शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (07:11 IST)

राज ठाकरे नितीन गडकरी भेटीनंतर भाजप-मनसे युती चर्चेला उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर केलेलं भाषण चर्चेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली आहे.
 
राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात दोन तास भेट झाली. मात्र ही भेट वैयक्तिक असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
 
या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये गडकरी म्हणाले, "माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं."
 
नितीन गडकरी पुढे म्हणाले, "परवा ह्रदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही."
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत. शनिवारी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती.
 
राज ठाकरे यांनी केलेलं भाषण भाजपप्रेरित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मनसे भाजपचा ब संघ झालाय का अशा चर्चांना उधाण आलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबाच दिला होता. यावरून मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येणार का हे पाहणंही रंजक ठरणार आहे.
 
याआधीही भाजप-मनसे एकत्र येणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र पुढे काही निष्पन्न झालं नाही. 2019 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली. शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांनी सरकार तयार केलं. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडता आलेलं नाही.
 
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह सरकार स्थापण्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
 
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जातीपातीचं राजकारण केलं असा आरोपही केला. अंडरवर्ल्डशी संबंध असलेले नेते तुरुंगात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
 
ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावा असं राज ठाकरे म्हणाले. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?" असा प्रश्न त्यांनी केला.