गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:08 IST)

राज्यात रक्ताचा तुटवडा, सर्व खासगी रक्तपेढ्यांनाही रक्तदान शिबिराचे आयोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सामाजिक संस्था, मंडळांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करत आहे. सध्या मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून, मुंबईमध्ये तीन हजार युनिट इतकाच रक्त साठा असून, हा रक्तसाठा किमान आठवडाभर पुरेल इतकाच आहे. त्यामुळे रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी परिषदेकडून विविध उपाययोजना आखण्यात येत असून, सर्व खासगी रक्तपेढ्यांनाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा, महाविद्यालये बंद असून खासगी कार्यालये, बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वर्कफॉर्म होम सुरु आहे. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरात सध्या रक्तदान शिबिर मोजक्याच ठिकाणी होत आहे. परिणामी, मुंबईसह राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सध्या गरजेपेक्षा कमी म्हणजे ५० टक्के रक्तदान होत आहे. मुबंईमध्ये सध्या तीन हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध असून, दररोज किमान ५०० ते ८०० युनिट रक्ताची गरज लागत आहे. त्यामुळे उपलब्ध रक्तसाठा हा किमान आठवडाभर पुरेल इतकाच आहे.
 
मुंबईसह राज्यातील संभाव्य रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी सर्व रक्तपेढ्यांना सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थांशी संपर्क करून कोरोनाच्या नियमांचे पालन करत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना परिषदेकडून देण्यात आले आहेत. तसेच धार्मिक संस्था, गृहनिर्माण सोसायट्या, बैठ्या चाळीतील रहिवाशांना रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्याबाबत सूचना केल्या आहेत. याशिवाय रक्तसंकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर भर देण्यात यावा. तर राज्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी सर्व रक्तपेढ्यांनी घ्यावी असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आले आहेत.