मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By वेबदुनिया|

शिवाजी महाराजांची थोरवी

वस्तुनिष्ठ भूमिकेवरून विचार केला तरच शिवाजीमहाराजांच्या थोरवीचे आकलन होईल. त्यांनी स्वराज्यसंस्थापना केली याचा अर्थ त्यांनी मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. युरोपीय व्यापार्‍यांच्या वखारी लुटल्या आणि जाळल्या याचा अर्थ त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घातला. ते लोकोत्तर पुरूष होते याविषयी वाद असण्याचे कारण नाही. जगातील कोणत्याही विभूतीच्या अंगी आढळणारे अनेक असाधारण गुण त्यांच्या ठायी एकत्रित झाले होते. लहानपणापासून नाना प्रकारची संकटे सोसल्यामुळे त्यांना जगाचा विशेष अनुभव होता आणि त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची बुद्धी स्वभावात:च त्यांच्या ठिकाणी होती. त्यांची राहणी साधी होती. त्यामुळे शिपाईगड्यांत त्यांच्यासंबंधी आपुलकी होती. त्या बळावर त्यांनी आपल्याभोवती जीवास जीव देणारे असंख्य मित्र गोळा केले होते.

महाराज नीतिमान होते. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. शत्रूच्या स्त्रियांना त्यांनी सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. आपल्या आचरणाने त्यांनी प्रजेला नीतीचा धडा शिकविला होता. त्यांच्या राजनीतीत शक्ती व युक्ती या दोहींचा समन्वय होता. ते जसे शूर योद्धे होते तसे बुद्धिमान मुत्सद्दी होते. ध्येय आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचे कौशल्य त्यांना साधले होते.

त्यांची धर्मावर नि:सीम श्रद्धा होती. धर्मभावना त्यांच्या अंत:करणात सदैव जागृत होती. राष्ट्रोन्नती धर्मोन्नतीवर अवलंबून आहे अशी त्यांची दृढ धारणा होती. तिच्या अनुषंगाने त्यांची सारी कार्ये होत. राज्यव्यवहाराबाबत त्यांचा स्वभाव अत्यंत कडक होता. गुन्हेगाराला ते जबरदस्त शिक्षा दिल्याशिवाय राहात नसत. प्रतापराव गुजरांवरचा त्यांचा राग इतिहासात नमूद आहे. कारभारात महाराज कडक असले तरी मुळात ते अंत:करणाने कोमल व दयाशील होते.

  MH GOVT
त्यांनी पैसा गोळा केला. कारण सैन्य ठेवण्यास पैसा उभारावा लागतो. आणि सैन्याशिवाय शत्रूला तोंड देता येत नाही. त्यांनी थोड्या पैशांत व थोड्या खर्चात फौजफाटा व गड, किल्ले यांची अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली. अडाणी मावळ्यांना त्यांनी हाताशी धरले व स्वराज्यस्थापनेचे कार्य केले. यात त्यांची योजकता व्यक्त होते. त्यांच्या पश्चात हे कार्य कुणास साधले नाही. कारण मराठ्यांशी जशी परंपरा ऐकू येते तशी मावळ्यांची परंपरा ऐकू येत नाही. या वस्तुस्थितीचा कदाचित आनुवंशिकतेशी संबंध असावा.

राज्यकारभारात महाराज सदैव सावध होते. त्यांचे हेरांचे खाते होते. त्यांच्या हेरांत बहिर्जी नाईक प्रसिद्ध आहे. कारभार चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान नेमले होते. त्यांच्यात कामाची वाटणी करण्यात आली होती, त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. त्यांनी जिंकलेल्या मुलुखावर चौथाई म्हणून एक नवीन हक्क बसविला. त्या चौथाईच्या उत्पन्नावर जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षणाचा आणि फौजेच्या इतर खर्चाचा भार असे. तिच्यावरून इंग्रजांना तैनाती फौजेची कल्पना स्फुरली होती. महाराजांची फौज किती शिस्तबद्ध होती याची साक्ष त्यांचे हे पत्र देईल.

पावसाळ्याच्या तोंडी त्यांनी सैन्याला ताकीद दिली आहे, ''पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला. परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसीतैसी पागेची बेगमी केली आहे. असेल तोवरी धुंदी करून चाराल. मग पडत्या पावसात काही मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे विलातीस तसवीस देऊ लागाल. तरी रयतेस काडीचा आधार द्यावयाची गरज नाही. घलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील, कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाकूला आगी घेतील. गवत पडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनामन आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. बदनामी ज्यावर येईल त्यास, मराठियाची तो इज्जत वाचणार नाही.
(महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार)