रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 8 एप्रिल 2021 (21:14 IST)

न्यूयॉर्क नव्हे तर सध्या बीजिंगमध्ये आहेत सर्वाधिक अब्जाधीश

चीनची राजधानी बीजिंगमध्ये सध्या जगातील सर्वाधिक अब्जाधीश आहेत. फोर्ब्सच्या नुकत्याच आलेल्या अब्जाधीशांच्या यादीतून ही माहिती समोर आली आहे.
 
बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील अब्जाधीशांच्या यादीत गेल्या वर्षी 33 जणांची भर पडली.
 
त्यामुळे तेथील अब्जाधीशांची संख्या आता 100 वर गेली आहे. तर 99 अब्जाधीशांसह न्यूयॉर्क दुसऱ्या स्थानी आहे.
 
न्यूयॉर्क गेल्या सात वर्षांपासून याबाबतीत पहिल्या क्रमांकावरच होतं. पण नव्या यादीनुसार आता बीजिंगला हा मान मिळाला आहे.
 
दुसरीकडे, अब्जाधीशांच्या एकूण संख्येचा विचार केल्यास त्याबाबत अमेरिका अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.
 
अमेरिकेत एकूण 724 जण अब्जाधीश आहेत. तर चीनमध्ये अब्जाधीशांची एकूण संख्या 698 इतकी आहे.
 
कोव्हिड-19 संकटानंतर चीनची अर्थव्यवस्था लगेच पूर्ववत होणं, तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये झालेली वाढ, शेअर बाजार वधारणं आदी गोष्टी चीनमध्ये अब्जाधीशांची संख्या वाढण्याचं कारण मानल्या जात आहेत.
 
तथापि, बीजिंग अब्जाधीशांच्या संख्येत न्यूयॉर्कच्या पुढे गेलं असलं तरी अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत न्यूयॉर्क कित्येक पटींनी पुढे असल्याचं आपल्याला दिसतं.
 
बीजिंगमध्ये राहणाऱ्या सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती मिळवल्यास ती 58 अब्ज डॉलर आहे. तर न्यूयॉर्कच्या अब्जाधीशांची सर्व मिळून रक्कम 80 अब्ज डॉलर इतकी भरते.
 
बीजिंगमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जांग यिमिंग हे आहेत. यिमिंग हे टिक-टॉक या व्हिडिओ शेअरिंग अॅपचे संस्थापक आहेत. ते या कंपनीचे मालकी हक्क असणाऱ्या बाईटडान्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
 
यिमिंग यांच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात दुपटीने वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सध्या 35.6 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
 
तर न्यूयॉर्कचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती तेथील माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग हे आहेत. त्यांच्याकडे 59 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.
 
दर 17 तासांत एक नवा अब्जाधीश
यंदाच्या अब्जाधीशांच्या यादीत 493 नव्या व्यक्तींनी प्रवेश केला आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, दर 17 तासांनी एक नवा अब्जाधीश या यादीचा भाग बनतो.
 
सर्वाधिक अब्जाधीशांच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सध्या एकूण 140 अब्जाधीश आहेत.
 
एशियन-पॅसिफिक क्षेत्रात एकूण 1149 अब्जाधीश असून या सर्वांची एकूण संपत्ती 4.7 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. त्यापैकी एकट्या अमेरिकेतील अब्जाधीशांची संपत्ती ही 4.4 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.
 
अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले. गेल्या एका वर्षात बेझोस यांची संपत्ती 64 अब्ज डॉलर्सनी वाढून 177 अब्ज डॉलर्स इतकी बनली.
 
कोरोना संकट आणि ई-कॉमर्स कंपन्यांची चांदी
चीन आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान (टेक) कंपन्यांना कोरोना संकटाचा एकप्रकारे फायदाच झाल्याचं दिसून येईल.
 
या काळात बहुतांश लोकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिलं. तसंच मनोरंजनाकरिताही त्यांनी इंटरनेटचाही आधार घेतला होता.
 
या सगळ्यांचा टेक कंपन्यांचे संस्थापक आणि शेअरधारकांना प्रचंड मोठा फायदा झाला.
 
फोर्ब्सने दिलेल्या आकडेवारीनुसार, चीनच्या यंदाच्या वर्षीच्या आकडेवारीत हाँगकाँग आणि मकाऊ येथील लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.
 
यामुळे चीनच्या यादीत नव्या 210 अब्जाधीशांचं नाव जोडलं गेलं. त्यामुळेच चीन सर्वाधिक अब्जाधीशांचा समावेश असलेला दुसरा देश बनला आहे.
 
चीनमधील बहुतांश अब्जाधीश उत्पादन क्षेत्रातील आहेत किंवा तंत्रज्ञान कंपन्यांशी संबंधित आहेत. यामध्ये महिला अब्जाधीश केट वाँग यांचाही समावेश आहे. वाँग या ई-सिगरेट उत्पादक कंपनीशी संबंधित आहेत.