बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (09:45 IST)

भावना गवळी अडचणीत, ईडीकडून आरोपपत्र दाखल

शिवसेना खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे.
या कथित गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले भावना गवळी यांचे निकटवर्तीयसईद खान यांची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे.
सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे संचालक आहेत.
ईडीच्या दाव्यानुसार, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टला कंपनीत बदलण्याचं षड्यंत्र विचारपूर्वक रचलेलं होतं. ट्रस्टमधून पैशांची अफरातफर करण्यासाठी हे करण्यात आल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
ईडीनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ट्रस्टमधून अफरातफर करण्यात आलेल्या पैशातून विकत घेण्यात आल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
ईडीने 11 मे रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशी संबंधितांविरोधात मनी लॅांडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी ईडीनं भावना गवळी यांना तीन समन्स बजावली आहेत. पण त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीत.
 
प्रकरण काय?
भावना गवळी यांनी शिक्षण संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून 7 कोटींची चोरी झाल्याची पोलीस तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळींच्या विरोधात ट्वीट केलं होतं.
भावना गवळी यांच्याकडं एवढी मोठी रक्कम कुठून आली, याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार असल्याचं सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
त्यानंतर सोमय्या यांनी भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.
ऑगस्ट महिन्यात ईडीने शिवसेना खासदार भावना गवळींच्या 5 संस्थांवर छापेमारी केली.
ईडीनं वाशिम जिल्ह्यातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बीएमएस कॉलेज, बालाजी सहकारी पॉलिटीकल बोर्ड, भावना अॅग्रो प्रॉडक्ट्स या संस्थांवर छापे मारून चौकशी सुरू केली.
भावना गवळींवर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
ईडीच्या छाप्यानंतर भाजपनं जुलमी सत्र सुरू केलंय, शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया गवळी यांनी दिली होती.