सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

म्हणूनच चातुर्मासात विष्णू शयन करतात

dev shayani ekadashi
चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस 'प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी कल्पना आहे.
 
ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.
 
चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात. या काळात हिंदू धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णित संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षा ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत. चातुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. काळात शेषशायी विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे.
 
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत महत्त्व आहे.
 
नवसृष्टी निर्मिती हे ब्रम्हदेवाचे कार्य चालू असताना पालनाकरता श्रीविष्णू निष्क्रिय असतात आणि म्हणूनच चातुर्मासात विष्णू शयन करतात. तेव्हा श्रीविष्णू क्षीरसागरात शयन करतात, असे समजले गेले आहे. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो.
 
देव शयनी असल्यामुळे या निद्राकाळात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या दरम्यान व्रत, पूजा, आचरण केले जातात.
 
धार्मिक शास्त्रानुसार चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे. पावसाळा असल्यामुळे स्थलांतर शक्य नसावे म्हणून चातुर्मास व्रत एका स्थानी राहूनच करण्याची पद्धत पडली असावी. तसेच या दरम्यान शरीरातील पचनादी संस्थांचे कार्य वेगळ्या पद्धतीने सुरू असल्यामुळे कांदे, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.
 
अनेक लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. एखादा नियम धरतात जसे पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण करणे, एकभोजन म्हणजे एक वेळेस जेवणे, अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे जेवणे, एकवाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे, मिश्रभोजन म्हणजे सर्व पदार्थ एकत्र मिसळून जेवणे इत्यादी. अनेक स्त्रिया चातुर्मासात धरणे-पारणे नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात.