गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2024 (14:22 IST)

Nvidia मायक्रोसॉफ्ट,अ‍ॅपलला मागे टाकत जगातली सर्वात मोठी कंपनी कशी बनली?

Nvidia
एन्व्हिडिया (Nvidia) ही कंपनी आता जगातली सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी ठरलीय. जून महिन्याच्या सुरुवातीला या कंपनीने अ‍ॅपलला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं होतं. पण मंगळवारी 18 जून रोजी एनव्हिडियाच्या शेअर्सच्या किमतींनी उच्चांक गाठला आणि कंपनीचं मूल्य जगातल्या इतर कोणत्याही कंपनीपेक्षा जास्त झालं.
 
पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या मायक्रोसॉफ्टला मागे टाकत आता एनव्हिडिया जगातील पहिल्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे.
 
एनव्हिडिया कंपनी काय करते? गेल्या काही वर्षांत त्यांनी ही झेप कशी घेतली? नेमक्या कोणत्या तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा होतोय?
 
एनव्हिडिया ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या सॉफ्टवेअर्ससाठी लागणाऱ्या कॉम्प्युटर चिप्स तयार करते. सध्या सगळ्या क्षेत्रांमध्ये AI चा होत असलेला वापर, त्यासंबंधीचे केले जाणारे प्रयोग यामुळे या कंपनीच्या उत्पादनांसाठीची मागणी वाढलेली आहे. परिणामी गेल्या काही वर्षांत त्यांची विक्री आणि होणारा नफा यांच्यात वाढ झालीय.
 
आणि कंपनीच्या उत्पन्नात यापुढे यापेक्षा अधिक वाढ होईल असा गुंतवणूकदारांचा कयास असल्याने एनव्हिडियाच्या शेअर्सच्या किंमती वाढलेल्या आहेत. पण या वाढलेल्या किमतींबद्दलही काहींनी शंका व्यक्त केली आहे.
 
मंगळवारी 18 जूनला एनव्हिडिया कंपनीच्या शेअर्सच्या भावांनी उच्चांक गाठला. या वर्षात आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सच्या किंमती 170% वाढल्याचं ब्लूमबर्गने म्हटलंय. यामुळे कंपनीचं बाजार मूल्य आता 3.34 ट्रिलीयन अमेरिकन डॉलर्स झालंय.
 
पण अगदी 8 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्सचे भाव आताच्या तुलनेत 1 टक्काही नव्हते. मग एनव्हिडियाने असं काय केलं ज्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर आले?
 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एनव्हिडिया
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रणाली विकसित करणाऱ्या डेव्हलपर्समध्ये सध्या प्रचंड मोठी चढाओढ आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल ज्यांच्या मालकीचं आहे ती अल्फाबेट कंपनी, मेटा आणि अ‍ॅपल या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्या AI मधलं प्रॉडक्ट विकसित करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
 
आणि या स्पर्धेचा फायदा एनव्हिडियाला होतोय. कारण AI चिप मार्केटमध्ये या कंपनीचं वर्चस्व आहे.
 
पण एनव्हिडियाचं मार्केटमधलं हे वर्चस्व किती काळ टिकेल याविषयी शंकाही व्यक्त केली जातेय. या क्षेत्रातले कंपनीचे स्पर्धक वाढत आहेत, त्यामुळेच सध्या त्यांच्याकडे असणारा बाजाराचा ताबा टिकवणं त्यांना कठीण जाईल असं बार्क्लेजचे क्रेडिट अॅनालिस्ट संदीप गुप्ता यांनी फेब्रुवारी महिन्यात म्हटलं होतं.
 
ग्राफिक्स चिप्स ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स
एनव्हिडियाचे आताचे सीईओ जेनसन हुआंग हे 1993 मध्ये कॅलिफोर्नियात स्थापन झालेल्या या कंपनीच्या सहसंस्थापकांपैकी एक. त्यावेळी एनव्हिडिया कंपनीचा भर होता गेमिंग आणि इतर अॅप्लिकेशन्ससाठीच्या ग्राफिक्स चिप्सवर.
 
1999 मध्ये या कंपनीने GPU - ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (Graphics Processing Unit) विकसित केलं. यामुळे कॉम्प्युटरचा इमेज डिस्प्ले अधिक चांगला व्हायला मदत झाली. या GPUमुळे अनेक लहान टास्क एकाचवेळी (Simultaneously) करता येणं शक्य झालं. याला पॅरलल प्रोसेसिंग (Parallel Processing) म्हणतात.
 
पण याच GPU चा आणखी एक वापर 2006 साली स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी शोधला. या GPUचा वापर करून गणितावर आधारीत ऑपरेशन्सचा वेग वाढवता येत असल्याचं त्यांना आढळलं. हे काम नेहमीच्या प्रोसेसिंग चिप्स वापरून फारसं वेगाने होत नव्हतं.
 
एनव्हिडिया आणि जेनसंग हुआंग यांनी इथूनच पुढे मग AI च्या विकासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.
 
GPU प्रोग्रॅम करता यावेत यासाठीचं टूल तयार करण्यासाठीच्या संशोधनावर एनव्हिडियाने मोठी गुंतवणूक केली. आणि इथेच एनव्हिडियाने ग्राफिक्सच्या पलीकडे जाऊन नवीन क्षेत्रात आपण काय करू शकतो, याचा विचार करायला सुरुवात केली.
 
