शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (20:53 IST)

राज्यसभा निवडणूक : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा 'या' 3 कारणांनी झाला घात

sanjay uddhav thackeray
पहाटेच्या नाट्यमय घडामोडींनी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. निमित्त ठरली राज्यसभेची निवडणूक.
 
महाराष्ट्रात सहा जागांसाठी काल म्हणजे 10 जून रोजी मतदान पार पडलं. यातील सहाव्या जागेची निवडणूक अटीतटीची ठरली.
 
शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याने शेवटपर्यंत निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती.
 
तब्बल आठ तास उशिरा मतमोजणी सुरू झाली आणि पहाटे निकाल हाती आला. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यात भाजपला यश आलं.
 
या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिवसेनेला अपयश का आलं? उद्धव ठाकरेंच्या पराभवाची कारणं काय आहेत? हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
 
1. आमदारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी
सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 41 मतं मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 39 मतं मिळाली.
 
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत केंद्रीय निवडणूक आयोगाने तांत्रिक चुकीमुळे बाद केलं. पण त्यांचं मत जरी वैध ठरलं असतं तरी संख्याबळ आमच्याकडेच जास्त होतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
 
महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांवरील नाराजीमुळे आमदारांना विश्वासात घेता आलं नाही असं म्हटलं जातंय.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस यांना माणसं जवळ करता आली.
 
या वक्तव्याचा राजकीय अर्थ असाही काढला जातोय की, उद्धव ठाकरे यांना माणसं जवळ करता आली नाहीत का? त्यांच्यावर आमदार नाराज आहेत का?
 
राज्यसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच काही आमदारांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती. त्यापैकी एक होते देवेंद्र भुयार. मात्र, अजित पवार यांच्यासाठी मी महाविकास आघाडीला मतदान करेन, असंही ते म्हणाले होते.
 
देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात टीका केलीय. ते म्हणाले, "सरकारमध्ये अत्यंत अंतर विरोध आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार आम्हाला सांगतात की उमेदवार मागे घेऊ नका. याचा अर्थ पक्षांतर विरोध खूप आहे आणि त्याचा त्यांना फटका बसला."
 
शिवसेनेच्या पराभवाचं विश्लेषण करायचं झाल्यास आमदारांची नाराजी हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या, "आमदारांची नाराजी ही सुद्धा यामागची पार्श्वभूमी आहे. मुख्यमंत्री आमदारांना वेळ देत नाहीत, त्यांना भेटत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काही दिवसांपूर्वी म्हणाले की अजितदादांकडे पाहून आम्ही मत देऊ आणि मिलिंद नार्वेकरांनी आम्हाला आश्वासन दिलंय. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं थेट नातं नाही हे दिसतं. सचिवांच्या सांगण्यावरून हालचाली सुरू आहेत."
 
2. अपक्षांची जुळवाजुळव
भाजपला आपले 106 आमदार आणि छोट्या पक्षांसहीत अपक्ष आमदारांची साथ मिळल्याचं निकालावरून स्पष्ट दिसतं.
 
भाजपचे पहिले दोन उमेदवार पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48 मतं मिळूनही तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना 41 मतं मिळाली. त्यामुळे भाजपला अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचं पाठबळ मिळालं हे या आकडेवारीतून दिसतं.
 
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार यांच्यासह काही अपक्ष आमदारांनी समर्थन जाहीर केलं होतं. शिवाय, एमआयएमनंही आपल्या पक्षाची दोन्ही मतं महाविकास आघाडीला देणार, असं म्हटलं होतं.
 
शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांना 43 आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44 मतं मिळाली. तिन्ही पक्षांनी आपली उर्वरित मतं शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना द्यायची असं ठरलं.
 
12 अपक्ष आमच्या बाजूने आहेत असाही दावा महाविकास आघाडीने केला होता. परंतु प्रत्यक्षात अपक्षांची बहुतांश मतं भाजपच्या पारड्यात गेल्याचं दिसतं.
 
निवडणुकीआधी काही अपक्ष आमदार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. परंतु प्रत्यक्षात 13 अपक्षांचं समर्थन शिवसेनेच्या सहाव्या उमेदवाराला मिळालं नाही.
 
छोट्या पक्षांचे किती आमदार आहेत ते पाहूया..
 
एमआयएम-2, समाजवादी पार्टी- 2, मनसे-1, बहुजन विकास आघाडी- 3, प्रहार - 2, माकप- 1, स्वाभिमानी संघटना- 1, रासप-1, जनसुराज्य -1, शेकाप- 1, क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1 असे मिळून या पक्षांचे 16 आमदार आहेत.
 
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "राज्यसभेचा निकाल बघितला तर महाविकास आघाडीची 9 मतं कमी झालेली दिसतात. याशिवाय एमआयएम पक्षानं महाविकास आघाडीला दिलेली मतंही कुठे रिल्फेक्ट झालेली दिसत नाहीत. सोबत संजय राऊत यांचंही एक मत कमी झालंय."
 
अपक्षांचा पाठिंबा घेण्यात जोखीम होतीच असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
 
ते म्हणाले, "अपक्षांच्या पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले होते. पण जोखीम होतीच. सहा मतं भाजपकडे वळली हे स्पष्ट आहे. स्वाभिमानी पक्ष, बहुजन विकास आघाडी उद्धव ठाकरेंना भेटले असंही सांगण्यात येत होतं परंतु त्यांना त्यांनी मनं वळवता आली नाहीत हे यावरून सिद्ध होतं."
 
3. महाविकास आघाडीत समन्वय नाही
राज्यात गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. तीन चाकांचं सरकार लवकरात पडेल अशी भाकितं भाजपने वारंवार केली. पण आजही सरकार स्थिर आहे.
 
असं असलं तरी महाविकास आघाडीत असमन्वय आहे अशी टीका सातत्याने होते. राजकीय विश्लेषक सांगतात, महाविकास आघाडीचं नियोजन कमी पडलं आणि त्यांच्यात समन्वय नव्हता हे सुद्धा यानिमित्ताने समोर आलं.
 
काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांचं मत इम्रान प्रतापगढी यांना दिलं. त्यामुळे काँग्रेसकडून शिवसेनेला एकही मत मिळालं नाही.
 
महाविकास आघाडीचं नियोजन देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीसमोर फेल ठरलं, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणाले, "महाविकास आघाडीत समन्वय नव्हता आणि त्यांचं नियोजनही नव्हतं, हे या निकालावरून स्पष्ट झालं. हा निकाल उद्धव ठाकरेंचं अपयश म्हणावं लागेल. कारण त्यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी ही निवडणूक लढत होती."
 
परंतु हा पराभव एकट्या शिवसेनेचा नव्हता असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणाले. "महाविकास आघाडी एकत्रित ही निवडणूक लढत होती. शरद पवार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं असलं तरी महाविकास आघाडी कुठे कमी पडली हे त्यांनी मान्य केलं."