आता काँग्रेसमध्ये राहणार नाही, कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने काँग्रेस नेते कॅप्टर अमरिंदर सिंग प्रचंड दुखावले गेले आहेत. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडणार असल्याची घोषणाच केली. मात्र, तूर्तास भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचंही अमरिंदर सिंग यांनी जाहीर केलं. त्यामुळे अमरिंदर सिंग नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली. मी संपूर्ण परिस्थिती आधीच सांगितली आहे. अशा प्रकारचा अपमान सहन करणार नसल्याचंही मी आधीच स्पष्ट केलं आहे. मला ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली ती योग्य नव्हती, असं सांगतानाच तूर्तास भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं अमरिंदर सिंग यानी स्पष्ट केलं.
तेव्हाच पद सोडणार असल्याचं जाहीर केलं
काँग्रेस पक्षाने आमदारांची बैठक बोलावली. त्याची मला ऐनवेळी माहिती देण्यात आली. तेव्हाच मी पद सोडत असल्याचं जाहीर केलं. जर माझ्यावर कुणाचाच विश्वास राहिला नसेल तर काँग्रेसमध्ये राहण्याला अर्थच काय?, असा सवालही त्यांनी केला.