PI अनुप डांगे यांची गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्ती; सिल्व्हर ओक प्रकरणानंतर निर्णय
सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच या सर्व घटनेसाठी जबाबदार असल्याचं सांगत पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याची देखील उचलबांगडी करण्यात आली होती. पोलीस अधिकारी राजभर यांची या प्रकरणात बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता याठिकाणी पोलीस निरीक्षक डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांचं पथक सदावर्तेंच्या घरी दाखल केलं आहे.
गावदेवी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी आता अनुप डांगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनुप डांगे हे यापूर्वी देखील चर्चेत आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. गावदेवी पोलीस स्थानकाच्या अंतर्गतच सिल्व्हर ओक हे निवासस्थान येतं. अनुप डांगे हे यापूर्वी याच स्थानकात कार्यरत होते. परमबीर सिंह यांच्याकडून त्यांचं निलंबन देखील झालं होतं.
दरम्यान, अनुप डांगे हे या प्रकरणाचा चांगल्या पद्धतीनं तपास करतील असा विश्वास गृहविभागाला असल्यानं ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.