1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (14:26 IST)

मध्यप्रदेश निवडणूक : केंद्रीय मंत्र्यांना आमदारकी लढवायला लावणं हा भाजपचा नाईलाज?

भाजपने मध्यप्रदेशात तीन केंद्रीय मंत्री – नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि फग्गन सिंग कुलस्ते यांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) 39 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून मध्यप्रदेशातील राजकीय वर्तुळात तसेच स्वतःच्या पक्षात खळबळ उडवून दिली आहे.
 
या यादीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण यावेळी विधानसभा निवडणुकीत तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
13 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली तेव्हापासूनच याबाबत खलबतं सुरू झाली होती.
 
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते.
 
भाजपने आतापर्यंत 78 उमेदवारांची यादी जाहीर केली असून पहिली यादी 39 उमेदवारांची होती. ही पहिली यादी 17 ऑगस्ट रोजी जाहीर केली होती.
 
राजकीय विश्लेषकांच्या मते, "दुसरी यादी जाहीर करून पक्ष शिवराजसिंह चौहान यांच्याबाबत काय विचार करतो याचे स्पष्ट संकेत दिले आहेत."
 
केंद्रीय मंत्र्यांना आमदार करण्याची रणनीती
या यादीत समाविष्ट असलेले तीन केंद्रीय मंत्री म्हणजे नरेंद्र सिंग तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, फग्गन सिंग कुलस्ते आणि पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय हे आहेत. त्यांच्या राजकीय उंचीमुळे ते राज्यात मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.
 
भारतीय जनता पक्षाने तोमर यांना राज्याच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
दुसरीकडे प्रल्हादसिंग पटेलही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. तर फग्गनसिंग कुलस्ते 33 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
 
विशेष म्हणजे कैलाश विजयवर्गीय यांनीही या यादीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कैलाश विजयवर्गीय म्हणाले की हा पक्षाचा आदेश आहे. मला कोणतीतरी जबाबदारी दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं. यादी जाहीर झाल्यावर मलाही आश्चर्य वाटलं. मी संघटनेचा शिपाई आहे. मला जे सांगितले जाईल ते मी करेन."
 
विजयवर्गीय यांना इंदूर-1 या जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे. इथे त्यांच्या मुलाला तिकीट मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत होते.
 
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पाच समर्थकांचीही नावं या यादीत आहेत तर 11 नवीन चेहऱ्यांना या यादीत स्थान मिळालंय.
 
तसं बघायला गेलं तर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने 230 जागांच्या विधानसभेसाठी 78 उमेदवारांची उमेदवारी जाहीर केलीय. अनेक जागांवर अद्याप उमेदवार जाहीर व्हायचे आहेत, त्यामुळे पक्षाकडून आणखी अनेक मोठ्या नावांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
भारतीय जनता पक्ष आणि संघाचा सर्वात जुना बालेकिल्ला असलेल्या माळवा आणि निमार अंचलमधून 22 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
यानंतर महाकौशल विभागातून 18 तर ग्वाल्हेर-चंबळ विभागातून 15 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भार्गव म्हणतात की, "दुसरी यादी जाहीर करून भाजपचं सर्वोच्च नेतृत्व शिवराजसिंह चौहान यांच्याबाबत काय विचार करतं याचे स्पष्ट संकेत देण्यात आलेत."
 
पुढचे मुख्यमंत्री म्हणून मामांचा विचार नाही?
 
भार्गव म्हणतात की या यादीतून स्पष्ट दिसतंय की, भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय आणि त्याला सामोरे जाण्यासाठी हा त्यांच्या धनुष्यातील शेवटचा बाण आहे.
 
ते म्हणतात, "आता सर्वांच्या नजरा भाजपच्या पुढील याद्यांवर असतील कारण जर असंच सुरू राहिलं तर ज्योतिरादित्य सिंधिया निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे."
 
भारतीय जनता पक्षाच्या मध्यप्रदेश युनिटचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणतात की, आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या दोन याद्यांमधून असा संकेत मिळतोय की, लोकसभा असो वा विधानसभा पक्ष प्रत्येक निवडणूक गांभीर्याने लढत आहे.
 
बीबीसीशी बोलताना चतुर्वेदी म्हणाले की, "हा संस्थेचा विशेषाधिकार आहे. प्रत्येक नेत्यावर किंवा कार्यकर्त्यावर कोणती जबाबदारी सोपवायची हे संघटना ठरवते. भले ही ती व्यक्ती कोणत्याही पदावर असेल, आम्ही आमची मजबूत पावलंच पुढे टाकतो."
 
"पक्षाच्या या पावलामुळे जनतेचा विश्वास वाढेल आणि त्याचे चांगले परिणामही मिळतील. दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री आणि खासदार आहेत हे खरं आहे. पण हे निवडणुकीचं राजकारण आहे. यामध्ये निवडणुक जिंकण्यासाठी जे शक्य आहे तेच केलं जातं."
 
 
यावर काँग्रेस काय म्हणतेय?
मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणतात की, नवीन यादी 'भाजपच्या अंतर्गत पराभवाकडे' बोट दाखवते.
 
