शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (17:16 IST)

चीनमधल्या तारुण्य टिकवण्याच्या औषधासाठी 'या' देशात घेतला जातोय लाखो गाढवांचा बळी

donkey
पाणी विकून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्टीव्ह पूर्णपणे त्याच्या गाढवांवर विसंबून होता. त्याच्या सर्व ग्राहकांसाठी 20 जेरी कॅनने भरलेली त्याची गाडी ओढण्याचं काम ही गाढवं करायचे. मात्र कातड्यासाठी जेव्हा स्टीव्हच्या गाढवांची चोरी झाली तेव्हा त्याच्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळली.
 
त्या दिवसाची सुरूवात इतर दिवसांप्रमाणेच झालेली. नैरोबी शहराच्या बाहेर सीमारेषेवरील आपल्या घरातून तो सकाळी बाहेर पडला आणि त्याची जनावरं घेण्यासाठी शेतात गेला.
 
त्या दिवशी काय घडलं हे आठवत तो म्हणाला, “मला माझी गाढवं दिसलीच नाहीत. मी दिवसरात्र आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यांचा शोध घेतला."
 
तीन दिवसांनंतर त्याला एका मित्राचा फोन आला की त्याला प्राण्यांच्या हाडाचे सांगाडे सापडले आहेत.
 
"त्यांना मारलं, त्यांची कत्तल करण्यात आली होती. शरीरावरील त्यांची कातडी गायब होती."
मेहनतीचं काम करणा-या प्राण्यांची मोठी संख्या असलेल्या आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये आणि जगभरात गाढवांची अशाप्रकारे चोरी करण्याच्या घटना सर्वसामान्य झाल्या आहेत. गाढवाच्या कातडीच्या जागतिक व्यापारात स्टीव्ह आणि त्याच्या गाढवांचं नुकसान याला दुय्यम स्थान आहे.
 
केनियातील त्या क्षेत्रापासून हजारो मैल दूर त्याच्या कारणाचं उगमस्थान आहे. गाढवाच्या कातडीमधील जिलेटिनचा वापर करून बनवण्यात येणा-या पारंपरिक औषधी उपायाला चीनमध्ये प्रचंड मागणी आहे. त्याला 'इजियाओ' म्हणतात.
 
या औषधामध्ये आरोग्य-वर्धक आणि तारुण्य टिकवण्याचे गुणधर्म आहेत, असं मानलं जातं. जिलेटिन काढण्यासाठी गाढवाचं कातडं उकळलं जातं. त्याची पूड, गोळ्या, द्रव्यात रूपांतर केलं जातं किंवा ते अन्नामध्ये मिसळण्यात येतं.
गाढवांवर अवलंबून असलेले स्टीव्हसारखे लोक 'इजियाओ'च्या पारंपरिक घटकाच्या अनिश्चित मागणीचे बळी ठरले आहेत, असं व्यापाराच्या विरोधात मोहीम चालवणा-यांचं म्हणणं आहे.
 
2017 पासून या व्यापाराच्या विरोधात मोहीम चालवणा-या ‘डॉंकी सॅन्च्युरी’ च्या एका नवीन अहवालानुसार जागतिक स्तरावर दरवर्षी गाढवांचा पुरवठा करण्यासाठी किमान 5.9 दशलक्ष गाढवांची कत्तल केली जाते, असा अंदाज आहे. या धर्मदाय संस्थेचं म्हणणं आहे की, ही मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, बीबीसीला स्वतंत्रपणे ही आकडेवारी पडताळून पाहता आलेली नाही.
 
'इजियाओ'च्या उद्योगधंद्याला पुरवठा करण्यासाठी नेमकी किती गाढवं मारली जातात याची अचूक माहिती मिळणं अतिशय कठीण आहे.
जगातील 53 दशलक्ष गाढवांपैकी सुमारे दोन तृतीयांश गाढवं आफ्रिकेत आहेत. तिथे नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातं. गाढवाच्या कातड्याची निर्यात काही देशांमध्ये कायदेशीर, तर काही देशांमध्ये बेकायदेशीर आहे.
 
