शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वेबदुनिया|

नोकरी बदलण्याचा विचार करताय? सावधान!

आर्थिक मंदीचा विळखा रोज नवनव्या क्षेत्राला कवेत घेऊ पहात आहे. त्यामुळेच सध्या नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर सावधान. तसा निर्णय घाईघाईत घेऊ नका. नाही तर ज्या कंपनीत जाल तीच मंदीच्या तडाख्यात सापडलेली असायची आणि आधीच्या कंपनीची दारेही बंद व्हायची. त्यामुळे नीट विचार करूनच निर्णय घ्या. मनुष्यबळ विकास क्षेत्रातील (एचआर) तज्ज्ञांचाही हाच सल्ला आहे.

सध्या नोकरकपातीची टांगती तलवार रियालिटी, विमान वाहतूक व आर्थिक क्षेत्रावर आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नोकरदारांचे धाबे नक्कीच दणाणले आहे. त्यापैकी अनेक जण नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडण्याच्या तयारीत आहेत.

पण सध्या तरी तुम्ही जी नोकरी करताय तीच पक्की आहे ना हे चाचपून बघा. ती आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करा. आळस टाळा आणि झटून काम करा. अन्यथा कपातीच्या वेळी तुमचाच विचार केला जाईल. कारण शेवटी प्रत्येक मालक आपल्या कर्मचार्‍यांकडून 'आऊटपूट' किती मिळते याचाच विचार करतो. त्यामुळे त्यात कमी पडलात तर कपातीची टांगती तलवार तुमच्यावरही कोसळू शकते.

त्याचवेळी दुसरी नोकरी स्वीकारात असाल तर सावध रहा. कारण नव्या ठिकाणी तुम्ही नव्हे असाल. तिथेही मंदीचा फटका बसल्यास कपातीची कुर्‍हाड नव्या कर्मचार्‍यांवर कोसळते, हे लक्षात ठेवा. नव्या नोकरीत रूळायला वेळ लागतो. कामाचा आवाका यायलाही वेळ लागतो. अशा वेळी तुमच्यविषयी चुकीचे मुल्यमापन होऊन नेमके तुम्हालाच काढले जायचे.

नोकरी बदलायचीच असेल तर नवे उगवते क्षेत्र कोणते याचा शोध घ्या. ज्या क्षेत्रात विस्ताराला संधी आहे किंवा विस्तार होतो आहे ते क्षेत्र निवडा. तेथे तुम्हाला नक्कीच संधी असेल. सौंदर्य, शिक्षण ही विस्तारणारी क्षेत्रे आहेत. चांगल्या शिक्षकांची कमतरता नेहमीच जाणवत असते. त्यामुळे तिथे संधी कायम आहेत.