काँग्रेसचे प्रवक्ते पियुष बबेले यांनीही एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, "भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची यादी आत्मसमर्पणाव्यतिरिक्त दुसरं काही नाही."
 
भोपाळ मधून प्रकाशित होणाऱ्या दैनिक संध्या प्रकाशचे संपादक संजय सक्सेना सांगतात की, मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. यावरून असं दिसतंय की, मध्य प्रदेशात आता पक्षाला शिवराज सिंह चौहान यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्याची इच्छा नाहीये.
 
बीबीसीशी बोलताना ते पुढे म्हणाले की, "महाकौशल असो किंवा चंबळ-ग्वाल्हेर, हे प्रभाग एकेकाळी भाजपचे बालेकिल्ले होते. माळवा आणि मध्य भारत हे देखील संघाच्या प्रभावाचे सर्वात मजबूत आधार आहेत. मात्र आता इथे पक्ष कमकुवत होताना दिसतोय. याला तुम्ही सत्ताविरोधी लाट किंवा नेतृत्व बदलाची गरज म्हणू शकता."
 
"मला असं वाटतं कार्यकर्त्यांच्या उत्साहात घट झाली होती, त्यामुळे भाजपसाठी हा एकमेव मार्ग होता. ग्वाल्हेर चंबळमध्ये तोमर आणि महाकौशल मध्ये प्रल्हादसिंग पटेल यांच्या मदतीने पक्षाला नवं बळ मिळवून देण्याची रणनीती आहे."
 
या नव्या यादीत ज्या खासदारांची नावं आहेत, त्यापैकी राव उदय प्रताप सिंह हे 15 वर्षांनंतर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, तर रीती पाठक पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. गणेश सिंह यांचीही तीच अवस्था आहे.
 
काँग्रेसचा बुद्धिबळाचा डाव उलटला का?
भारतीय जनता पक्षाच्या या यादीनंतर राज्यात आजवर जी राजकीय समीकरणं तयार होत होती ती आता बदलली असून आता काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं जाणकार सांगतात. आता काँग्रेसला निवडणुकीत टिकून राहायचं असेल तर आपली रणनीती बदलावी लागेल, असं देखील जाणकार म्हणतात.
 
 
राजकीय समालोचक आणि विश्लेषक रशीद किडवई म्हणतात की, काँग्रेसची पडकी बाजू म्हणजे त्यांच्याकडे भाजपप्रमाणे निवडणूक रिंगणात उतरू शकेल असा कोणताही मोठा चेहरा नाहीये.
 
दिग्विजय सिंग, विवेक तनखा किंवा सुरेश पचौरी हे तिघेही निवडणूक लढवण्याच्या स्थितीत नसल्याचं ते सांगतात.
 
ते पुढे म्हणतात की, "केवळ दोनच दिग्गज नेते आहेत जे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यास सक्षम आहेत. यात पाहिले आहेत अर्जुन सिंह यांचा मुलगा अजय सिंह आणि अरुण यादव. याशिवाय काँग्रेसकडे एकही मोठा नेता शिल्लक नाहीये. त्यामुळे त्यांना आपली रणनीती बदलावी लागेल, अन्यथा अतिउत्साह आणि अतिमहत्त्वाकांक्षेमुळे नुकसान सहन करावं लागू शकतं."
 
किडवई म्हणतात की, भाजपच्या उमेदवार यादीकडे पाहता पूर्वी भाजप निवडणूक जिंकण्याची शक्यता 40 टक्के होती, नवीन यादी आल्यानंतर ती 60 टक्के झाली आहे.
 
ते म्हणतात, "आता हे प्रमाण कमी करण्यासाठी काँग्रेस कोणती रणनीती वापरणार हे बघावं लागेल. जर त्यांनी हे केलं नाही तर गोष्टी अवघड होतील."
 
मध्यप्रदेशातील परिस्थिती बंगालसारखी आहे का?
ही रणनीती यशस्वी होण्याच्या शक्यतेवरही मत विभागली आहेत.
 
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भार्गव यांच्या मते, भारतीय जनता पक्षाने असाच प्रयोग पश्चिम बंगालमध्येही केला होता. त्यांनी बाबुल सुप्रियो सारख्या मंत्र्याला विधानसभेची निवडणूक लढवायला लावली. पण सुप्रियो निवडणुकीत हरले आणि नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले.
 
ते म्हणतात, "ही दुधारी तलवार आहे, जुगार आहे. मध्यप्रदेशच्या बाबतीत हे समीकरण कितपत यशस्वी होतं हे पाहणं आता बाकी आहे."
 
कमलनाथ म्हणाले की, मध्यप्रदेशातील आपल्या खासदारांना विधानसभेचं तिकीट देऊन भाजपने दाखवून दिलंय की, ते ना 2023 च्या विधानसभा निवडणुका जिंकणार, ना 2024 च्या लोकसभा निवडणुका.
 
आपल्या ट्विटर पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपला सध्या उमेदवारच मिळत नाहीयेत, मग मतदार तरी कसे मिळणार?"
 





Published By- Priya Dixit