शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (21:15 IST)

दिवाळी पहाट कार्यक्रमांसाठी अर्ज आल्यास सकारात्मक विचार करणार

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे दिवाळी पहाट कार्यक्रम याला परवानगी देण्यात आली नव्हती, आता रुग्णसंख्या कमी आल्याने रंगमंच तसेच थिएटर्स खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमांसाठी अर्ज आल्यास सकारात्मक विचार करणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
 
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजारपेठा, मंदिरे तसेच महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  त्यामुळे काही दिवसांपासून नाट्यगृहे तसेच चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्य शासनाने ११ आॅक्टोबरला आदेश काढत परवानगी दिली आहे. त्यानंतर पुणे शहरातील चित्रपटगृहे तसेच नाट्यगृह 50 टक्के आसन क्षमतेने सुरू करण्यास महापालिकेने  देखील अनुमती दिली आहे. तसा आदेश देखील काढण्यात आला आहे.चित्रपटगृहे सुरू करताना सॅनिटायझरची व्यवस्था करावी. चित्रपटगृहात लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांसह १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांना प्रवेश असेल. प्रवेशद्वारावर प्रत्येक नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करावी, चित्रपटगृहात एक खर्ची सोडून नागरिकांनी बसावे, तिकीट, खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल येथे शक्यतो डिजिटल पेमेंटची व्यवस्था असावी. स्वच्छतागृहे, पॅसेज यांचे वारंवरार निर्जंतुकीकरण करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 
दरम्यान, पुणेकर रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांना परवानगी देणार का? असा प्रश्न विचारला जात होता. याबद्दल अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे  यांना विचारलं असता, राज्य सरकारकडून नाट्यगृहे खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांसाठी अर्ज आल्यास सकारात्मक विचार केला जाईल. मात्र परवानगी देत असताना 50 टक्के आसन क्षमता ठेवण्याचा तसेच सर्व नियमांचे बंधन कायम असेल, असं त्यांनी सांगितले आहे.