अनेक लोकांना जर असं वाटतं की खिचडी फक्त रुग्णांचेच खाद्यपदार्थ आहे. तर हा आपला मोठा गैरसमज आहे. खिचडीला वेगवेगळे साहित्य वापरून आपण रुचकर बनवू शकतो. आरोग्यासाठी ही फायदेशीर असते. आपणं खिचडी चे 5 फायदे जाणून घेऊ या. आणि 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपणं खिचडी बनवून तिला रुचकर बनवू शकता. तर जाणून घेऊया खिचडी बनविण्याच्या सोप्या पद्धती.
खिचडी
साहित्य : 1 वाटी तांदूळ, पाव वाटी मुगाची पिवळी डाळ (मोगर), 1 मोठा चमचा साजूक तूप, हळद, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, चवीपुरते मीठ.
कृती : सर्वप्रथम तांदूळ आणि मुगाची पिवळी डाळ (मोगर) स्वच्छ करून 3 ते 4 पाण्याने धुऊन घ्या. अर्धा तास भिजू द्या. आता कुकर मध्ये धुतलेले डाळ तांदूळ एकत्र टाकून पाणी टाका. मीठ टाकून कुकरचे झाकण लावून ठेवा. 2 शिट्ट्या घेऊन गॅस बंद करा. कुकर गार झाल्यावर एका भांड्यात साजूक तूप गरम करून जिरे फोडणीला टाका. त्यावर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढी पत्ता टाकून फोडणी तयार करून तयार झालेल्या खिचडीवर टाकून स्वतः याचा आस्वाद घ्या.
*******
दही खिचडी
साहित्य : 1 वाटी शिजवलेले तांदूळ, 2 कप दही, 2 चमचे तेल, 1 चतुर्थांश कप दूध, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा मोहरी, दीड चमचे आलं, 2 चमचे कोरड्या नारळाचा किस, अर्धा चमचे मीठ.
कृती : सर्वप्रथम एका पात्रात तेल गरम करण्यास करून त्यात मोहरी घाला. मोहऱ्या तडतडायला लागल्यावर हरभरा डाळ आणि उडीद डाळ टाका. 1 मिनिटाने आलं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाका. 1 मिनिटे चांगले परतून नंतर गॅसवरून काढून घ्या. ह्यात तांदूळ, मीठ, नारळाचा किस टाका. आता या तयार खिचडीला दही आणि दुधासोबत सर्व्ह करावे.
********
व्हेजिटेबल खिचडी
साहित्य : 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी मुगाची सालीची डाळ, 1 बटाटा, 2 हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, पाव वाटी वाटाणे, हिंग, जिरे, मोहरी, हळद, फोडणीसाठी, 1 बारीक काप केलेले आलं, अर्धा चमचा काळी मिरी आणि लवंग पावडर, साजूक तूप, मीठ आणि तिखट चवीपुरती.
कृती : सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ वेग वेगळे पाण्यात भिजवून ठेवा. आलं चांगले बारीक करा. कुकरमध्ये साजूक तूप टाकून गरम करा आणि त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि किसलेले आलं घालून चांगले परतून घ्या. आता सर्व चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्या. आता धुऊन ठेवलेले डाळ आणि तांदूळ यामध्ये मिसळा. थोड्या वेळ परतून घ्या. आता 3 वाट्या पाणी घालून तिखट मीठ घालून कुकराचे झाकण लावा. 1 शिट्टी घेऊन गॅस बंद करा. वाढताना काळी मिरीचे पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरम खिचडी लिंबाच्या फोडी बरोबर सर्व्ह करा.
बऱ्याचशा साहित्यांना वापरून तयार केली पौष्टिक खिचडी आपल्या आरोग्यास फायदेशीर असते. याचे 5 फायदे आहे.
1 डाळ, तांदूळ, भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून तयार केलेली खिचडी चविष्ट आणि पौष्टिक असते. या पासून शरीराला पोषण आणि ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले पौष्टिक तत्त्व एकाच वेळी शरीरास मिळतात.
2 पचन शक्ती कमकुवत झाल्यास सुद्धा अन्नपचन लवकरच होतं. पचनक्षमता सुधारण्यासाठी रुग्णांना खिचडी खायला दिली जाते. कारण त्यावेळी त्यांची पचन शक्ती कमकुवत झालेली असते.
3 स्त्रियांमध्ये गरोदरपणात बद्धकोष्ठता आणि अपचनाची स्थिती उद्भवते. अश्या अवघडलेल्या अवस्थेत सुपाच्य खाणेच फायदेशीर असतं. ही खाल्ल्यास जेवण पचून सुद्धा लवकर जातं. कोठा जड होतं नाही.
4 एखाद्या वेळेस स्वयंपाक करावयाचा कंटाळा आला असल्यास खिचडी सर्वात सोपा मार्ग आहे. पटकन बनणारी, चविष्ट, अशी ही खिचडी आपणं वेगवेगळ्या डाळी वापरून, शेंगदाणे घालून, बनवू शकतो.
5 साजूक तूप, दही, लिंबू किंवा लोणच्यांसह खाल्ल्याने चव पण येते. साजूक तुपाने शक्ती मिळते. तुपाचा वापर नैसर्गिक तेलकटपणा पण देतो. दह्याबरोबर खाल्ल्याने अति फायदेशीर असते. लिंबामधून व्हिटॅमिन सी मिळते. हे शरीरास फायदेशीर असतं.