बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (07:53 IST)

शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खुर्चीवरून खाली ओढण्याचे पुण्य जर तुम्हाला मिळत असेल तर खुशाल कमवा

uddhav thackeray
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताना त्यांनी आपल्या विधानपरिषदेच्या सदस्यात्वाचा देखिल राजीनामा दिला. न्यायदेवतेचा निर्णय आपणास मान्य असून मला खेळ खेळायचा नाही. ज्यांना सत्तेची लालसा आहे त्यांना सत्ता भोगू द्या. मला शिवसैनिकांच्य़ा रक्ताचा त्याग करायचा नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देतो. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
आपल्य़ा ऑनलाईन संवादात त्यांनी जनेतेशी बोलताना “ज्यांना शिवसेनेने मोठ्ठे केले ते नाराज आहेत, पण ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांनी पाठबळ दिलं. एखादी गोष्ट चांगली चालु असल्यावर दृष्ट लागते तसचं महाराष्ट्राच्या बाबतीत घडलं आहे. सुप्रिम कोर्टात आम्ही आपली बाजू मांडली पण निकाल विरोधात गेला, न्यायदेवतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे.” असही ते म्हणाले.
 
“शिवसेनेतील नाराज लोकांची नाराजी कोणावर आहे. माझ्यावर..? ऱाष्ट्रवादीवर..? कॉंग्रेसवर..? मी तुमच्या भावनांचा आदर करतो. पण शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खुर्चीवरून खाली ओढण्याचे पुण्य जर तुम्हाला मिळत असेल तर खुषाल कमवा.” असे बोलून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना सवाल केला. त्यांनी शिवसैनिकाना पाठबळ दिल्याबद्दल आभार माणून भावनिक आवाहन केले.