सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (18:30 IST)

शेतकरी आंदोलन : चर्चेची नववी फेरी संपली, 19 जानेवारीला पुढची बैठक

आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार मधील चर्चेची नववी फेरी ठोस तोडग्या विना संपली आहे.
 
सरकारला तिन्ही कायदे मागे घ्यावे लागतील. आता चर्चेची पुढची फेरी 19 जानेवारीला पार पडेल. हमी भावाच्या कायद्या विषयीही या बैठकीत काही तोडगा निघाला नसल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
 
"नवीन शेती कायदे मागे घेण्याविषयी सरकारनं काहीही चर्चा केलेली नाही. सरकार पहिलया बैठकीत जे म्हणज होतं, तेच आजही म्हणत आहे," असं शेतकरी नेते दर्शन पाल सिंग यांनी म्हटलं आहे.
 
"शेतकरी नेत्यांशी झालेली आजची चर्चा तोडग्याविनाच संपली आहे. पुढची बैठक 19 जानेवारीला होईल. संवादातून प्रश्न सोडवण्याची आम्हाला आशा आहे. थंडीच्या वातावरणात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारला चिंता वाटते," असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे.
 
शेती कायद्यांचं आयएमएफकडून कौतुक
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेती सुधारणेसाठी महत्त्वाचे आहेत असं कौतुक आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणे निधीने केले आहे. हे वृत्त पीटीआयने दिले आहे.
 
ज्या लोकांवर याचे विपरित परिणाम होणार आहेत त्यांच्या हितरक्षणासाठी पुरेशी पावलं उचलली पाहिजेत असेही आयएमएफने सांगितले आहे. आयएमएफचे संवाद संचालक गॅरी राइस यांनी हे सांगितले आहे.
 
नव्या शेती कायद्यांमुळे मध्यस्थांची भूमिका कमी होईल आणि व्यवहार अधिक पारदर्शी होतील. असे ते म्हणाले.
 
आतापर्यंत झालेल्या आठ फेऱ्यांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. तिन्ही कायदे सरकारने मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
 
त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकाने कृषी कायद्यातील दुरुस्तीचे प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवले पण त्यावर शेतकरी संघटनांचं समाधान झालं नाही.
 
सिंघु सिमेवर 51 व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. गुरुवारी शेतकरी नेते भूपिंदर मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या समितीमधून माघार घेतली आहे.
 
केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना स्थगिती देत त्यावर विविध पक्षांशी चर्चा करण्यासाठी अनिल घनवट, भूपिंदर सिंह मान, अशोक गुलाटी आणि डॉ. प्रमोद कुमार जोशी अशा चार तज्ज्ञांच्या समितीची स्थापना सुप्रीम कोर्टाने स्थापन केली होती.
 
भूपिंदर सिंह मान भारतीय किसान युनियनसोबत जोडलेले आहेत. कृषीतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. यासोबतच ते अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार आहेत.
 
मान यांचा जन्म 1939 साली गुजरांवालामध्ये (आता पाकिस्तानमध्ये) झाला. शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर सातत्याने संघर्ष केल्याबद्दल 1990 साली राष्ट्रपतींकडून त्यांची शिफारस राज्यसभेसाठी करण्यात आली.
 
1966 साली स्थापन करण्यात आलेल्या 'फार्मर फ्रेंड्स' असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य आहेत. पंजाबमध्ये ही संघटना पंजाब-खेती-बाडी युनिअन या नावाने ओखळली गेली.