1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (08:15 IST)

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? दीपाली सैय्यद यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

uddhav shinde
राज्यातील राजकीय घडामोडी आणि सत्ता संघर्षाचा धुराळा खाली बसत नाही तोच आता पुन्हा एक घडामोड समोर आली आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या दीपाली सैय्यद यांनी केलेले ट्विट व त्यापाठोपाठ घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे. शिवसेनेत मोठी फूट पाडून मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे सैय्यद यांनी म्हटले आहे. येत्या एक-दोन दिवसात तसे तुम्हाला बघायला मिळेल, असा दावा सैय्यद यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात या नव्या चर्चेला उधाण आले आहे.
 
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दिवसेंदिवसच राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे हे दोन्ही एकत्र येतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिंदे गटाचे आमदार व प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुळ शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येतील असा विश्वास व्यक्त केला होता. त्याचवेळी आता सेना नेत्या दीपाली सैय्यद यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.
 
सैय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून य़ाबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटची देशभरातच जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच सैय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची संपूर्ण भूमिका विषद केली आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार का? आणि या भेटीनंतर नेमके काय होणार? या कडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.
 
काही दिवसांपूर्वी दीपाली सैय्यद यांनी एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, “मला एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव साहेब आणि शिवसेनेवर टीका करतील. तर त्यांना एवढंच सांगणे आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. शिंदे साहेबांनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजपा आमची शत्रू नाही आणि त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. परंतू वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहित नाही पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
 
शिंदे आणि ठाकरे हे दोन्ही मोठे नेते आहेत. आता दोघांपैकी एकाने पुढाकार घेऊन चर्चा करायला हवी आणि एकत्र यायला हवे, असे सैय्यद यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले आहे. शिवसैनिक आणि नेत्यांचीही तीच भावना आहे. त्यादृष्टीने आता पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.