सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (12:38 IST)

‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो? त्याचा इतका वापर का होतोय?

ऋजुता लुकतुके
औषधाच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा आणि औषधाचा एक डोस मिळवण्यासाठी उडालेली झुंबड, असं चित्र मागचा आठवडाभर काही औषधांच्या दुकानांबाहेर दिसत होतं. ही रांग रेमडेसिवीर या औषधासाठी होती. कोव्हिड 19 रुग्णांसाठी हे औषध वापरलं जात आहे.
 
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग आणि त्यामुळे रुग्णसंख्या इतकी वाढत आहे की, रेमडेसिविरची मागणीही वाढलीय. अखेर राज्यभर या औषधाचा तुटवडा निर्माण होऊन ही परिस्थिती ओढवली आहे.
 
अखेर केंद्र सरकारने आता रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
पण जागतिक आरोग्य संघटनेनं ऑक्टोबर 2020 मध्ये रेमडेसिवीर हे औषध कोरोना रुग्णांचा जीव वाचवत नाही असा निर्वाळा दिला असताना, मुळात आपल्याकडे त्याचा इतका वापर का होत आहे? आणि खरंच रेमडेसिवीरमुळे रुग्णांचा जीव वाचतो का?
 
रेमडेसिवीर आहे तरी काय?
कोव्हिड 19 आजार नवीन होता तेव्हा उपचार पद्धती विकसित करताना रेमडेसिवीर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, डेक्झामेथेसॉन अशा अनेक औषधांचा जागतिक पातळीवर विचार झाला. वेगवेगळ्या देशात तिथल्या आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने या औषधांचा वापरही केला गेला.
 
वेगवेगळ्या वळणांवर काही औषधं उपयुक्त ठरली तर काहींचा फायदा होत नसल्याचंही सिद्ध झालं. यातलंच एक महत्त्वाचं औषध म्हणजे रेमडेसिविर.
रेमडेसिवीर हे अँटी व्हायरल (विषाणूवर मात करणारं) औषध आहे
इबोला या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी ते विकसित करण्यात आलं
कोरोनाच्या सुरुवातीच्या उद्रेकावेळी लक्षणं कमी करण्यात ते प्रभावी ठरत असल्याचा निर्वाळा अमेरिकन संस्थांनी दिला होता.
पण, त्याची किंमत एका डोससाठी 1,100 ते 1,400रु इतकी जास्त आहे
पुढे जागतिक आरोग्य संघटनेनं आणि अनेक आरोग्य संस्थांनी विविध देशांत कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवर अभ्यास सुरू केला आणि कुठलं औषध गुणकारी आणि परिणामकारक ठरतं यावर संशोधन सुरू झालं.
 
ऑक्टोबर 2020मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं रेमडेसिविरबद्दल एक सविस्तर अहवाल सादर केला. यात 'कोव्हिड रुग्णांचा जीव वाचवण्याच्या बाबतीत हे औषध खूपच कमी, म्हणजे अगदी नगण्य परिणामकारक' असल्याचा निर्वाळा दिला होता. उपयोगाच्या मानाने किंमत जास्त असल्याचा ठपकाही ठेवला होता.
 
जगातील 30 देशांमध्ये 500च्या वर रुग्णालयांत 11,266 रुग्णांचा अभ्यास करून आरोग्य संघटनेनं आपलं मत मांडलं आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेमडेसिविर फारसं प्रभावी ठरत नसल्याचं त्यांचं मुख्य निरीक्षण होतं. शिवाय, रुग्णालयातलं वास्तव्य कमी करण्यातही औषधाला फारसं यश मिळालं नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं.
 
मग रेमडेसिविरचा वापर का होतोय?
भारतात हे औषध कधी वापरायचं याबद्दल आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्व घालून देण्यात आली आहेत. गंभीर रुग्णाचा ताप कमी होत नसेल तर हे औषध वापरण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे.
 
त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही रेमडेसिविरचा गैरवापर किंवा अतीवापर टाळावा असाच विचार वारंवार बोलून दाखवला आहे.
जालना इथं एका पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी, 'रेमडेसिविरचा परिणामकारक, प्रभावी वापर ही राज्यसरकारची पुढच्या 15 दिवसांतील प्राथमिकता आहे. रेमडेसिविरचा साठा हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत करण्यात येईल आणि खाजगी रुग्णालयांना गरज पाहूनच साठा वितरित करण्यात येईल. गरज नसताना या औषधाचा वापर झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत,' असं बोलून दाखवलं आहे.
 
आता असं असताना रेमडेसेविरचा वापर का होतोय, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. त्यासाठी बीबीसी मराठीने संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती गिलडा यांच्याशी संपर्क साधला.
 
कोरोनावर अजून कुठलंही औषध नाही. त्यामुळे रेमडेसिविर हे कोरोनावरचं औषध नाही, हे डॉ. गिलडा यांनीही मान्य केलं.
 
'जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, रेमडेसिविरचा अतिवापर टाळला पाहिजे. पण, भारतात रुग्णाला सौम्य, नियमित किंवा गंभीर कुठलीही लक्षणं आढळली तरी रेमडिसिविरचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे अगदी गंभीर आजार असलेल्या रुग्णांना जेव्हा गरज लागते तेव्हा औषध उपलब्ध होत नाही. फक्त विशिष्ट प्रकारच्या गंभीर आजारी असलेल्या रुग्णासाठीच रेमडेसिविरचा वापर झाला पाहिजे,' डॉ गिलडा यांनी सांगितलं.
 
रेमडेसिविर कधी वापरायचं?
मग रेमडेसिवीरचा वापर नेमका कधी करायचा? अनेक सरकारी रुग्णालयांमध्येही कोरोनाच्या उपचार पद्धतीत रेमडेसिविरचा समावेश केला आहे. पण, वापर कुठे आणि कसा होतोय हे आम्ही मुंबईतल्या जे जे रुग्णालयाचे औषधवैद्यकशास्त्राचे प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्याकडून जाणून घेतलं.
"कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसाला होतो. HRCT ही चाचणी करून हा संसर्ग किती वाढला आहे हे तपासलं जातं. त्याचा स्कोअर असतो. 25 पैकी 5 पर्यंतचा स्कोअर हा गंभीर मानला जात नाही. पण 6 च्या पुढचा स्कोअर आला म्हणजे संसर्ग जास्त आहे. अधिक संसर्ग असणाऱ्या या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. यामध्ये वयाची अट नाही. ज्यांना संसर्ग अधिक त्यांना हे इंजेक्शन दिलं जातं,'' डॉ. गायकवाड यांनी सांगितलं.
 
रुग्णाचा ताप आटोक्यात येत नसेल तर अँटी व्हायरल म्हणून चौथ्या ते सातव्या दिवसापर्यंत हे औषध दिलं जातं, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
 
महाराष्ट्रात सध्या रेमडेसिविरचा इतका वापर होत आहे की, औषध काळा बाजारात दाम दुपटीने विकत घेतलं जात आहे. पण, राज्यसरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावलं उचलली आहेत. औषधाची किंमत 1100 ते 1500 पर्यंत ठरवून देण्यात आली आहे. आणि औषधाचा साठाही सरकारकडून नियंत्रित करण्यात येत आहे.
 
इथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयातून या औषधाचा साठा सरकारी रुग्णालयांसाठी गरजेनुसार, वितरित होईल. यामुळे औषधाचा गैरवापर आणि काळा बाजार दोन्हीवर नियंत्रण बसवण्याचा सरकारचा मानस आहे.