गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (10:14 IST)

गुदगुल्या करणारं नाटक; "आने भी दो यारो"...

नाटक म्हटलं की मराठी माणसाचा जीव की प्राण... अतिशयोक्ती अलंकारात म्हणायचं झालं तर एकवेळ मराठी माणूस अन्नाशिवाय राहू शकेल. पण नाटक आणि राजकारण याशिवाय तो काही राहू शकत नाही. त्यात मराठी आणि गुजराती रंगभूमी नेहमीच हातात हात घालून चालत आलेली आहे. कित्येक मराठी कलाकार गुजराती नाटकात काम करतात आणि कित्येक गुजराती कलाकार मराठी नाटकात काम करतात. पांडुरंगाच्या दारी जसा कसलाच भेदभाव नसतो. तसा भेदभाव रंगभूमी सुद्धा कधीच करत नाही आणि एक रंगकर्मी म्हणून मला स्वतःला नेहमीच रंगभूमी ही पंढरी वाटली आहे. कलाकारांची ती पंढरीच...
 
इतक्या वर्षात काही मराठी नाटकं पाहिली, एकांकिका, दीर्घांकं पाहिले. पण गुजराती नाटक पाहण्याचा योग मात्र पहिल्यांदाच आला... फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या कृपेमुळे गुजराती चित्रपट पाहण्याचा योग बर्‍याचदा येत असतो. मराठमोळं मेस्त्री हे आडनाव कित्येकांना गुजरातीतलं मिस्त्री वाटतं, त्याचे असे काही फायदे असतात. याचे काही तोटेही असतात, पण ते इथे सांगत नाही. असो... तर आज गुजराती नाटक पाहण्याचा योग आला आणि नाटकाचं नाव आहे "आने भी दो यारो"... अर्थात नावात थोडं साम्य असल्यामुळे कुंदन शाह ह्यांचा "जाने भी दो यारो" हा धम्माल विनोदी चित्रपट लगेच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. चित्रपटात विनोदी प्रसंग निर्माण रंगवणं नाटकाच्या तुलनेने सोपं असतं. कारण चित्रपटात स्क्रिनप्ले असतात. सोपं म्हणजे पान खाण्या इतकं सोपं असतं असं नाही म्हणायचं मला. पण नाटकाला खूप बंधनं असतात, मर्यादा असते, त्यातून बर्‍याच गोष्टी तुम्हाला रंगभूमीवर म्हणजे एका स्टेजवर दाखवायच्या असतात या अर्थाने सोपं असं म्हटलं आहे. एक छोटीशी घटना वा विषय आणि त्यातून उलगडत जाणारी कथा... हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. नाटक विनोदी आहे हे पडदा उघडल्यानंतर लगेच आपल्याला कळतं. नाटकाचा जॉनर प्रेक्षकांना कळू देण्यासाठी वेळ घालवलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पहिल्या एंट्रीपासून हे नाटक प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी झालंय. नाटकाची कथा म्हणजे, एक मध्यमवर्गीय माणूस काही कारणांमुळे कर्जात बुडालेला आहे. ते कर्ज त्याने पठाणाकडून घेतलंय. त्याची वसूली करण्यासाठी एक भाई त्याच्या मागे लागलाय. हे त्या माणसाच्या मुलाला माहित आहे. मग एके दिवशी त्या माणसाचा कोट हरवतो. आता एक पोलिस हवालदार तो कोट घेऊन घरी येतो. कारण तो कोट घातलेला माणूस एका ऍक्सिडेंटमध्ये मेला आहे आणि सरकारने मेलेल्या माणसाच्या कुटुंबाला ५ लाख रुपये देण्याचं घोषित केलंय. तेव्हा मुलाच्या डोक्यात एक आयडिया शिजते की जर आपला बाप मेलाय असं दाखवलं तर आपल्याला ५ लाख रुपये मिळू शकतात. हे तो आपल्या बापाला सांगतो आणि दोघं मिळून एक प्लान रचतात. मग पुढे काय होतं? त्यांची कशी दमछाक होते? मग ते पोलिसांच्या तावडीत सापडतात की त्यांना चुना लावतात? हे जाणून घेण्यासाठी नाटक पाहायला हवं.
नाटकातली भाषा साधी सरळ बोली भाषा आहे. म्हणून तुम्हाला गुजराती येत नसलं तरी सुद्धा नाटक समजतं. दुसरी गोष्ट अभिनेते देहबोलूत इतकं काही बोलून जातात की इथे भाषेचं बंधन उरत नाही. चार्ली चाप्लिनचे सिनेमे तर मूकपट होते तरी सुद्धा ते आपल्याला कळतातच. याचं कारण सादरीकरण उत्तम असतं. असंच या नाटकाबद्दल म्हणता येईल. हरीकृष्ण दवे ह्यांनी नाटकात जीव ओतलाय. पहिल्या प्रसंगात जो स्टॅमिना दिसतो तोच स्टॅमिना ते शेवटच्या प्रसंगापर्यंत टिकवून ठेवतात. टायमिंग, स्लॅपटिक, गिव्ह ऍण्ड टेक अशा सर्वच बाबतीत ते खूप उजवे ठरतात. त्यांच्या मुलाचा रोल केलाय जिमित त्रिवेदीने. जिमितला आपण काही हिंदी सिनेमांत पाहिलंय. तो गुजराती सिनेमांचा हिरो देखील आहे. जिमितची टायमिंग सुद्धा भन्नाट आहे. त्याने स्वतःला बरंच कंट्रोल्ड ठेवत कॉमेडी केलीय हे विशेष आहे. अर्थात सगळ्याच सपोर्टिंग कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. पण ज्या प्रसंगात दवे आणि जिमित आहेत ते प्रसंग वेगळ्याच उंचीवर गेले आहेत. ते दोघं मिळून स्टेजवर जे काही करतात, त्याला नक्की काय नाव द्यायचं हे कळत नाही. पण तुम्ही डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसत असता हे मात्र खरंय.
 
