभ पक्षी स्तब्ध बैसती वायु कठोर वाहती विशोभित वन जगती पृथ्वी होय थरथरा ॥३॥
दुःश्चिन्हें अनर्थ कारका अधर नेत्र स्फुरणका अरिष्ट कारिणी शिंका दक्षिणेचि ॥४॥
देखूनी मनीं भार्गव वीर चिंता करी अचिंत्य वीर्य भक्तपालक देववर्य मनुष्यपणे बोले ॥५॥
माझ्या चित्तासी काय भ्रांती कीं दस्यू आश्रमी उपद्रविती कीं भूप अधर्म पद्धती कलियुग कीं प्राप्त ॥६॥
तेथें येवोनि दुर्मती है हय देशाचा अधिपती नामें अर्जुन अगाध कीर्ती क्षत्रियांमाजी श्रेष्ठ तो ॥७॥
जेणें आरधिले बहुतर विष्णूचे दत्त अवतार सकल योगाचे योगेश्वर पूजादिकें करुनी ॥८॥
तेणें लाधले ते वर प्राप्त जाले बाहु हजार गती अव्याहत चर जैसा पवन कीं ॥९॥
अव्याहतेंद्रियें ओज यशस्वी अपार तेज तया भीती शत्रू सहज प्रख्यात दिगंती ॥१०॥
योगेश्‍वरत्व अतिवीर्य अणि मादिक ऐश्‍वर्य ज्याचें यश वर्णिती अर्य त्रिलोकीं ॥११॥
शतावधी घेवोनि धनुर्बाण संचार करी एकटा आपण वावटळी सारिखें जाण वनीं मृगया करीतसे ॥१२॥
तों एक समयीं राजा शतावधी घेवोनि ओजा क्रीडाकरी अति ओजा रेवा नदीच्या जळीं ॥१३॥
वोध रोध करी भुजानीं चुळा टाकी स्त्रियांचे स्तनीं मुख चुंबी कवटाळुनी विनोद करितो विचित्र ॥१४॥
वैजयंती शोभे माळा आपादपर्यंत घातली गळां कीरीट कुंडलें उज्वळा श्रृंगार रसातें विस्तारी ॥१५॥
जैसी क्रीडा मदोत्कट हस्तिणीसहित उत्धट लव लव करुनी शुंडा फुट तैशापरी क्रीडेतो ॥१६॥
तेथें त्याचि अवसरीं पातला रावण रेवातिरीं अर्जुन स्त्रिया दूषित करी लीलामात्रें ॥१७॥
समक्ष अपराध पाहोन महिष्मती पुरींत नेवोन केला रावण बंदिवान सहज पैं अर्जुनें ॥१८॥
स्मरण करीतो मंद श्रीशंकरा कंल्याणद सोडवी येवढा माझा बंद पार्षद होयीन जन्मोजन्मीं ॥१९॥
वीर मानी दशाननें सोडन ह्मणे लज्जावदनें तरी सोडिला अर्जुनें दीन ह्मणूनी ॥२०॥
आणीक केली मध्यस्ती पित्यानें नामें तो पुलस्ती जाऊंदे याला स्वस्ती ह्मणोनी सूटला ॥२१॥
पुढें अर्जुन मृगयेसी गेलास सैन्य वनासी तों सहजगत्या आश्रमासी जमदग्नीच्या पातला ॥२२॥
तो आपल्या महतीपणें आला विश्रांती कारणें होईल आश्रम पाहणें ह्मणोनीस सैन्यें पातला ॥२३॥
सन्मुख जावोनी भ्रुगुवर नरदेवासी योग्य सत्कार पूजा केली साम्योपचार इच्छा भोजन दिधलें सर्वांसी ॥२४॥
ह्मणती अपूर्वही अन्नगोडी राजा आणि ते वर्‍हाडी ॥ बोलती याची नित्य आवडी आह्मां असे ॥२५॥
आश्‍वारुढ गजारुढ रथारुढ शिंबीकारुढ आणि सकळ पशू प्रौढ तृप्त सर्व जाहले ॥२६॥
इच्छितदात्री कामधेनू रायानें आश्चर्य पाहोन ह्मणे राज्यांत असावें रत्‍न घ्यावेंचि हें ॥२७॥
विनाशकाळ आला ह्मणिजे विपरीत बुद्धी आठविजे मग ते मरण होइजे निश्चित पैं ॥२८॥
बळात्कारें कामधेनू घेवोनि गेला दुर्मनु जैसा ग्राम सिंह श्‍वानू नेई हवीतें ॥२९॥
नंतर राजा गेल्यावर आले श्रीमान् भ्रुगुवर आश्रमीं खिन्न माता पितर ऐसें देखिलें ॥३०॥
तें ऐकिलें वर्तमान क्रोधावला रेणुका नंदन ह्मणे याचें निर्दाळन होईल पूर्ण ॥३१॥
क्रोधे जैसा महा हि धनुर्बाण चर्मलौहि घेतला महाफर्शुहि काळदंडापरी ॥३२॥
वेगें चालिला चक्रवायु दिसे प्रलयानल कायु तेव्हां हे दुष्ट अल्पायु मरणोन्मुख जाहले ॥३३॥
परशुराम अनंतशक्ती पातले त्याच्या पुरी प्रती अग्नी जैसा अरण्य गवतीं देखिला तैसा अर्जुनानें ॥३४॥
तेणें घेवोनि आपुली सेना सत्रा अक्षौहिणी भीषणा शस्त्रास्त्र कुशल युद्धगहना लोम हर्षण करिती ॥३५॥
परशुराम येऊनी बाण सोडिले राजसैन्यीं पर्जन्य जैसा गिरिसानुनी तैसें आछादिलें ॥३६॥
जेवीं सूर्य ****पासून आला युत्धीं तेवीं अर्जुन वीरपणें करी गर्जन हासहस्त्रार्जुन ह्मणे मी ॥३७॥
धनुष्यासीं योजोनि बाणा बोले क्रोधें तत्क्षणा काय करावें ब्राह्मणा बुभुक्षितासी ॥३८॥
परी नसेल हा ब्राह्मण कैवारी जमदग्नीचा जाण शिष्यत्वें क्षत्रिय दारुण बाळ वेषें पातला ॥३९॥
दावी आपुली तरुणता न दिसे युद्ध कुशलता गुरुकार्य करील निश्चिता एकला परंतु ॥४०॥
एवं बोलोनि धनुष्यासी बाहुनें धरिलें पंचशतासी अगणीत सोडीत बाणासीं त्रिभुवन दाटलें ॥४१॥
ते समयीं भ्रुगुवरें आपुले सायक कुठारें छ्दिलेस सैन्य बाण सारे गतासू पडियेले भूमीसी ॥४२॥
छिन्न तेथें भुजकंधरा पाद मस्तकें बाहुसरा कर्दमांकित जाली धरा रुधिर सरिता पैं ॥४३॥
क्रोधायमान तो अर्जुन सोडी पंचशतें बाण महारौद्र क्षणक्षण सहजमात्रें ॥४४॥
राम अस्त्र भृतामध्यें अग्रणी छेदिलीं धनुष्यें तत्क्षणीं क्रोधें दिशा लक्षुनी नाशीलीं शस्त्रास्त्रें ॥४५॥
तरी नाटोपे अर्जुन तेव्हां भ्रुजकु ठारें करुन तोडिले कठोर धारेनें हास्यकरोनी ॥४६॥
कुठारधारा अति अद्भुत जैसी विद्युल्लता चमकत देखूनी शत्रू भयभीत पळतीते ॥४७॥
द्विभुजा वशिष्ठ तो अर्जुन शस्त्रास्त्र टाकी गर्जोन ऋष्टी गदा खडग दारुण ****॥४८॥
अनंत बळी ईश्‍वरें ती अस्त्रें बाण छेदिले सारे मग तोडिले बाहुवर महानद्वय ॥४९॥
सह किरीट कुंडल मस्तक तें जाज्वल बाणें छेदिलें तेव्हां भूगोळ कंपायमान जाहला ॥५०॥
जैसें श्रृंग पर्वताचें कीं इंद्रें वृत्रासुराचें किंवा देवीनें महिषाचें तेवीं शिर भुतळीं पडियेलें ॥५१॥
हाहाकार जाला जगतीं ॥ त्याचे पुत्र संख्या अयुती पळोनी जाती दुष्टमती कुलक्षयकारी ते ॥५२॥
दुष्टाचें करोनी दमनु ॥ अग्निहोत्री कामधेनू सवत्साती घेवोनु ते प्राप्त जाहले आश्रमीं ॥५३॥
पित्या कारणें गौ अर्पिली साष्टांग केला भूतळीं उभा ठेला जोडोनी अंजळी सांगीतला वृत्तांत ॥५४॥
श्रवण करुनी ऋचीक पुत्र काय केलें हें दुर्विचत्र वध करितां पापमात्र ब्राह्मणासी होत असे ॥५५॥
कदां न वधावे प्राणी विध्युक्तही ब्राह्मणानीं करितां तो तमोगुणी ब्रह्मत्‍हृदय ते नव्हे ॥५६॥
ब्राह्मणांनीं शस्त्र कदापी धारण करितां होय पापी संकटानें महातपी मंत्रदंड करावा ॥५७॥
आणितो सार्वभौम सर्व देवतामय भूर्ध्नाभिषिक्त राजा हय हय त्यासी त्वां मारिलें काय प्रायश्चित्त करी आतां ॥५८॥
ब्राह्मणासी मुख्य क्षमा अहिंसा शांती पाहिजे परमा सत्यदिकें होय महिमा तपशील असावें ॥५९॥
ऐक रामा पुत्रराया महाबाहो त्द्याक्षमया संतुष्ट होय विश्‍वकाया नारायण अनादी ॥६०॥
क्षमे करुनी शोभे भूमी क्षमेकरुनी धेनूश्यामी क्षमे करुनि शास्त्रासामी क्षमावान ब्रह्मतेज ॥६१॥
आतां त्द्यासी प्रायश्चित्त तीर्थयात्रा होय संमत तेणें पापहर अच्युत सेवन करावें ॥६२॥
ऐकोनि पितयाचें वचन माथा करितो वंदन ह्मणे आपण मनुष्यपणें लोकोपकारी प्रश्न करावे ॥६३॥
चिंतोनि ऐसें मानसीं ह्मणे सांगावें कवण यात्रेसी ज्याचें माहत्म्य अत्यंतेसी त्या परिसाव्या ॥६४॥
जेणें पावतील मनोरथ पुण्यदायक अपरीमित करितां अवश्य अत्यंत यात्रा मनुष्यानीं ॥६५॥
ब्रह्महत्या गोहत्यादिक पापें जातील अनेक नानारोगादि बहुत दुःख दर्शनमात्रें जातील ॥६६॥
पावती धन पुत्रादि संपत्ती जातील आणिक विपत्ती भीत्ताची जाय त्वरित भीती स्वर्गमोक्ष पावतील ॥६७॥
प्रश्न केला मनुष्योपकारका नारायणा अक्षर रुपका प्रगट होवोनी अनेका लीलाकरी विचित्र ॥६८॥
नमन माझें तयासीं परत्परास्वयंज्योतीसी भक्तवत्सल माधवासी दुःख हरणा सर्वेशा ॥६९॥
कथा परम परमामृत श्रवणीं प्राशितां अतृप्त वर्णन करितां सतत ईश्‍वर कृपा होइजे ॥७०॥
पुढें कथा असे अपूर्व उत्तम यात्रा वर्णिल्या सर्व ऐकावें तुह्मीं चित्तसाव परशुरामचरित्र कथा ॥७१॥
स्वस्ती श्रीपरशुरामविजय कल्पतरु वर्णितां माहत्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु ॥
सप्तमोध्याय गोड हा ॥७॥ श्रीसहस्त्रार्जुनदमनारीर्पणमस्तु॥