एनव्हिडियाच्या कॉम्प्युटर चिप्समध्ये हे नवं टूल जोडण्यात आलं. खरंतर त्या वेळी कॉम्प्युटर गेमर्सना याची गरज नव्हती आणि त्याबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. पण सामान्य माणसासाठी तयार करण्यात आलेला कम्प्युटर आणि हार्डवेअरवर 'हाय परफॉर्मन्स कम्प्युटर' करता येणं ही संशोधकांसाठी मोठी गोष्ट होती.
 
यावरूनच पुढे मग आताच्या आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली पुढची प्रगती झाली.
 
2012मध्ये अॅलेक्सनेट (Alexnet) आलं. असं AI जे फोटो ओळखू - निर्माण करू शकत होतं. एनव्हिडियाचे दोन प्रोग्रॅम करता येण्याजोगे GPU वापरून या अॅलेक्सनेटला ट्रेन करण्यात आलं होतं. नेहमीच्या प्रोसेसिंग चिप्सवर ज्या कामाला महिने लागले असते ते काम काही दिवसांत करण्यात आलं होतं.
 
यानंतर मग एनव्हिडियाने AIसाठी अधिक योग्य असणारे जीपीयू तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यात मोठी गुंतवणूक केली. आणि सोबतच ही टेक्नॉलॉजी वापरणं सोपं करणारी सॉफ्टवेअर्सही त्यांनी तयार केली.
 
दशकभराचा काळ आणि अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर चॅटGPT (ChatGPT) अस्तित्वात आलं आणि AIचं क्षेत्रच बदललं.
 
चॅट GPT आणि एनव्हिडिया
2022 मध्ये ChatGPT लाँच झाल्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्समधला इंडस्ट्रीचा आणि सामान्यांचाही रस प्रचंड वाढला.
 
एनव्हिडियाची 10,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स एकत्र जोडून तयार करण्यात आलेल्या सुपर कम्प्युटरचा वापर करून चॅटGPTचा हा चॅटबॉट ट्रेन करण्यात आला होता.
 
यामुळेच मग एनव्हिडियाचा समावेश मे 2023 मध्ये अशा अमेरिकन कंपन्यांच्या यादीत झाला ज्यांचं मूल्य 1 ट्रिलीयन (1 लाख कोटी) अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. एनव्हिडिया कंपनी अॅपल, अॅमेझॉन, अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्टच्या पंगतीत जाऊन बसली. आणि आता वर्षभराच्या काळात या सगळ्यांपेक्षा मोठी कंपनी बनली आहे.
 
मार्च महिन्यात एनव्हिडियाने अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चिप बाजारात आणली जी तिच्या पूर्वीच्या आवृत्तीपेक्षा 30 पट वेगाने काही कामं करू शकते.
 
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाजारपेठेतील 80% कंपन्या एनव्हिडियाची उत्पादनं वापरतात.
 
अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय या कंपन्या एनव्हिडियाची ही नवी AI चिप त्यांच्या क्लाऊड कम्प्युटिंग सेवा आणि त्याची AI उत्पादनं यासाठी वापरण्याची शक्यता असल्याचं जेनसेन हुआंग यांनी म्हटलं होतं.
 
ही AI चिप लाँच करतानाच एनव्हिडियाने आणखीही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. म्हणजे त्यांनी अशा काही नवीन चिप्स आणल्या आहेत ज्यामुळे एखाद्या कारच्या आतमध्ये चॅटबॉट वापरता येऊ शकतो. BYD आणि Xpeng (उच्चार - शाओपंग) या इलेक्ट्रिक कार्स तयार करणाऱ्या चायनीज कंपन्या या चिप्स वापरणार असल्याचं एनव्हिडियाने म्हटलंय.
 
एनव्हिडियाचं भविष्य काय?
सध्या AIच्या क्षेत्रात एनव्हिडियाचं पूर्ण वर्चस्व असलं तरी दीर्घकाळ हे टिकेल का याविषयी शंका असल्याचं TIRIAS रिसर्चचे केव्हिन क्रेवेल म्हणतात. ते म्हणतात, "एनव्हिडिया हे एक असं टार्गेट आहे जे ओलांडण्याचं प्रत्येकाचं उद्दिष्ट आहे."
 
या क्षेत्रातल्या एनव्हिडियाच्या स्पर्धक कंपन्या आहेत AMD आणि Intel. या दोन्ही कंपन्या CPU - सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स निर्मितीसाठी ओळखल्या जातात. पण त्यांनीही आता AI साठीची GPU तयार करण्यासाठी कंबर कसली आहे.
 
याशिवाय गुगलने त्यांची टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स - TPU (Tensor Processing Units) काही मशीन लर्निंग टास्कसाठी वापरायला सुरुवात केली आहे. तर अॅमेझॉनने AI मॉडेल्स विकसित करण्यासाठी स्वतःची चिप तयार केली आहे.
 
मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांनीही स्वतःची AI चिप विकसित करण्यासाठी काम सुरू केलं आहे.
 
याशिवाय AI साठीच्या जीपीयू निर्मिती क्षेत्रात काही स्टार्टअप कंपन्या नव्या दमाने उतरल्याने भविष्यात एनव्हिडियाला मोठी स्पर्धा असणार आहे.
 
Published By- Dhanashri Naik