1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (08:32 IST)

नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना 500 चौरस फुटांची सदनिका देणार – जितेंद्र आव्हाड

1 जानेवारी 2021 पर्यंत राहणारे सदनिका मिळण्यास पात्र; पुढील दहा दिवसांत 400 लोकांचे स्थलांतर; 4 इमारतींच्या कामाला सुरुवात मुंबई,- नायगाव बीडीडी चाळीत 1जानेवारी 2021 पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. त्यांना 500 चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार असून शासन कोणालाही बेघर करणार नाही, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी नायगाव येथील ललित कला भवन येथे भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
 
नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून कोणीही प्रकल्पात अडथळा आणू नये, असे आवाहन डॉ.आव्हाड यांनी यावेळी केले.
पुढील दहा दिवसात काम सुरू करणार. सुरुवातीला 400 लोकांचे स्थलांतर. पुढील दहा दिवसात पहिल्या चार इमारतींचे काम सुरू करण्यात येणार असून सुमारे 400 लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिल मधील इमारतींमध्ये करण्यात येईल. ज्या लाभार्थींना तिथे जायचे नसेल त्यांना शासनातर्फे 22 हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येईल. या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात उर्वरित दोन शासन निर्णय येत्या आठ दिवसात काढण्यात येतील. पोलिसांच्या घरांबाबतही सकारात्मक निर्णय झाला असून पुढील आठ दिवसात त्याचाही शासन निर्णय काढण्यात येईल, असे डॉ.आव्हाड यांनी सांगितले.
 
इमारतींच्या देखभाल – दुरुस्तीचा समावेश करारात करण्यात येणार आहे तसेच पात्र – अपात्रते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प

बीडीडी चाळींचा पुनर्वसन प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प असून हे महाराष्ट्राला गौरवास्पद आहे असेही डॉ.आव्हाड यांनी सांगितले.

यावेळी डॉ.आव्हाड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशी यांचेशी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात संवाद साधला व रहिवाश्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यांनी स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींना शासनास सहकार्याचे आवाहन केले. यावेळी सदनिकेच्या प्रतिकृतीची पाहणीही डॉ.आव्हाड यांनी केली.नायगाव बीडीडी चाळीमध्ये 41 इमारती असून 3 हजार 344 सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे.