शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2015 (11:46 IST)

12 मिनिटात करा मुंबई-दिल्ली प्रवास

हवाई वाहतूक क्षेत्राचा येत्या दोन दशकांमध्ये चेहरामोहरा बदलण्यासाठी ब्रिटिश हवाई वाहतूक कंपनी बीएइ सिस्टिम सध्या हायपरसॉनिक ट्रॅव्हलवर नियोजन करीत असून ही कंपनी त्यासाठी हवाई वाहतुकीतील क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित करणार्‍या कंपनीत मोठी गुंतवणूक करणार आहे. पृथ्वीच्या वातावरणातील आवाजाचा वेग तीन सेकंदात एक किलोमीटर असा असून या कंपनीची हायपरसॉनिक विमाने विकसित झाल्यावर त्यांची गती प्रति किलोमीटर 0.6 सेकंद अशी असेल. म्हणजेच मुंबई आणि दिल्लीतील हवाई अंतर 1163 किलोमीटर आहे. या हायपरसॉनिक विमानाने जायचे म्हटल्यास तुम्हाला केवळ 11.63 मिनिटात मुंबईहून दिल्लीला जाता येईल. 
 
ब्रिटनमधील इंजिनिअरिंग कंपनी रिअँक्शन इंजिन या कंपनीत बीएइ ही कंपनी 20.6 मिलियन युरो गुंतवणार आहे. या कंपनीतील 20 टक्के शेअर्स विकत घेऊन ही गुंतवणूक केली जाणार आहे. रिअँक्शन इंजिनने एअरोस्पेस टेक्नॉलॉजीमध्ये क्रांतिकारक शोध लावल्याचा दावा केला आहे. याला साब्रे टेक्नॉलॉजी असे नाव देण्यात आले आहे. या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन पिढीची अंतराळयाने आणि प्रवासी विमाने तयार केली जाऊ शकतात. याचा व्यावसाकि उपयोग बीएइ ही कंपनी करणार आहे. यासंदर्भातील घोषणा बीएइच्या वेबसाइटवर करण्यात आली असून साब्रे टेक्नॉलॉजीमध्ये जेट आणि रॉकेट टेक्नॉलॉजीचा एकत्रित पद्धतशीरपणे वापर करण्यात आला आहे. 
 
याबाबत रिअँक्शन इंजिनचे प्रधान संचालक मार्क थॉमस म्हणाले की, या नवीन टेक्नॉलॉजीने सध्याच्या व्यावसाकि विमानाप्रमाणे अंतराळयान पृथ्वीवर सहज लँडिंग आणि टेकऑफ करू शकतील. अंतराळात पाठविण्यासाठी भल्यामोठय़ा अंतराळयानाची गरज भासणार नाही.