बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (14:56 IST)

धीरज साहू कोण आहेत? या काँग्रेस खासदाराकडून 200 कोटीपेक्षा जास्त रक्कम जप्त

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी ओडिशा आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी छापे मारून काँग्रेस नेत्याकडून 200 कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे.
 
शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी आयकर विभागाने झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित ओडिशा आणि झारखंडमधील अनेक ठिकाणांवर छापे टाकले.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या ओडिशा आणि झारखंडमधील घरातून ही रोकड जप्त करण्यात आली आहे.
 
अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्तसंस्था पीटीआयने म्हटलंय की, 'विभागाने सलग तीन दिवस छापे टाकले. या कालावधीत 200 कोटी रुपयांची रोकड वसूल करण्यात आली असून त्याचा कोणताही हिशोब लागलेला नाही.'
 
विभागाने बुधवारी ओडिशातील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी करण्यास सुरुवात केली होती. यात बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचाही समावेश आहे.
 
छत्तीसगडच्या IAS अधिकारी राणू साहू यांना अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
25 जुलै 2023
ममतांचे विश्वासू पार्थ चॅटर्जींना अटक, अर्पिता मुखर्जींकडे सापडले 21 कोटींचे घबाड
24 जुलै 2022
'महाराष्ट्रात गैरव्यवहारांचं 1050 कोटींचं घबाड, व्यवहारांसाठी ओबेरॉय हॉटेलमधील रुमचा वापर' - आयकर विभाग
8 ऑक्टोबर 2021
पीटीआयने सूत्रांच्या आधारे सांगितलं आहे की, 'आतापर्यंत 220 कोटी रुपये मोजले गेले आहेत आणि ही रक्कम 250 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.'
 
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नोटा मोजण्यासाठी सुमारे तीन डझन मोजणी मशीन काम करत आहेत.
 
मशिनची संख्या कमी असल्याने नोटा मोजण्याचं काम संथ गतीने सुरू आहे.
 
कुठे कुठे झाली ही कारवाई ?
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओडिशातील बोलंगीर जिल्ह्यातील सुदापाडा भागातून 156 पिशव्या जप्त केल्या आहेत.
 
त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत फक्त 6-7 पिशव्यांची मोजदाद झाली आहे आणि त्यातून एवढी रक्कम वसूल झाली
एकट्या बोलंगीर येथून 200 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. उर्वरित पैसे ओडिशातील संबलपूर, सुंदरगड, झारखंडमधील बोकारो, रांची आणि कोलकाता येथून मिळाले.
 
या प्रकरणी आयकर विभागाने ओडिशातील संबलपूर, बोलंगीर, तितलागड, बौद्ध, सुंदरगड, राउरकेला, भुवनेश्वर आणि झारखंडमधील रांची, बोकारो येथे छापे टाकले आहेत.
 
याप्रकरणी कंपनीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
 
भाजपच्या ओडिशा युनिटने या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपने या प्रकरणी ओडिशातील सत्ताधारी बीजेडीकडूनही स्पष्टीकरण मागितलं आहे.
 
कोण आहेत धीरज प्रसाद साहू?
राज्यसभेच्या वेबसाइटनुसार धीरज प्रसाद साहू यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1955 रोजी रांचीमध्ये झाला असून त्यांच्या वडिलांचं नाव रायसाहेब बलदेव साहू आणि आईचं नाव सुशीला देवी आहे.
 
ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 2009 मध्ये ते राज्यसभेचे खासदार झाले. जुलै 2010 दुसऱ्यांदा आणि मे 2018 मध्ये ते तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले.
 
धीरज प्रसाद यांच्या स्वतःच्या वेबसाइटनुसार, ते एका व्यावसायिक कुटुंबाशी संबंधित आहेत.
 
त्यांचे वडील रायसाहेब बलदेव साहू हे अविभाजित बिहारमधील छोटानागपूरचे असून ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांचं कुटुंब काँग्रेस पक्षात आहे. त्यांनी स्वतः 1977 मध्ये राजकारणात प्रवेश केला. ते लोहरदगा जिल्हा युवक काँग्रेसमध्ये होते.
 
त्यांचे भाऊ शिवप्रसाद साहू काँग्रेसच्या लोकसभेच्या तिकिटावर दोनदा रांचीमधून निवडून गेले आहेत.
 
त्यांनी रांचीच्या मारवाडी कॉलेजमधून बीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आणि ते झारखंडच्या लोहरदगा भागात राहतात.
 
2018 मध्ये राज्यसभेवर निवडून जाताना धीरज साहू यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं.
 
यामध्ये त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 34.83 कोटी असल्याचं सांगितलं होतं. तर 2.04 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं म्हटलं होतं. या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
 
प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे रेंज रोव्हर, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू आणि पजेरो या गाड्या आहेत.
 
भाजपने काढला चिमटा
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांनी या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
 
जनतेकडून लुटलेला पैसा परत करावा लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.
 
त्यांनी लिहिलंय की, "देशवासीयांनी हे नोटांचे ढिग बघावेत आणि नंतर त्यांच्या नेत्यांची इमानदारीची भाषणं ऐकावीत... जनतेकडून लुटलेला एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची गॅरेंटी आहे. "
 
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मद्य कंपनीशी निगडित ओडिशा आणि झारखंड मधील राजकारण्यांना हा इशारा दिला आहे.
 
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष इंडिया आघाडीवर निशाणा साधला. सोबतच गांधी कुटुंब आणि काँग्रेसवरही निशाणा साधला.
 
ते म्हणाले की, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
 
ते पुढे म्हणाले की, "भ्रष्टाचार वाढू देणार नाही आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जाईल, अशी पंतप्रधानांनी हमी दिली आहे."
 
ते म्हणाले, "अशी नऊ कपाटं आहेत ज्यात 100 कोटींहून अधिक रुपयांची रोकड सापडली आहे. काँग्रेसच्या एका खासदाराकडून 100 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पक्षात किती खासदार आहेत? एकूणच गांधी कुटुंब जगातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे."
 
भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी उपरोधिक टोला लगावताना असं म्हटलंय की, "हा पुरावा आहे की, प्रेमाच्या दुकानातही भ्रष्टाचाराचा धंदा सुरू आहे."