गुणरत्न सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्यास 11 लाखांचे रोख बक्षीस
बारामती :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचारी निषेध रॅली काढण्यात आली. नंतर कामगार नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त करत गुणरत्न सदावर्तेयांची जीभ हासडून टाकणाऱ्याला 11 लाखांचे त्यांच्या हातात बांगडय़ा भरणाऱ्या महिलेला 5 लाख आणि तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कामगार नेते तुकाराम चौधर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
बारामतीत आज कामगारांनी निषेध रॅली काढली होती. या निषेध रॅलीदरम्यान अनेक कामगार दुचाकीवरुन सहभागी झाले होते. पेन्सिल चौकापासून ही रॅली निघून पुन्हा पेन्सिल चौकात तिचा समारोप झाला. तालुका पोलिस ठाण्यासमोर झालेल्या सभेदरम्यान अनेक कामगार नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी तुकाराम चौधर म्हणाले, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांना भडकावून शरद पवार यांच्या घरावर हल्ला घडवल्याचा आरोप आहे. सदावर्ते यांनी कामगारांमध्ये हस्तक्षेप करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकवून भाषणे केलीत. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करुन संकट निर्माण केले. शरद पवार यांच्या अस्मितेला धक्का देण्याचे काम सदावर्ते यांनी केले. त्या सदावर्तेची आम्ही बारामतीत वाट पाहत आहोत.
भविष्यात सदावर्तेच काय पण त्या मनोवृत्तीच्या लोकांनी बारामतीत पाऊल टाकले तर त्याची जीभ हासडणाऱ्यास रोख स्वरूपात 11 लाखाचे बक्षीस देण्यात येईल. त्यांच्या हातात बांगडय़ा भरणाऱ्या महिलेला 5 लाख आणि तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांचे बक्षीस दिले जाईल, असेही ते म्हणाले.