मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By वेबदुनिया|

बिरबलाची खिचडी

थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो.

तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते.

अकबर विचारतो, दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक, होय म्हणतो. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणार्‍या माणसास उब मिळाल्याचे अनुमान अकबर काढतो.आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो.

तो ‍गरीब माणूस बिचारी दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, 'तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.'

दुसर्‍या दिवशी दरबार भरतो. रोज वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. बिरबल खिचडी शिजल्यानंतरच येणार असल्याने राजा दरबाराच्या कामास सुरवात करतो. दुपार झाल्यावरही बिरबल न आल्याने राजा सेवकाला पाठवितो. दूसरा सेवकही बिरबलाची खिचडी झालीच नसल्याचे सांगतो.

अकबराला आश्चर्य वाटते. दरबार संपतो तरी बिरबल येत नाही म्हणून अकबरच त्याच्या घरी जातो. तेथे गेल्यानंतर पाहतो तो काय. बिरबलाने छोटी चूल पेटवून बर्‍याच उंचीवर एका मडक्यात खिचडी शिजायला ठेवलेली असते. अकबर हसतो आणि म्हणतो, अरे बिरबल तू एवढा हुशार आणि चतुर. मग तुला एवढे समजत नाही, की खिचडी आणि विस्तवात एवढे अंतर असेल तर ती तापेल कशी?

तेव्हा बिरबल म्हणतो, 'क्षमा असावी महाराज, दूरच्या दिव्याची उब घेऊन एखादा माणूस रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो, मग याच न्यायाने खिचडी शिजायला काय हरकत आहे? राजाच्या चूक लक्षात येते. रात्रभर पाण्यात उभा राहणारया माणसाला तो तातडीने बोलावणे पाठवून शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देतो.