बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (10:35 IST)

मलाच इंदुरीकर महाराजांनी पाठिंबाच दिला आहे : थोरात

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर दिसल्यानंतर इंदुरीकर महाराज बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर आता आमदार थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 
 
याआधी संगमनेरमध्ये  मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेच्यावेळी अचानक व्यासपीठावर आलेल्या इंदोरीकर महाराजांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या कानगोष्टींमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना  इंदुरीकर महाराजांच्या उमेदवारीबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, 'इंदुरीकर महाराज हे समाजातील चुकीच्या प्रथांवर बोट ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र, त्यांनी पत्रक काढून राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबाच दिला आहे. समाजप्रबोधन करण्याचे त्यांचे मोठे काम असून त्यामुळे अनेक चुकीच्या प्रथा बंद झाल्या असल्याचेही बाळासाहेब थोरात सांगितले आहे.