गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मंत्रिमंडळ विस्तार : उद्धव ठाकरे सरकारवर घराणेशाहीची छाप, 21 मंत्री राजकीय कुटुंबाशी संबंधित

उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी (30 डिसेंबर) पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
 
या शपथविधीनंतर माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर 'बाप-बेटे की सरकार' अशी प्रतिक्रियाही उमटली. पण नीट पाहिलं तर हे बाप-लेकाचंच नाही, तर भाचे, पुतणे, लेकी यांचंही सरकार असल्याचं दिसतंय. कारण शपथ घेतलेल्या 43 आमदारांपैकी 21 जण हे राजकीय कुटुंबांशी संबंधित आहेत.
 
घराणेशाहीच्या मुद्यावरून राजकीय पक्ष एकमेकांना लक्ष्य करत असतात. मात्र नव्या मंत्रिमंडळाकडे पाहिल्यानंतर घराणेशाहीपासून कोणताही पक्ष अपवाद नसल्याचंच दिसून येतंय.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र. बाळासाहेबांनीच उद्धव यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी नियुक्ती केली.
 
आता नवीन मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आहेत. आदित्य यांच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील व्यक्तीने पहिल्यांदाच निवडणूक लढवली. आदित्य वरळी मतदारसंघातून निवडून आले. मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे.
 
अर्थात, पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात असण्याची देशातील ही पहिलीच वेळ नाही. तामिळनाडूत करुणानिधी-स्टॅलिन, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू-नारा लोकेश, पंजाबमध्ये प्रकाशसिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल, तेलंगणात के.चंद्रशेखर राव आणि के.टी. रामा राव तर हरयाणात देवीलाल आणि रणजित सिंह चौटाला या पितापुत्रांनी एकत्र काम केलं आहे.
महाकुटुंब आघाडी
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार आहेत. अजित हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे पुतणे आहेत. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र हे सरकार तीन दिवस टिकलं.
 
अवघ्या दीड महिन्यात अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि आता उद्धव ठाकरे अशा चार मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री होण्याचा दुर्मीळ योग अजित पवार यांनी जुळवून आणला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असणाऱ्या बारामतीतून अजित पवार यंदा सलग सातव्यांदा निवडून आले. अजित पवार 1,65,265 इतक्या प्रचंड मताधिक्याने सलग सातव्यांदा निवडून आले.
 
उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मंत्रिपदाची शपथ घेणारे जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील हे आमदार आणि मंत्री होते. सहकाळ चळवळीतील एक अग्रणी नाव म्हणून राजारामबापू पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. 1962 ते 1970 या काळात राजारामबापू पाटील हे मंत्री होते.
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. बाळासाहेबांचे वडील भाऊसाहेब थोरात आमदार होते. सहकार क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये भाऊसाहेब थोरातांचं नाव घेतलं जातं.
 
विश्वासदर्शक ठरावावेळी प्रोटेम स्पीकर म्हणून कामकाज पाहिलेले दिलीप वळसे-पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे-पाटील हेसुद्धा आमदार होते. बाळासाहेब पाटील यांचे वडील पी.डी. पाटीलही आमदार होते.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असणार आहेत. अशोक यांचे वडील शंकरराव चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते भारताचे माजी अर्थमंत्रीही होते.
 
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीने शपथ घेतली तेव्हा सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. काही तासातच राष्ट्रवादीच्या गोटात परतलेल्या शिंगणे यांनी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून त्यांनी घडलेला प्रसंग कथन केला.
 
या राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी (30 डिसेंबर) कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे वडील भास्करराव शिंगणे हेही आमदार होते. आमदारकीचा वारसा त्यांनी कायम राखला.
 
याआधीही मंत्रिपदाचा कारभार पाहिलेल्या राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राजेश टोपे हे पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांचे वडील वडील अंकुशराव टोपे खासदार होते. जालना जिल्ह्यात त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली होती.
 
नवीन पिढीतले वारसदार
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख मंत्रिमंडळात असणार आहेत. अमित यांनी यापूर्वी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. आता उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री असतील.
 
विशेष म्हणजे अमित यांचे धाकटे बंधू धीरज हेसुद्धा यावेळी आमदार म्हणून निवडून आले आहेत.
 
भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावाबहिणींमधली लढत सगळ्यात चर्चित लढतींपैकी एक होती. धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षेनेते म्हणूनही काम पाहिलं होतं. उद्धव यांच्या मंत्रिमंडळात ते आता कॅबिनेट मंत्री असतील.
 
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये सक्रिय असून दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
 
प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आमदार जयंत पाटील यांचे ते भाचे असून माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव आहेत.
 
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये सक्रिय असून दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
 
सोमवारी शपथ घेणारे विदर्भातील आमदार सुनील केदार यांचे वडील बाबासाहेब केदार हे राज्याचे माजी मंत्री होते. आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्या कन्या यशोमती ठाकूर यांनीही सोमवारी शपथ घेतली.
 
काँग्रेसच्या खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी यंदाही निवडणुकीत बाजी मारली. वर्षा नव्या मंत्रिमंडळाचा भाग असणार आहेत. माजी मंत्री आणि राज्यपाल डीवाय पाटील यांचे पुत्र सतेज पाटील उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असतील.
 
आमदार पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हेसुद्धा उद्धव यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असतील. माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराजे देसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
 
अपक्ष आमदार शंकरराव गडाख हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत.
 
घराणेशाही ही अपरिहार्यता?
राजकारणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घराणेशाही का दिसून येते याबद्दल बोलताना लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी म्हटलं, की घराणेशाही ही आता एका पक्षापुरती मर्यादित नाहीये. जे पक्ष पूर्वी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करायचे, त्या प्रत्येक पक्षात कमी-अधिक फरकानं घराणेशाही पहायला मिळते."
 
"राजकारणात प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे हितसंबंध मोठ्या प्रमाणावर गुंतलेले असतात. अशावेळी बाहेरच्या व्यक्तीकडे सूत्रं सोपविण्यापेक्षा घरातल्याच विश्वासू, सर्वांत जवळच्या व्यक्तीकडेच जबाबदारी दिली जाते. गेल्या काही वर्षांत सर्वच पक्षात ही गोष्ट दिसून आली आहे. " प्रधान सांगतात.