शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified गुरूवार, 1 एप्रिल 2021 (13:16 IST)

Nirmala Sitharaman: ‘नजरचुकी’ला माफी नाही; सरकारवर जोरदार टीका

अल्पबचत योजनांवरील व्याज दरांत कपात करण्याचा आदेश नजरचुकीनं काढला गेल्याचा खुलासा करत, केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, विरोधकांनी सरकारच्या या ‘नजरचुकी’वर शरसंधान साधण्याची संधी सोडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
 
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसह (PPF) अल्प मुदतीच्या अन्य बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल रात्री उशिरा केली होती. मात्र, हा निर्णय काही तासांतच बदलून व्याज दर कपात मागे घेण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी तसं ट्वीट केलं. नजरचुकीनं हा आदेश निघाल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सीतारामन यांचं ट्वीट रीट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नोटबंदी असो की करोनाची लस मोफत पुरविण्याच्या आश्वासन असो, भाजपचे सरकार प्रत्येक वेळी देशातील जनतेची थट्ट करत आलं आहे. निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज्यांनी तर हा अनुभव हमखास घेतला आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली. कोट्यवधी ठेवीदारांची केंद्र सरकारनं थट्टा केली. यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीनं घेतले गेले असावेत,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. #NationalJumlaDay असं हॅशटॅगही त्यांनी ट्वीट केलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही केंद्राच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. ‘नजरचूक ही खरी अडचण नाही. केंद्र सरकारच्या अर्थखात्याकडील दूरदृष्टीचा अभाव ही खरी अडचण आहे,’ असं तपासे यांनी म्हटलं आहे. तर, केंद्र सरकारनं आता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.