रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (13:16 IST)

2001 Parliament attack: 'असं वाटलं जणू कुणीतरी संसद भवन उडवून दिलं'

- अनंत प्रकाश
13 डिसेंबर 2001... दिल्लीच्या आसमंतात कोवळं ऊन पसरलं होतं. संसदेत विरोधकांच्या गदारोळात हिवाळी अधिवेशन सुरू होतं. महिला आरक्षण विधेयकावरून गेले काही दिवस संसदेत गदारोळ सुरू होता. संसद परिसरात सभागृहाच्या आतपासून ते बाहेरपर्यंत सगळीकडे नेते, पत्रकार बिनदिक्कत फिरत होते, बोलत होते. सगळं रोजच्यासारखं सुरू होतं.
 
सरकारी गाड्यांची गर्दी
संसदेत सर्वपक्षीय खासदारांसह पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी या देखील दाखल झाल्या होत्या. 11 वाजून 2 मिनिटांनी लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी आपापल्या गाडीने संसदेबाहेर पडले. संसदेतून खासदारांना नेण्यासाठी संसद गेटच्या बाहेर सरकारी गाड्यांची गर्दी उसळली.
 
उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा ताफाही संसदेबाहेर पडण्यासाठी सज्ज होता. गाडी गेटवर लावल्यानंतर सुरक्षारक्षक उपराष्ट्रपती बाहेर येण्याची वाट बघत होते. सभागृहाबाहेर पडणाऱ्या नेत्यांसोबत पत्रकार अनौपचारिक गप्पा मारत होते. अॅंबेसेडरमधून संसदेत घुसले अतिरेकी ज्येष्ठ पत्रकार सुमित अवस्थी एव्हाना सभागृहाच्या गेट नंबर एकच्या बाहेर तत्कालीन केंद्रीय मंत्री मदनलाल खुरानांशी बोलत होते.
 
पत्रकार सुमित अवस्थी यांनी बीबीसीला सांगितलं, "मी आणि माझे काही सहकारी केंद्रीय मंत्री मदनलाल खुराना यांच्याकडून महिला आरक्षण विधेयकासंबंधी अधिक माहिती घेत होतो. विधेयक सभागृहात सादर होऊ शकेल का, चर्चा होईल का, यावर बोलणं सुरू होतं. तेवढ्यात आम्ही एक आवाज ऐकला. तो गोळीबाराचा आवाज होता." 11 वाजून 30 मिनिटं होत असतानाच उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक त्यांच्या पांढऱ्या अॅंबेसेडर गाडीजवळ उभे राहून त्यांच्या येण्याची वाट बघत होते. तेवढ्यात DL-3CJ-1527 क्रमांकाची एक पांढरी अॅंबेसेडर कार वेगाने गेट नंबर 12 जवळ आली. कारचा वेग संसदेत चालणाऱ्या इतर सरकारी गाड्यांपेक्षा थोडा जास्त होता.
 
कारचा वेग बघून संसदेच्या वॉच अँड वॉर्ड ड्युटीवर असलेले जगदीश प्रसाद यादव घाई-घाईत निशस्त्रच गाडीच्या दिशेने धावले. जेव्हा संसदेत पहिल्या गोळीचा आवाज घुमला
 
ही तेव्हाची घटना आहे जेव्हा लोकशाहीचं मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या सुरक्षारक्षकांकडे शस्त्रं नसायची. जगदीश यादव यांना पळताना पाहून इतर सुरक्षारक्षकही त्या वेगाने धावणाऱ्या गाडीच्या दिशेने पळाले. एवढ्यात ही पांढरी अॅंबेसेडर गाडी उपराष्ट्रपतींच्या गाडीला धडकली. उपराष्ट्रपतींच्या गाडीला धडकल्यावर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्यांच्या हातात AK-47 आणि हँडग्रेनेडसारखी आधुनिक शस्रास्त्रं होती.
 
संसद परिसरातील वेगवेगळ्या भागात उभ्या लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. कुणाला वाटलं जवळच्याच गुरुद्वारामध्ये कुणीतरी गोळी झाडली असेल. तर कुणाला हा फटाक्यांचा आवाज वाटला. मात्र, गोळीचा आवाज ऐकताच कॅमेरामनसह वॉच अँड वार्ड टीमचे सदस्य गोळीच्या आवाजाच्या दिशेने पळाले. नेमकं काय घडतंय, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.
 
पत्रकार सुमित अवस्थी सांगतात, "पहिल्या गोळीचा आवाज ऐकताच मी खुरानाजींना विचारलं काय झालं आणि हा आवाज कुठून आला. त्यावर ते म्हणाले, 'हो, हे तर खूप विचित्र आहे. संसदेच्या जवळ असा आवाज कसा येतोय?' तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या वॉच अँड वॉर्डच्या एका सदस्याने सांगितलं की कदाचित चिमण्यांना हाकलण्यासाठी हवेत गोळी झाडली असावी."
 