परंतु कातड्यांना असलेली मोठी मागणी आणि प्रचंड किमतीमुळे गाढवांच्या चोरीला चालना मिळते आणि असं आढळून आलंय की ज्या ठिकाणी व्यापाराला कायदेशीर मान्यता आहे त्या ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी प्राण्यांना आंतरराष्ट्रीय सीमारेषेपर्यंत पोहोचवण्यात येतं, असं ‘डॉंकी सॅन्च्युरी’चं म्हणणं आहे.
 
दरम्यान, गाढवांच्या आक्रसणा-या संख्येवर उपाय म्हणून आफ्रिकेतील प्रत्येक राज्याचं सरकार आणि ब्राझील सरकार गाढवांच्या कत्तलीवर आणि निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याने या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त होऊ शकतं.
 
‘डॉंकी सॅन्च्युरी’साठी काम करणारे आणि नैरोबी येथे राहणारे सॉलोमॉन ओन्यांगो म्हणतात, की "2016 ते 2019 दरम्यान केनियातील एकूण संख्येपैकी सुमारे अर्ध्या गाढवांची (कातडीच्या व्यापाराला पुरवठा करण्यासाठी) कत्तल केल्याचा आमचा अंदाज आहे."
 
हेच प्राणी माणसं, वस्तू, पाणी आणि अन्न वाहून नेतात. हा गरीब प्राणी ग्रामीण समाजाचा कणा आहे. त्यामुळे कातडीच्या व्यापाराचा वाढता आवाका आणि वाढत्या मागणीमुळे या विरोधात मोहीम चालवणा-यांच्या आणि तज्ज्ञांना धोक्याची घंटा जाणवली आहे. म्हणूनच त्यांनी केनियामधील अनेक लोकांना कातडीच्या व्यापाराविरोधातील प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त केलं आहे.
 
या व्यापारावर संपूर्ण आफ्रिकेत अनिश्चित काळासाठी बंदीचा प्रस्ताव मांडण्याची योजना आफ्रिकन युनियन समिटच्या अजेंड्यावर असून त्यासाठी 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी सर्व राज्यांचे नेते एकत्र येणार आहेत.
संपूर्ण आफ्रिकेतील संभाव्य बंदीबद्दल बोलताना स्टीव्ह म्हणतात की, यामुळे प्राण्यांचं संरक्षण करण्यास मदत होईल, “अन्यथा पुढील पिढीसाठी गाढवंच शिल्लक राहणार नाहीत”.
 
परंतु संपूर्ण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये बंदी घातल्याने व्यापाराचं केंद्र फक्त इतरत्र ठिकाणी हलवलं जाईल का?
 
'इजियाओ' उत्पादक चीनमध्ये मिळणाऱ्या गाढवांची कातडी वापरत असत. परंतु, तेथील कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील गाढवांची संख्या 1990 मध्ये 11 दशलक्ष वरून 2021 मध्ये फक्त 2 दशलक्षांपर्यंत घसरली. त्याचवेळी, 'इजियाओ' एक चैनीची गोष्ट म्हणून लोकप्रिय होऊन, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेलं उत्पादन ठरलं.
 
चिनी कंपन्यांनी कातड्यांसाठी परदेशी पुरवठादारांचा शोध घेतला. आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये गाढवांचे कत्तलखाने स्थापन करण्यात आले.
 
आफ्रिकेमध्ये यामुळे गंभीर व्यापारी संघर्षाला सुरूवात झाली.
इथिओपियामध्ये जिथे गाढवाचं मांस खाणं निषिद्ध मानलं जातं तिथे सार्वजनिक निषेध आणि सोशल मीडियावरील आक्रोशानंतर देशातील गाढवांच्या दोन कत्तलखान्यांपैकी एक 2017 मध्ये बंद करण्यात आला.
 
टांझानिया आणि आयव्हरी कोस्टसह यांसारख्या देशांनी 2022 मध्ये गाढवाच्या कत्तलीवर आणि कातडीच्या निर्यातीवर बंदी घातली होती, परंतु चीनचा शेजारी असलेल्या पाकिस्तानात हा व्यापार चालतो. गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात, तेथील मीडिया रिपोर्ट्सने 'काही सर्वोत्तम जातीं'ची पैदास करण्यासाठी देशातील पहिलं 'अधिकृत गाढव प्रजनन फार्म' तयार केलं.
 
हा एक मोठा व्यवसाय आहे. चीन-आफ्रिका संबंधांचे अभ्यासक प्राध्यापक लॉरेन जॉन्स्टन यांच्या मते, सिडनी विद्यापीठातील चीनमधील इजियाओ व्यापाराचे मूल्य 2013 मध्ये सुमारे $ 3.2 अब्ज (£ 2.5 अब्ज) ते 2020 मध्ये सुमारे $ 7.8 अब्ज इतकं वाढलं.
 
सार्वजनिक आरोग्य अधिकारी, प्राणी कल्याण मोहिमेचे प्रचारक आणि अगदी आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषकांसाठी देखील ही एक चिंतेची बाब बनली आहे. संशोधनातून असे समोर आलंय की, गाढवाच्या कातड्याचा वापर इतर बेकायदेशीर वन्यजीव उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी केला जातो. या व्यापारावरील राष्ट्रीय बंदीमुळे या कारवाया आणखी भूमिगत पद्धतीने केल्या जातील, अशी अनेकांना भीती आहे.
 
राज्याच्या नेत्यांसाठी एक मूलभूत प्रश्न आहे: विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी मृत किंवा जिवंत गाढवांची काही किंमत आहे का?
 
स्टीव्ह म्हणतात, "माझ्या समुदायात बहुतांश लहान-सहान शेतकरी आहेत आणि ते त्यांच्या मालाच्या विक्रिसाठी गाढवांचा वापर करतात."
 
मेडिकलचा अभ्यास करता यावा यासाठी शाळेची फी भरण्यासाठी तो पाणी विकून पैसे साठवत होता.
 
‘डॉंकी सॅन्च्युरी’ मध्ये पशुवैद्यक म्हणून काम करणारे फेथ बर्डन म्हणतात की, जगाच्या अनेक भागांमध्ये प्राणी हे ग्रामीण जीवनाचं अंतर्भूत अंग आहेत. हे मजबूत, जुळवून घेणारे प्राणी आहेत.
 
"गाढव 24 तास पाणी न पिता राहू शकतं आणि कोणत्याही त्रासाशिवाय पुन्हा अतिशय लवकर रीहायड्रेट होऊ शकतं.”
 
परंतु त्यांचे सर्व गुण लक्षात घेता, गाढवांची पैदास सहज आणि वेगाने होत नाही. त्यामुळे या व्यापाराविरोधात मोहीम चालवणा-यांना भीती आहे की जर या व्यापाराला आळा घातला नाही तर गाढवांची संख्या कमी होत जाईल, ज्यामुळे अधिकाधिक गरीब लोकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होईल.
 
मिस्टर ओन्यांगो सांगतात: "आम्ही आमच्या गाढवांची पैदास कधीच सामूहिक कत्तलीसाठी केली नाही."
 
प्रोफेसर जॉन्स्टन म्हणतात की, गाढवांनी हजारो वर्षांपासून गरीबांना पाठीवरून वाहून नेलंय.
 
"ते मुलांना, स्त्रियांना वाहून घेऊन जातात. मेरी जेव्हा येशूसह पोटुशी होती तेव्हा त्यांनी तिला वाहून नेलं होतं,” असं त्या म्हणतात.
 
त्या पुढे सांगतात की, जेव्हा एखादा प्राणी नामशेष व्हायला लागतो, तेव्हा त्या नुकसानाचा सामना महिला आणि मुलींना करावा लागतो.
 
