शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वेबदुनिया|
Last Modified: गुरूवार, 20 नोव्हेंबर 2008 (11:23 IST)

बॉलीवूडच्या बादशाहालाही मंदीचा फटका

- चंद्रकांत शिंदे

आर्थिक मंदीचा परिणाम कॉर्पोरेट, चित्रपट व टिव्ही उद्योगावरच नव्हे तर जाहिरात क्षेत्रावरही झाला आहे. पर्यायाने चित्रपट कलावंत व क्रिकेटपटूही मंदीच्या गर्तेत सापडले आहेत.

मंदीमुळे ब्रॅंड एम्बेसेडर बनलेल्या अनेक कलावंत व क्रिकेटपटूंना त्यांची किंमत २०-४० टक्क्यांपर्यंत घटवायला सांगण्यात आली आहे. बॉलीवूडच्या या कलावंतांत शाहरूख, आमीर, ह्रतिक, अक्षय यांच्यासह महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडूलकर या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

शाहरूख खान एका जाहिरातीचे एक वर्षासाठी सहा कोटी रूपये मानधन घेतो. जाहिरातीचा करार केल्यानंतर वर्षातील काही तारखा जाहिरातीशी निगडीत कामांना म्हणजे शूटींग, प्रॉडक्ट प्रमोशन, पत्रकार परिषद आदींसाठी दिलेल्या असतात. शाहरूखप्रमाणेच आमीरही तेवढेच मानधन घेतो.

अक्षय कुमारने लिवाड्सच्या जाहिरातीसाठी बारा कोटी तर अभिषेक बच्चनने मोटारोलासाठी पाच कोटी घेतले आहेत. सैफ अली खान व धोनी एका जाहिरातीसाठी तीन कोटी घेतात. तर सचिन तेंडूलकर ५ ते ८ कोटी घेतो.

पण मंदीमुळे सर्व कंपन्यांनी आपल्या जाहिरातीच्या बजेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी या सेलिब्रेटीजना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पैसे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तब्बल २० ते ४० टक्के मानधन कमी करावे असे सुचविण्यात आले आहे. अक्षयला २५ ते ३० टक्के मानधन कपात करण्यास सांगितले आहे. या सेलिब्रेटीजनी आपली 'किंमत' कमी केली नाही तर त्यांच्या जागी पर्यायी कलावंताला घेतले जाईल.

कोल्ड ड्रिंक्स क्षेत्रातील एका मान्यवर कंपनीने आपली ब्रॅंड एम्बेसेडर ऐश्वर्या राय-बच्चनशी केलेल्या कराराचे नूतनीकरण केलेले नाही. काही कंपन्या या कलावंतांना कमी किमतीत दोन ते तीन वर्षांसाठी साईन करण्याची योजना आखत आहेत.

त्यामुळे की काय कोल्ड ड्रिंक्स बनविणार्‍या एका कंपनीने राणी मुखर्जीला डच्चू देऊन 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाची अभिनेत्री जेनेलिया डिसूझाला ब्रॅंड एम्बेसेडर बनविले आहे. त्यासाठी तिला सव्वा कोटी रूपये देण्यात आले आहेत.

फिल्म हिट झाली की या कलावंतांचे मानधन दुपटीने वाढते. पण आता त्यांना मूळच्याच किमतीत काम करण्यास सांगण्यात आले आहे.