ते पुढे म्हणाले, "मात्र, पुढच्याच क्षणाला मी बघितलं की राज्यसभेच्या गेटमधून एक मुलगा आर्मीच्या गणवेशासारखी पँट आणि काळा टीशर्ट घालून हातात एक मोठी बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत गेट नंबर एकच्या दिशेने धावत येत होता."
 
संसदेकडे...
 
संसदेवरील हल्ल्यावेळी अनेक पत्रकार परिसराच्या बाहेरही होते. ते ओबी व्हॅनच्या मदतीने नेत्यांच्या लाईव्ह मुलाखती घेत होते. 2001 साली स्टार न्यूज या चॅनलसाठी संसदेतून वार्तांकन करणारे मनोरंजन भारती यांनी बीबीसीला सांगितलं, "संसद हल्ल्याच्या अगदी काही क्षणांपूर्वी मी ओबी व्हॅनमधून लाईव्ह रिपोर्ट करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत भाजपचे शिवराज सिंह चौहान आणि काँग्रेसचे एक नेते होते. मी या दोन्ही नेत्यांना आपल्या मारूती व्हॅनने आत सोडायला गेलो होतो. त्यांना सोडून मी बाहेर पडलोच होतो तेवढ्यात मला पहिल्या गोळीचा आवाज ऐकू आला."
 
"गोळीचा आवाज ऐकताच मी पळत गेलो आणि लाईव्ह केलं. माझ्या मागे मुलायम सिंह यादव यांचा ब्लॅक कॅट कमांडो होता. मी त्याला म्हणालो, 'बॉस, मी संसदेकडे पाठ करून लाईव्ह रिपोर्टिंग करतोय. मागून कुणी अतिरेकी आला तर बघून घे. तो म्हणाला ठिक आहे.' गोळीबाराचे मोठ-मोठे आवाज येत होते. स्फोटांचे आवाज येत होते."
 
11.30 ला आला आवाज
संसद परिसरात अतिरेक्यांच्या हातातील ऑटोमॅटिक AK-47 मधून बाहेर पडणाऱ्या गोळ्यांच्या आवाज ऐकताच नेत्यांसह तिथे उपस्थित लोकांचे चेहरे भीतीने काळवंडले. संसदेच्या आतपासून बाहेरपर्यंत अफरातफर सुरू होती. नेमकं काय घडतंय, हे कुणालाच कळत नव्हतं. सगळेच आपापल्या परीने घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सभागृहाच्या आत देशाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्यासह अनेक बडे नेते हजर होते. मात्र, काय घडतंय, हे कुणालाच ठाऊक नव्हतं.
 
सभागृहाच्या गेट नंबर एकच्या बाहेर केंद्रीय मंत्री मदनलाल खुराना यांच्याशी बातचीत करत उभे असलेले पत्रकार सुमित अवस्थी सांगतात, "मी मदनलाल खुराना यांना सांगितलं की हा सिक्युरिटी गार्ड बघा. याला काय झालं आहे? तो गोळीबार का करतोय? मला वाटलं तो कुणाचा बॉडीगार्ड असावा. ते मागे वळून बघणार एवढ्यात वॉच अँड वॉर्डच्या एका जवानाने त्यांचा हात धरून त्यांना खेचलं. ते आपल्या कारच्या दारावर हात ठेवून माझ्याशी बोलत होते आणि अशाप्रकारे ओढल्यामुळे ते जमिनीवर पडले. खुराना साहेबांनंतर त्या जवानाने माझा हात खेचून म्हटलं, खाली वाका. कुणीतरी गोळ्या झाडत आहे. वाकूनच आत जा. नाहीतर गोळी लागेल."
 
पहिला अतिरेकी कसा ठार झाला?
संसदेत पहिल्या गोळीचा आवाज ऐकल्यानंतरच गोंधळ उडाला. यावेळी संसदेत ससंदीय कामकाज मंत्री प्रमोद महाजन, नजमा हेपतुल्ला आणि मदनलाल खुराना यासारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मनोरंजन भारती सांगतात, "त्यावेळी संसदेतील सुरक्षारक्षकांकडे शस्त्रं नसायची. संसदेत सीआरपीएफची एक बटालियन असायची. मात्र, तिला घटनास्थळापर्यंत येण्यासाठी अर्धा किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार होतं. गोळ्यांचा आवाज येताच ते धावत आले." उपराष्ट्रपतींचे सुरक्षारक्षक आणि अतिरेकी यांच्यात संघर्ष सुरू असताना निशस्त्र सुरक्षारक्षक मातबर सिंह यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत गेट नंबर 11 बंद केलं.
 
गेट नंबर 1
मातबर सिंह काही करणार याआधीच अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र, गोळी लागूनही मातबर सिंह यांनी आपल्या वॉकीटॉकीवरून अलर्ट पाठवला आणि संसदेचे सर्व दरवाजे तात्काळ बंद करण्यात आले. यानंतर संसदेत घुसण्यासाठी अतिरेकी गेट नंबर एककडे वळले. गोळ्यांचा आवाज येताच गेट नंबर एकवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी तिथे असलेल्या लोकांना जवळच्याच खोल्यांमध्ये लपवलं आणि अतिरेक्यांचा सामना करू लागले.
 
