शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (15:16 IST)

झोका ....एक झोका ....

नुसतं नाव घेतलं तरी अलगद हवेत तरंगून आल्या सारख वाटतं. वाऱ्याशी हितगुज करून आल्या सारख वाटत.
आपण बाळ असल्यापासून आपली अन झोक्याची ओळख आपली आई करून देते.एकदा का झोळीत झोपलं की आई पण निवांत आणि बाळ पण मुठी चोखत त्या मंद तरंगावर झुलत झोपी जातं. खूप गाढ अन सुखद झोप लागते.

नंतर आपण बागेतल्या झोपळ्या शी बोलायला शिकतो, मित्र मैत्रिणी समावेत,त्यावर झुलण्याची मजाच काही और असते.

गावाकडे "नागपंचमी"च्या दिवशी झाडावर मोठ्या दोरखंड बांधून झोका तयार करतात आणि आया बाया त्यावर अख्खा दिवस गाणी म्हणत झुलत असताना मी बघितलं आहे, झुलली सुध्दा आहे.

स्त्री जीवनात तर तिच्या आंनदाच्या अत्युच्य क्षणी त्याचे महत्व काही वेगळं असत, आई बाळ होणार , डोहाळे पुरवायला म्हणून लेकीला माहेरी आणते.सातव्या महिन्यात "पाळणा"करतात, डोहाळे म्हटले जातात, सजावट होते पाळण्याची, आणि त्याचे रूपंच पालटते!

कित्ती सुंदर दिसतो तो ही !हळूहळू झोका घेत, पुढल्या येणाऱ्या सुखाची कल्पना करीत "ती"अलगद त्यावर स्वप्न संगवित झोका घेते!

पूर्वी घरात "छापरी"असायची अन तीत एक बंगई असायची .त्यामुळे छापरी ची शान काही औरच दिसायची. घरातील लहानगे, तर त्यावर पडलेले च असायचे. जेष्ठ आजोबा वगैरे "पान पुडा"घेऊन मस्त कपूरी पान त्यावर बसून लावत असत.

आताशा त्याचे आधुनिक स्वरूप मिळू लागले आहे, वेताचे, लोखंडी, वायरचे असे नाना विध प्रकार आहेत.पण आवड मात्र कमी झालेली नाही.

आज ही लोकं मोठ्या शौकने तो घेतात व आपली झुला घ्यायची आवड निगुतीने जोपासतात.

खेड्यात आज ही झाडाच्या मोठ्या फांदीवर दोरखंड लावून तो तयार केला जातो, समुद्र किनाऱ्यावर वेगळ्या प्रकारचे झोके दिसून येतात.

जिथं महिलांना मजुरी वर जावे लागते,तिथं ती आई आपल्या साडीची झोळी कुठला सा आधार घेऊन बांधते आणि आपलं बाळ त्यात निजवते,आणि पोटाची खळगी भरायला म्हणून तिथं मजुरी करते, पण सतत एक कटाक्ष मात्र तिकडे देतेच, तिची नजर तिकडे बरोबर असते.

असा हा झोका,प्रत्येकाला आपलंसं करणारा अन एका वेगळ्या दुनियेत नेणारा असतो ह्यात मात्र शं का नाही !!
 
देवादीकाना सुद्धा त्याचा मोह सुटलेला नाही मग आपण तर .....!
.......अश्विनी थत्ते.