“गाढव गेलं की गाढव करत असलेल्या कामाची जबाबदारी पुन्हा स्त्रियांवर येऊन पडते आणि त्यामध्ये एक कडवट शोकांतिका आहे, कारण इजियाओची विक्री प्रामुख्याने श्रीमंत चीनी महिलांसाठी केली जाते."
 
हा एक हजारो वर्षं जुना उपाय आहे, असं मानलं जातं की रक्ताची प्रत सुधारण्यापासून ते चांगल्या झोपेसाठी आणि प्रजनन क्षमता वाढवण्यापर्यंत याचे अनेक फायदे आहेत. परंतु या उपायांची व्याप्ती वाढवण्यासाठी 2011 साली प्रदर्शित झालेला शाही दरबाराची काल्पनिक कथा असलेला ‘एम्प्रेसेस इन द पॅलेस’ नावाचा चायनीज टीव्ही कार्यक्रम कारणीभूत होता.
 
“अतिशय हुशारीने ही जाहिरातबाजी करण्यात आली होती," असं प्रा. जॉन्स्टन स्पष्ट करतात.
 
"शोमधील महिला सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी, त्यांच्या त्वचेसाठी आणि प्रजननक्षमतेसाठी दररोज इजियाओचे सेवन करत. त्यावरून हे उच्चभ्रू स्त्रीत्वाचं उत्पादन बनलं. शोकांतिका म्हणजे यामुळे आता अनेक आफ्रिकन महिलांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे."
24 वर्षांचा स्टीव्ह आता काळजीत आहे. गाढवाला गमावल्यानंतर त्याचं आयुष्य उद्धस्त झालंय आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय.
 
"मी एकाच ठिकाणी अडकून पडलोय," असं तो म्हणतो.
 
नैरोबीमधील स्थानिक पशु कल्याण धर्मादाय संस्थेसोबत हातमिळवणी करून ‘ब्रुक’ ही धर्मादाय संस्था स्टीव्ह सारख्या तरुण लोकांसाठी ज्यांना काम आणि शिक्षणासाठी गाढवांची गरज आहे त्यांच्यासाठी गाढवं शोधण्याचं काम करतेय.
 
‘डॉंकी सॅन्च्युरी’च्या जेन्नेक मर्क्स म्हणतात, जितके अधिक देश त्यांच्या गाढवांच्या संरक्षणासाठी कायदे तयार करतील, “व्यापा-यांसाठी तितकं ते अधिक कठीण होणार आहे”.
 
"इजियाओ उत्पादक कंपन्यांनी सरसकटपणे गाढवाच्या कातड्याची आयात करणं थांबवावं आणि शाश्वत पर्यायांमध्ये म्हणजेच सेल्युलर शेती (प्रयोगशाळेत कोलेजन तयार करणे) गुंतवणूक करावी, असं आम्हाला वाटतं. असं करण्याचे सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आधीपासूनच उपलब्ध आहेत."
 
‘डॉंकी सॅन्च्युरी’च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी फेथ बर्डन गाढवाच्या कातडीच्या व्यापाराला "अशाश्वत आणि अमानवीय" म्हणतात.
 
"त्यांची चोरी केली जातीये, ते शेकडो मैल चालतायत, त्यांना असंख्य यातना दिल्या जातायत आणि नंतर इतर गाढवांच्या डोळ्यादेखत त्यांची कत्तल केली जातेय," असं त्या म्हणतात.
 
"या विरोधात बोलण्याची गरज आहे."
‘ब्रूक’ने स्टीव्हला आता एक नवीन गाढव दिलंय. हे एक मादी गाढव असून त्याने तिचं नामकरण ‘जॉय लकी’ असं केलंय, कारण तिच्यामुळे त्याला भाग्यवान आणि आनंदी वाटतं.
 
"मला खात्री की ती मला माझी स्वप्न पूर्ण करण्यात मदत करेल,” असं तो म्हणतो.
 
"मी तिच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेईन.”

Published By- Priya Dixit