सर्वात मोठी चिंता
खोल्यांमध्ये असलेल्या लोकांमध्ये सुमित अवस्थी हेदेखील होते. अवस्थी सांगतात, "मदनलाल खुराना यांच्यासोबतच मलाही गेट नंबर एकच्या आत टाकत गेट बंद करण्यात आलं. सभागृहात मला दिसलं की गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी कुठेतरी जात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव आणि कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या. मी त्यांना विचारलं की काय झालं आहे. पण, माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच ते तिथून निघून गेले."
 
"यानंतर खासदारांना सेंट्रल हॉल आणि इतरांना अन्यत्र हलवण्यात आलं. त्यावेळी मला सर्वांत मोठी चिंता लागून होती ती म्हणजे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी सुखरूप आहेत की नाही याची. गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी सुखरूप असल्याचं मी बघितलं होतं. मला नंतर कळलं की हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई अडवाणी यांच्या देखरेखीत सुरू होती."
 
नेते सुखरूप असल्याची बातमी
एव्हाना टीव्ही चॅनलच्या माध्यमातून देशभरात ही बातमी पसरली होती की देशाच्या संसदेवर हल्ला झाला आहे. मात्र, नेते सुरक्षित आहेत की नाही, याची काहीच माहिती नव्हती. कारण जे पत्रकार सभागृहाच्या आत होते त्यांना खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित कुठलीच माहिती देण्यात येत नव्हती. हे सर्व घडत असताना अतिरेक्यांनी गेट नंबर 1 मधून संसदेच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी एका अतिरेक्याला तिथेच ठार केलं. यात अतिरेक्याच्या शरिरावर बांधलेल्या स्फोटकं असलेल्या बेल्टचा स्फोट झाला.
 
पत्रकारांनाही लागल्या गोळ्या
अवस्थी सांगतात, "आम्ही एका खोलीत होतो. तिथे माझ्यासोबत 30-40 जणांना ठेवलं होतं. जॅमर ऑन असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे मोबाईल फोन बंद होते. आमचा जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. दोन-अडीच तासांनंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला. आवाज इतका मोठा होता की वाटलं संसदेचा एखादा भागच उडवून दिला आहे. नंतर कळलं की गेट नंबर एकच्या बाहेर एका अतिरेक्याने स्वतःला उडवलं होतं."
 
संसद परिसरातील या संपूर्ण घटनाक्रमाला आपल्या कॅमेऱ्यात बंद करणारे कॅमरापर्सन अनमित्रा चकलादार सांगतात, "गेट नंबर एकवर एका अतिरेक्याला ठार केल्यानंतर दुसऱ्या एका अतिरेक्याने आम्हा पत्रकारांवर गोळीबार सुरू केला."
 
"यातली एक गोळी न्यूज एजेन्सी एएनआयचे कॅमेरापर्सन विक्रम बिष्ट यांच्या मानेला लागली. दुसरी गोळी माझ्या कॅमेऱ्याला लागली. आमच्या जवळच एक ग्रेनेडही येऊन पडला. मात्र, त्याचा स्फोट झाला नाही. संध्याकाळी चार वाजता सुरक्षादलांनी येऊन आमच्यासमोर तो निकामी केला."
 
मोठ्या संख्येने सुरक्षादलांना पाचारण
गंभीर जखमी झालेल्या एएनआयच्या कॅमेरापर्सनला एम्समध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर चारही अतिरेकी गेट नंबर चारकडे वळले. दरम्यानच्या काळात तीन अतिरेक्यांना ठार करण्यात आलं. पाचव्या अतिरेक्याने गेट नंबर पाचमधून सभागृहाच्या आत घुसण्याच्या प्रयत्न केला. पण, जवानांनी त्यालाही ठार केलं. देशाच्या संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक आणि अतिरेकी यांच्यात सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेली ही चकमक संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू होती. संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान मोठ्या संख्येने सुरक्षादलांचे जवान संसद परिसरात आले आणि त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच जवान, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची एक महिला सुरक्षारक्षक, राज्यसभा सचिवालयाचे दोन कर्मचारी आणि एका माळ्याचा मृत्यू झाला.
 
अफजलला फाशी
भारतीय संसदेवरील हल्ला प्रकरणात चार अतिरेक्यांना अटक झाली. दिल्लीच्या पोटा न्यायालयाने 16 डिसेंबर 2002 रोजी मोहम्मद अफजल, शौकत हुसैन, अफसां आणि प्रोफेसर सैयद अब्दुल रहमान गिलानी असे चौघे दोषी असल्याचा निकाल दिला.
 
सर्वोच्च न्यायालयाने प्रोफोसर सैयद अब्दुल रहमान गिलानी आणि नवज्योत संधू उर्फ अफसां गुरू यांना सोडलं. मात्र, मोहम्मद अफजलची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. शौकत हुसेनची फाशीची शिक्षा कमी करत त्याला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरूला दिल्लीच्या तिहार तुरुंगात सकाळी 8 वाजता फाशी देण्यात आली.