नाटकातील अनेक विनोद नवीन आहेत... विनोद नाटकातल्या सिच्युएशनला धरुन आहेत. म्हणून कंटाळा येत नाही. याचं श्रेय लेखकाला दिलं पाहिजे. पण दिग्दर्शक हा नेहमी लेखकाच्या १०० पावलं पुढे असतो आणि हे नाटक पाहताना आपल्याला दिग्दर्शकाची जादू जाणवत राहते. म्हणजे जादूगाराने एखादी छडी फिरवावी आणि अचानक त्यातून काही निर्माण व्हावं अशाप्रकारे हे नाटक दिग्दर्शकाने निर्माण केलं आहे. तुम्हाला विचार करायला वेळ मिळत नाही. इतकं काही रंगमंचावर घडत असतं. एक विनोद संपला आणि तुम्ही हसायचे थांबता तोच दुसर्‍या विनोदाने तुम्हाला हसवायला सुरुवात केलेली असते. इथे हसण्यापासून विश्रांती घेण्याची मुभा तुम्हाला मिळत नाही. हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. तर दिग्दर्शनाची धुरा पेललीय धीरज पालशेतकर ह्यांनी. पालशेतकर ह्यांचा विनोदात हातखंडा आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा असो किंवा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कोणत्याही मालिका असो. त्यातून विनोद हा सहज निर्माण होतो. विनोद निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही. जर्मन तत्वज्ञानी इम्युअल कांट ह्यांच्या मते विनोद म्हणजे अपेक्षाभंग. पण विनोद घडल्यानंतर अपेक्षाभंग झाला तर तो विनोद पडतो. असा अपेक्षाभंग नाटक पाहताना होत नाही. वामन केंद्रे एका मुलाखतीत म्हणाले होते "विनोदी नाटकं ही खुर्चीतून उठतानाच संपलेली असतात! नाटक डोक्यात घेवून प्रेक्षक घरी गेला पाहिजे..." तर मला वाटतं की "आने भी दो यारो" हे नाटक खुर्चीला गदागदा हलवणारं आहे. कारण तुम्ही पोट धरुन हसल्यावर खुर्ची गदागदा हलणारच. दुसरी गोष्ट लोक नाटक डोक्यात ठेवून घरी जातात. कारण तुम्हाला कुणी सारखं सारखं गुदगुल्या कराव्यात आणि तुम्ही हसावं अशा पद्धतीने ते विनोद जणू तुमच्या मनाला गुदगुल्या केल्याप्रमाणे आठवतात आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा हसवतात हे या नाटकाचं यश आहे. लेख वाढवण्यापेक्षा एवढंच सांगीन की नाटक थिएटरमध्ये जाऊन पाहा आणि चिल मारा...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री