Last Modified शनिवार, 16 जानेवारी 2021 (09:15 IST)
दातांमध्ये टोचल्यासारखे दुखत असेल, काही खाल्ल्यावर, चावल्यावर वेदनांमध्ये वाढ होत असेल तर हे जंतुसंसर्गाचे किंवा दात तुटल्याचे लक्षण असू शकते. दातांमध्ये कोणीतरी टोकदार वस्तू टोचत असल्याची जाणीव होत असेल तर तातडीने दंततज्ज्ञांना भेटायला हवे. दातांच्या वेदनेचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी क्ष-किरण चाचणी केली जाते.
* दातांच्या आरोग्याशी संबंधित नसणार्या काही कारणांमुळेही दातदुखी निर्माण होऊ शकते. सायनससारख्या त्रासामुळे दात दुखू शकतात.
* संवेदनशीलता हे दातांच्या वेदनेचे एक कारण असू शकते. गोड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखे वाटत असेल तर तुमचे दात संवेदनशील झाले आहेत, असे समजावे. दातांवरचे आवरण निघून गेल्यास, विरळ झाल्यास किंवा हिरड्यांच्या समस्येमुळे दात संवेदनशील बनू शकतात. या समस्येवरचा उपाय शोधणे गरजेचे आहे.
* दातांचे दुखणे हा गंभीर आजार नसलातरी अनेकदा या वेदना असह्य होतात. दातदुखी असताना तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. खूप अस्वस्थ वाटत राहते. अनेकदा दातदुखी आपोआप बरी होते. पण कॅव्हिटी किंवा जंतुसंसर्ग असेल तर मात्र डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.