मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : सोमवार, 22 जुलै 2024 (08:57 IST)

'काहीच नाही' तेनालीरामांची युक्ती

Tenali Ramakrishna
तेनालीराम राजा कृष्णदेव राय यांना फार जवळचे होते. त्यामुळे राजाच्या दरबारातील इतर मंडळी त्यांचा द्वेष करत असे. त्या मंडळीत एक रघु नावाचा व्यवसायी होता तो फळ विकण्याचे काम करायचा.
 
एकदा त्याने तेनालीराम विरुद्ध कट रचला आणि त्याला राजाच्या समोर खाली पाडण्यासाठीची योजना आखली. त्याने एके दिवशी तेनालीला आपल्या दुकानात फळ घेण्यासाठी बोलावले आणि तेनालीने फळे घेतल्यावर पैसे विचारल्यावर त्याने हसून उत्तर दिले की 'अरे तेनालीजी ह्याचे पैसे आपल्यासाठी काहीच नाही'. हे ऐकल्यावर तेनालीने स्मितहास्य करत त्यामधून काही फळ खाल्ले आणि बाकीचे आपल्याबरोबर घेऊन आपल्या घराकडे निघाले. तेवढ्यात रघुने त्यांना अडविले आणि मला माझ्या फळांचे पैसे द्या, असे म्हणू लागला. 
 
त्यावर तेनाली म्हणे की आपणच तर सांगितले न की ह्या फळाचे पैसे काहीच नाही. मग आता आपण आपल्या गोष्टीवरून का फिरत आहात. असे ऐकल्यावर रघु चिडला आणि तेनालीला म्हणाला 'की हे बघ माझे हे फळ काही फुकटात येत नाही. मला माझ्या फळांचे पैसे दे नाहीतर मी महाराजांकडे तुझ्या विरुद्ध तक्रार करून तुला शिक्षा करण्यास सांगेन. 
 
तेनाली वाटेतून चालत चालत हाच विचार करत होते की या रघुने माझ्या विरुद्ध केलेल्या कट कारस्तानाचे ह्याला काय उत्तर देऊ. असा विचार करत त्यांना एक युक्ती सुचते. दुसऱ्या दिवशी सांगितल्या प्रमाणे रघु महाराजांकडे फिर्याद घेऊन पोहोचतो आणि घडलेले सर्व सांगतो. राजा कृष्णदेव राय तेनालीला बोलावतात आणि त्याला त्याचे दाम देण्यास सांगतात. तेनालीराम जणू तयारच बसलेले होते. 
 
राजांनी त्यांना सफाई देण्यास सांगितल्या बरोबरच त्यांनी आपल्या बरोबर आणलेली एक चमकदार मोठी पेटी रघुला देत म्हटले की हे घ्या तुमच्या फळांची किंमत. 
 
एवढी मोठी पेटी बघितल्यावर रघुला वाटते की एवढ्या मोठी पेटीत खूप सोन्याची नाणी, हिरे दागिने असणार. आता मी खूप श्रीमंत होणार. असा विचार करत त्याने ती पेटी उघडतातच जोरात ओरडला की अरे या पेटीमध्ये तर 'काहीच नाही'. 

होय, आता यामधील तुझं 'काहीच नाही' घे आणि इथून चालता हो, असे तेनाली म्हणाले. 
 
हे ऐकून त्या दरबारातील सर्व मंडळी हसू लागतात आणि रघुला रिकाम्या हाती आपल्या घरी परतावे लागते. अशा प्रकारे तेनालीरामने रघुला सडेतोड उत्तर दिले. तेनालीरामने पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेने महाराज कृष्णदेवराय यांचे मन जिंकले होते.