शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2019 (12:53 IST)

परळ येथील हाफकीन संस्थेत बेटिक-आयआयटी मुंबईतर्फे आयोजित ‘मेधा’ हॅकेथॉनमध्ये

Students brainstorming
१५ सेकंदात होणारी पीएच (pH) मोजणी, सीपीएपी उपकरण इत्यादी संकल्पना सादर
 
हाफकीन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेत द मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन (‘मेधा’) ही स्पर्धा १३-१४ जुलै रोजी पार पडली. या स्पर्धेत १० टीम्सनी नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणांची संकल्पना मांडली आणि वरिष्ठ डॉक्टर व अभियंत्यांसमोर सादर केली.
 
प्रत्येक टीममध्ये वैद्यकीय, डिझाइन, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक शाखांची पार्श्वभूमी असलेले सदस्य होते. आयआयटी मुंबईच्या बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी इनोव्हेशन सेंटर (बेटिक) या विभागाद्वारे केजे सोमैया अभियांत्रिकी महाविद्यलाय आणि नवी मुंबई येथील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस या संस्थांच्या सहकार्याने हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
 
या स्पर्धेसाठी एकूण १४० सहभागी स्पर्धकांमधून या ४० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. वैद्यकीय व्यावसायिकांनी समोर ठेवलेल्या २० वैद्यकीय समस्यांमधून त्यांनी एका समस्येची निवड केली. त्यांनी सादर केलेल्या उपाययोजनांमध्ये १५ सेकंदात पीएच पातळी मोजणारे उपकरण (पारंपरिक उपकरणाने दोन तास लागतात), स्लीप अॅप्नियासाठी नवे सीपीएपी उपकरण जे हवेचा दाब मोकळा करण्यासाठी व्हॉल्व्ह उपलब्ध करून देते आणि एक असे उपकरण जे अपघातग्रस्त ठिकाणी नेऊन गुडघ्याखालील अवयव कापण्यासाठी स्टम्प म्हणून वापरता येऊ शकेल यांचा समावेश होता.
 
इतर वैद्यकीय समस्यांमध्ये सीपीआर परिणामकारकतेचे मोजमाप, इंटेलिजंट ओटी लाइटनिंग यंत्रणा, लॅपरोस्कोपिक कॅमेऱ्यांसाठी डिफॉगर, एकाच कृतीने रक्तातील शर्करेची पातळी मोजणे, लॅरिन्जेक्टोमी करताना व्हॉइस प्रोस्थेसिसची स्वच्छता आणि क्लबफूट व्यंग मोजणे इत्यादी समस्यांवर उपाययोजना सादर करण्यात आल्या.
 
ही हॅकेथॉन शनिवारी सकाळी सुरू होऊन रविवारी संध्याकाळी या स्पर्धेची सांगता झाली. या कालावधीत बेटिकमधील वरिष्ठ इनोव्हेटर्सनी सहभागी स्पर्धकांना सातत्याने मार्गदर्शन केले. हाफकीन संस्थेच्या संचालक निशिगंधा नाईक आणि बेटिकचे संस्थापक प्रा. बी. रवी यांनी या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसे दिली.
हाफकीन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेच्या संचालक डॉ. निशिगंधा नाईक (पीएचडी) म्हणाल्या, "वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी सहभागी स्पर्धकांकडे केवळ २४ तास होते. परीक्षण समितीच्या सदस्यांनी दिलेल्या प्रोत्साहनपर आणि सकारात्मक प्रतिक्रिया पाहता हे निकाल खरेच लक्षणीय आहेत."
 
बेटिकचे एसईओ डॉ. रुपेश घ्यार म्हणाले, "स्पर्धकांसमोर तीन अनिश्चितता होत्या: समस्या काय आहे; ते कोणत्या टीम सदस्यांसोबत काम करणार आहेत; आणि कोणती साधने उपलब्ध असतील. डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स एकत्र येऊन कमी वेळात किती उत्तम परिणाम साध्य करू शकतात हे ‘मेधा’मधून दिसून येते."
 
संकल्पना प्रतिकृतींसह परीक्षक सदस्याच्या पॅनसमोर सादर करण्यात आल्या. परीक्षकांमध्ये डॉ. नितीन महाजन, डॉ. प्रशांत होवाळ, डॉ. आर. जी. करंदीकर, डॉ. उषा शर्मा, डॉ. नीलम शिरसाट, डॉ. शारदा मेनन, डॉ. रजनी मुल्लेरपाटण, डॉ. रमेश लेकुरवाळे, डॉ. राजेश पाटील, डॉ. रमेश पुडाले आणि रिटा गुप्ता यांचा समावेश होता.
 
बेटिकचे संस्थापक प्रा. बी. रवी म्हणाले, "बेटिकने आयोजित केलेले हे ‘मेधा’चे ९ वे पर्व होते. हाफकीन संस्थेशी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या संस्थेत बेटिकची शाखा सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करारावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. राज्यभरात बेटिकची १४ केंद्रे असून नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या केंद्रांचे जाळे तयार झाले आहे.
 
पारितोषिक स्वीकारताना मनोगत व्यक्त करताना एका स्पर्धक म्हणाला, "आपल्याला वेगाने पुढे जायचे असेल तर आपण एकट्याने जावे, पण आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा असेल तर आपण एकत्र गेले पाहिजे. पण ‘मेधा’च्या अनुभवातून दिसून येते की, वेगाने आणि पुढील टप्प्यावर जाणेही शक्य आहे."