गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 23 मार्च 2022 (23:56 IST)

श्रीधर पाटणकर: मामा पाटणकरांनंतर आता भाचे आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव एका कथित हवाला ऑपरेटरशी भाजपने जोडलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या कथित हवाला ऑपरेटरचं नाव ईडीच्या चौकशीतून पुढे आलं आहे आणि ही व्यक्ती थेट आदित्य ठाकरेंशी संबंधित असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
 
अंमलबजावणी संचनालय म्हणजे ईडीच्या दाव्यानुसार, "नंदकिशोर चतुर्वेदी एक हवाला ऑपरेटर असून, त्यांनी श्रीधर पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीत 30 कोटी रुपये शेल कंपन्यांमार्फत गुंतवले आहेत."
 
यानंतर भाजपने आरोप केला आहे की आदित्य ठाकरेंचे नंदकिशोर चतुर्वेदींशी संबंध होते आणि मागणी केली आहे की आदित्य ठाकरेंचीही ईडी चौकशी करावी.
 
पण खरंच आदित्य ठाकरेंचे कथित हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संबंध आहेत का, हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवरून महत्त्वाची माहिती आमच्या हाती लागली आहे.
 
नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यावर ईडीचे आरोप
आदित्य ठाकरेंचे नंदकिशोर चतुर्वेदींशी संबंध आहेत का, हे जाणून घेण्याआधी चतुर्वेदी यांच्यावर ईडीने काय आरोप केले आहेत याबाबत जाणून घेऊया.
 
उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईदरम्यान नंदकिशोर चतुर्वेदींचं नाव पुढे आलं.
 
अंमलबजावणी संचनालयाने नंदकिशोर चतुर्वेदी यांना हवाला ऑपरेटर असं म्हटलंय. चतुर्वेदींच्या अनेक शेल कंपन्या असल्याचंही सांगण्यात आलंय.
 
ईडीने जारी केलेल्या प्रेस रिलीजच्या माहितीनुसार, "नंदकिशोर चतुर्वेदी यांनी हमसफर डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड या स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून काळा पैसा श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट कंपनीत पार्क केला."
 
आदित्य ठाकरेंवर भाजपचे आरोप
नंदकिशोर चतुर्वेदी यांचं नाव हवाला प्रकरणी पुढे आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी थेट पर्यावरण मंत्री आणि आदित्य ठाकरेंचे चतुर्वेदी यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला.
 
पत्रकारांशी बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या सांगतात, "आदित्य ठाकरेंनी 2014 मध्ये कोमो स्कॉट एंड प्रॉपर्टीज नावाची कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी यांना देण्यात आली."
 
आदित्य ठाकरेंचा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संबंध काय, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय.
 
किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.
 
22 मार्च रोजी जेव्हा पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ते म्हणाले होते या सर्व कारवाया सूडबुद्धीतूनच होत आहेत.
 
श्रीधर पाटणकर हे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच नातेवाईक आहेत असे नाही. ते संपूर्ण शिवसेना आणि शिवसैनिकांचे स्नेही आहेत. त्यांच्यावरील ईडीची कारवाई ही आकसपूर्ण आहे.
 
देशात ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर कारवाई केली जात आहे.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनाही दिल्लीत बोलावून त्यांची आठ तास चौकशी केली. बॅनर्जी यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली.
 
ही राक्षसी हुकुमशहीची नांदी आहे. संसदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार मोदी सरकार येण्याच्या आधी देशभरात फक्त 22 ते 23 कारवाई ईडीकडून झाल्या. पण मोदी सरकारच्या काळात 2500 कारवाया झाल्या यापैकी अनेक कारवाया चुकीच्या पद्धतीने झाल्या असल्याच न्यायालयात सिद्ध झाले. राक्षसी हुकुमशहाची ही जबरदस्ती आहे, असं राऊत म्हणाले होते.
 
या चतुर्वेदी आणि प्रकरणाबाबत बोलताना भाजप आमदार नितेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "राज्याचा एक मंत्री ज्या कंपनीत संचालक होता, त्याच कंपनीत नंदकिशोर चतुर्वेदी आता संचालक आहेत. या संबंधांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे."
 
नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत याची माहिती मिळाली नाहीये. त्यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
 
नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेंचा संबंध आहे?
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे चतुर्वेदी यांच्याशी संबंध आहेत का, हे तपासण्यासाठी आम्ही कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटची मदत घेतली.
 
कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवर देशात निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येक कंपनीचं रजिस्ट्रेशन असतं.
 
सर्वांत पहिले आम्ही कोमो स्कॉट एंड प्रॉपर्टीज (LPP) या कंपनीची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवर कंपनीच्या मास्टर डेटामध्ये आम्हाला या कंपनीची माहिती मिळाली.
 
2014 साली ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. या कंपनीचं ऑफिस मुंबईत लोअर परळमध्ये असून नंदकिशोर चतुर्वेदी यांचं नाव कंपनीचे संचालक म्हणून लिहिण्यात आलंय.
 
28 मार्च 2020 पासून नंदकिशोर चतुर्वेदी कोमो स्कॉट एंड प्रॉपर्टीज (LPP) मध्ये संचालक आहेत.
 
नंतर आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न केला की आदित्य ठाकरे कोणत्या कंपनीत संचालक आहेत. याचीही माहिती कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 
संचालकांच्या मास्टर डेटामध्ये आम्हाला आदित्य ठाकरेंबाबत माहिती मिळाली. आदित्य ठाकरे चार कंपन्यांमध्ये संचालक होते अशी माहिती समोर आली. यात एक कंपनी होती आता वादात सापडलेली कोमो स्कॉट एंड प्रॉपर्टीज (LLP).
 
या कंपनीशी आदित्य ठाकरे 20 मार्च 2014 ला संलग्न झाले आणि 3 सप्टेंबर 2019 रोजी त्यांनी कंपनी सोडून दिल्याचं दिसून आलं. इतर चार कंपन्यांतूनही आदित्य ठाकरे साल 2019 मध्ये बाहेर पडल्याचं दिसून येतंय.
 
2019 मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री झाले. त्यासुमारास ते सर्व कंपन्यांमधून बाहेर पडल्याचं दिसत आहे.
 
कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, 'नंदकिशोर चतुर्वेदी 10 कंपनी आणि 2 लिमिटेड लायबिलीटी पार्टनरशिप कंपनीत संचालक पदावर आहेत.'
 
यातील सहा कंपन्या एकाच दिवशी 30 मार्च 2017 ला स्थापन करण्यात आल्याची माहिती कॅार्पोरेट मंत्रालयाकडून मिळाली आहे.
 
या कागदपत्रांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आदित्य ठाकरे यांनी ही कंपनी सोडल्यानंतर नंदकिशोर चतुर्वेदी यांनी या कंपनीचा पदभार सांभाळला.
 
त्यामुळे आदित्य ठाकरे आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचा संबंध आहे असं थेट स्पष्ट होत नाही. ते दोघे एकाच कंपनीत एका वेळी नव्हते, पण विविध कालखंडात एकाच कंपनीशी संबंधित होते.