शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (06:30 IST)

दुर्गाडी सागरी किल्ल्यावर उभी राहणार नौदलाची टी-८० युद्धनौका

Navy T-80 warship
मुंबई  – भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन लिमिटेड (एसकेडीसीएल) यांच्यात कल्याणच्या दुर्गाडी सागरी किल्ल्यावर भारतीय नौदलाची निवृत्त फास्ट अटॅक क्राफ्ट टी-८० ही युद्धनौका स्मारक म्हणून प्रदर्शित करण्यासाठी सामंजस्य करार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या ३६५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा करार करण्यात आला. करारावर स्वाक्षरी करताना भारतीय नौदलाच्या वतीनं महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या मुख्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. एसकेडीसीएल चे प्रतिनिधित्व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे आणि त्यांच्या टीमने केले.
 
इनफॅक-टी-८० ही युद्धनौका ७ ऑक्टोबर २०२१ रोजी २३ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाली. इस्रायल येथे मेसर्स आयएएल रामता या कंपनीने बांधलेले हे जहाज २४ जून १९९८ रोजी कार्यान्वित करण्यात आले. ही नौका विशेषतः उथळ पाण्यातील मोहिमांसाठी तयार करण्यात आली होती. मुंबई हाय ऑफशोअर डेव्हलपमेंट एरिया आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त घालण्याचं काम या नौकेने केले.
 
निवृत्तीनंतरही ही नौका देशाची सेवा करत राहील आणि कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यातील नौदल संग्रहालयाला भेट देणाऱ्या भारतीय तरुणांना प्रेरणा देईल. या स्मारकात राज्याच्या समृद्ध सागरी इतिहासाचे, विशेषत: मराठा नौदल आणि भारतीय नौदलाने त्यात बजावलेल्या भूमिकांचे दर्शन घडेल. भारतीय नौदलाने यापूर्वी एस्सेल वर्ल्ड येथे सेवा निवृत्त युद्धनौका एक्स-प्रबल स्मारक रूपात उभारली होती. स्थानिक लोकांमध्ये समुद्राविषयी जाणीव आणि सजगता निर्माण करण्यासाठी टी ८० नौकेच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाचा महाराष्ट्राच्या लोकांशी आणि इतिहासाशी असलेला संबंध पुन्हा अधोरेखित झाला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor