बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, अजित पवार उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा सोहळा झाला.

11.07:साडेबारा वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं अधिकृत स्टेटमेंट येईल- सुप्रिया सुळे
 
शरद पवार, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांची बैठक होईल. त्यानंतर ते साडेबारा वाजता अधिकृत भूमिका मांडली जाईल आणि त्यानंतर मी माध्यामंशी बोलेन असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
11.04: पक्ष आणि कुटुंबात फूट- सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस
11.03: अजित पवारांबरोबर गेलेले आमदार शरद पवारांना भेटले- नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
 
'आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राचा गैरवापर. बैठकीला उपस्थितीसाठी हजेरीचं पत्र पाठिंब्याचं म्हणून वापरण्यात आलं. काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.
 
10.45: शिवसेनेनं युतीचा घोर अपमान केला- प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री
 
'देवेंद्र फडणवीस यांचं मन:पूर्वक अभिनंदन. राज्यात जे पंधरा दिवस चाललं होतं ते शिवसेनेचं विश्वासघात राजकारण. शिवसेनेने भाजपबरोबर युती करून मतं मागितली. आम्ही चांगलं सरकार चालवू असा प्रचार केला. काँग्रेससोबत जाण्याचं पाप त्यांनी केलं.
 
ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला. त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राष्ट्रवादीबरोबर ते गेले तर चांगलं, राष्ट्रवादी आमच्याबरोबर आलं तर वाईट असं राजकारणात होत नाही. युतीचा घोर अपमान शिवसेनेने केला', असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

10.42: काँग्रेसची मुंबईत तातडीची बैठक
 
आज घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने बैठक बोलावली आहे. या बैठकीला मल्लिकार्जून खर्गे, के. सी. वेणूगोपाल हे ज्येष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत
 
10.40: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनोद तावडे यांच्या ट्वीटरवरून शुभेच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासपर्व उंचावत राहील असा विश्वास वाटतो. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन:पूर्वक शुभेच्छा. राज्याच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस. वैयक्तिक मतभिन्नतेपेक्षा राज्यातल्या जनतेचं कल्याण महत्वाचं', असं भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
 
10.34: मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
10.28: भाजपाला जनादेश होता त्याचा सन्मान झाला- पंकजा मुंडे, भाजपा नेत्या
'राज्याला अस्थितरेमधून बाहेर पडणं अत्यंत आवश्यक होतं. ते केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. पुन्हा मुख्यमंत्रिपदी आल्याबद्दल आनंद आणि मनापासून अभिनंदन. भाजपला जनादेश होता त्याचा सन्मान झाला', असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
 
10.12:बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देवेंद्र फडणवीस सरकारला देण्यात आली आहे.
 
10.00: भाजपच्या आमदारांची उद्या बैठक
भाजपच्या विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार, अपक्ष, सहकारी यांची बैठक वसंत स्मृती, दादर इथे रविवारी तीन वाजता होणार असल्याचं चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
09.58: छ. शिवाजी महाराजांनी प्रशासन कसं करायची याची प्रेरणा आणि दिशा दिली- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला प्रेरणा दिली. त्यांनी आम्हाला प्रशासन कसं करावं याची दिशा दिली, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
 
09.52: संजय राऊत तुम्ही शिवसेनेची वाट लावलीत- चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष, भाजप
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, "24 ऑक्टोबरला निकाल लागेल. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला. 144 जागा लागतात. 164 मिळाले. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. एकदाही चर्चा केली नाही. सगळे पर्याय खुले असं म्हटलं.
शिवसेनेचे नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली. जनतेने खेळ पाहिला. भाजपने शिवसेनेची साथ नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. शिवसेनेला निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांचं तोंड फुटलं. प्रेम आणखी वाढत गेली. 80 टक्के जनता त्रस्त आहे.
 
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, सावरकरांना भारतरत्न देण्याचा पर्याय सोडला, शिव नाव सोडलं. पाठीत तुम्ही खंजीर खुपसलात. आम्ही मातोश्रीची गरिमा राखली. उद्धवजींना सिल्व्हर ओकला जावं लागलं. हॉटेलवर जावं लागलं. बाळासाहेब थोरात यांना भेटाय. संजय राऊत, तुम्ही महाराष्ट्राची आणि शिवसेनेची वाट लावलीत."
 
09.48: राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याचे माहिती नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
 
09.45: मला सुरुवातीला फेक न्यूजच वाटली- अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेस प्रवक्ते
 
महाराष्ट्रात जे घडतंय ते अविश्वसनीय आहे. मला सुरुवातीला ही फेक न्यूज वाटली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकासआघाडीची चर्चा खूप लांबली. तीन दिवसांच्या वर ही चर्चा जायला नको होती. फास्ट मूव्हर्सने ही जागा भरून काढली., असं ट्वीट अभिषेक मनू सिंघवी यांनी केलं आहे.
 
09.42: सरकार स्थापन करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही- संजय राऊत
 
आज अजित पवार यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन करणं हा शिवसेनेला दगाफटका नाही. शिवरायांच्या विचारांना फटका. जनता माफ करणार नाही. आयुष्यभर तडफडत राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
09.35: अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे- संजय राऊत
 
अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तुरुंगात जावं लागू नये म्हणून भीतीपोटी हा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
ते म्हणाले, "अजित पवार काल रात्री आमच्याबरोबर होते. पण बैठकीत आमच्या नजरेला नजर भिडवत नव्हते. हे शरद पवार साहेबांच्या लक्षात येत होतं. ते अचानक बाहेर पडले. त्यांचा फोन बंद झाला. वकिलाकडे बसले होते असं सांगण्यात आलं. शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात वातावरण निर्माण झालं. तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला. तेव्हात त्यांच्या मनात काळंबेरं आहे हे लक्षात आलं. अजित पवारांना फोडण्याचा निर्णय झाला त्याला जनता उत्तर देईल.
 
काका-पुतण्यांच्या या 7 जोड्यांमध्ये पडलीय ठिणगी...
अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसेल. अजित पवारांची जागा ऑर्थर रोड जेलमध्ये असल्याचं म्हटलं होतं. दबाव आणून अजित पवार आणि काही आमदारांना फोडलं. महाआघाडी स्थापन करत होतो त्या स्थापनेमुळे या देशातलं वातावरण बदलणार होतं.
 
हा राजभवनाचा गैरप्रकार आहे. रात्रीच्या अंधारात पाप होतं. चोरून डाका घातला जातो. राज्याचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताय मग दिवसाढवळ्या का घेतली नाही. तुम्ही पाप केलंय, तुम्ही चोरी केलेय, तुम्ही डाका घातलाय, जनतेला फसवलंय, याची किंमत चुकवावी लागेल. शिवसेना खंबीर आहे.
 
उद्धव ठाकरे आणि शरद ठाकरे भेटतील. या वयात शरद पवारांसारख्या मोठ्या नेताला दगा देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. काहीतरी चांगलं घडत असताना स्वाभिमाला तडा. हे सर्व पडद्यामागून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून करण्यात आलं आहे. हे पाप ठोकरून लावण्याशिवाय राहणार नाही. "
 
09.27: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चेसाठी फार वेळ घेतला- अभिषेक मनू सिंघवी
 
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना चर्चेने खूप वेळ घेतला. ही संधी फास्ट मूव्हर्सने भरून काढली असं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं आहे.
 
09.26 : अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा नाही- शरद पवार
 
भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे.
09.25: अमृता फडणवीस यांनी केलं अभिनंदन
 
राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तुम्ही करून दाखवलंत! असं त्यांनी लिहिलं आहे.