शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (13:18 IST)

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना वेग ; केंद्रीय मंत्री मंडळ घेणार मोठा निर्णय

indian railway
रेल्वे मंत्रालयाने  मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे-संगमनेर- नाशिक मार्गावर वेगवान प्रवासासाठी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा निर्णय घेतला असून या प्रकल्पावर आता काम देखील सुरु झाला आहे.
 
या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या 1,450 हेक्टर जागापैकी 30 हेक्टर खासगी जागा संपादन संपादन देखील करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून  देण्यात आली आहे. याबरोबर  सरकारी आणि वन जमीन संपादनाचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून निती आयोगाच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे  सादर करण्यात आला आहे.
पुणे – नाशिक असा थेट मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे या तिनही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकर्‍यांचा शेतमाल ने-आण करण्याची मोठी सविधा निर्माण होणार आहे.
त्यासाठी 102 गावांमधील एक हजार 450 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये सरकारी आणि वन जमिनीचाही समावेश आहे. आतापर्यंत 30 हेक्टर खासगी जागा संपादित करण्यात आली असून ही प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांमार्फत राबविली जात आहे.
 
त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना मोबदलाही देण्यात येत आहे. एप्रिलमध्ये या प्रकल्पाला निती आयोगाने मंजुरी दिली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लवकरच अंतिम मंजुरीही मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.