गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2019 (11:11 IST)

भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप 2019: कॅप्टन सर्फराझ अहमदची जांभई आणि नेटिझन्स जागे झाले...

स्टंप्समागे विकेटकीपिंग करत असलेला पाकिस्तानचा कॅप्टन सर्फराझ अहमदच्या जांभयांनी नेटिझन्सची झोप उडवली आणि ते कामाला लागले.
 
जांभई देणं हे नेहमीच झोपेचं, झोप झाली नसल्याचं, आळसाचं, शैथिल्याचं, संथपणाचं प्रतीक मानलं जातं.
 
जांभईसारख्या प्रतिक्षिप्त क्रियेबाबत फारशी चर्चाही होत नाही, कारण जांभईची भावना मनात येऊन ती देण्याचा अवधी एकदम झटपट संपतो. परंतु भारत-पाकिस्तान मॅच एका खास जांभईमुळे चर्चेत आहे.
 
भारतीय बॅट्समन 300 धावांच्या डोंगराकडे वाटचाल करत असताना पाकिस्तानचा कॅप्टन आणि विकेटकीपर सर्फराझ अहमद विकेट्समागे जांभया देत होता.
 
स्टेडियमवर कार्यरत तीसपेक्षा अधिक कॅमेऱ्यांपैकी एकाने सर्फराझचं आळसावलेपण चाणाक्षपणे टिपलं आणि जगाला दाखवलं.
 
हे फुटेज जाहीर होण्याचा अवकाश. बघता बघता सर्फराझच्या जांभया सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर व्हायरल झाल्या.
 
भारत-पाकिस्तान मॅच ही वर्ल्ड कपमधली सगळ्यात बहुचर्चित मॅच. केवळ दोन्ही देशांचे नव्हे तर जगभरातल्या चाहत्यांचं या मॅचकडे लक्ष असतं. दोन्ही देशातील संबंध दुरावल्याने भारत-पाकिस्तान यांच्यात थेट मालिका होत नाही. यामुळे फक्त ICC स्पर्धांमध्येच हे दोन देश समोरासमोर येतात. म्हणजेच वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा आशिया कप.
 
प्रेक्षकसंख्येचे नवनवे विक्रम रचणाऱ्या या हाय व्होल्टेज मॅचमध्ये एखाद्या टीमचा कॅप्टन वारंवार जांभया देईल अशी कल्पना कोणी नसेल. परंतु सर्फराझ जांभई किंग ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सगळ्या लढती गमावल्या आहेत. त्यात यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. अशा परिस्थितीत भारताविरुद्धचा सामना म्हणजे पाकिस्तानसाठी करो या मरोची परिस्थिती.
 
या मॅचवर पावसाचं सावट होतं. पावसाने उघडीप दिली आणि भारतीय संघाने तीनशे पल्याड जात दमदार सुरुवात केली.
 
सर्फराझनेच टॉस जिंकून भारताला बॅटिंगचं निमंत्रण दिलं. ढगाळ वातावरणात बॉल स्विंग होईल, मॉइश्चरचा फायदा आपले बॉलर्स उचलतील या विचाराने सर्फराझने बॉलिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्ससमोर टीम इंडियाची नवी ओपनिंग पेअर रोहित शर्मा-के.एल. राहुल होती. एकमेकांबरोबर कधीही न खेळलेल्या ओपनिंग पेअरला लक्ष्य करण्याची संधी पाकिस्तानकडे होती. मात्र त्यांनी ती गमावली.
 
रोहित शर्मासारख्या कसलेल्या बॅट्समनला शॉर्ट आणि वाईड बॉलचा मारा करत त्यांनी स्थिरावण्याची संधी दिली. रोहित इनिंग्ज उभारत असताना शाळकरी लेव्हलचा रनआऊट सोडला. हे जीवदान पाकिस्तानला चांगलंच महागात पडलं.
 
पाकिस्तानने या मॅचसाठी शदाब खान आणि इमाद वासिम या फिरकीपटूंना संघात घेतलं. स्पिनचा चांगला सामना करणाऱ्या टीम इंडियाच्या बॅट्समननी या दोघांची पर्वा केली नाही. एकूणात मोहम्मद आमिरचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या बॉलर्सनी निराशा केली. रोहित शर्माने ठेवणीतलं शतक झळकावलं तर राहुल आणि कोहली यांनी अर्धशतकी खेळी करत रोहितच्या खेळीवर कळस चढवला.
 
बॉलर्स दिशाहीन बॉलिंग करत असताना, फील्डिंग सुमार होत असताना कॅप्टनने संघांचं मनोधैर्य उंचावण्याची गरज असते. अन्य मॅचेसमध्ये स्टंप्सच्या पाठून सर्फराझचं वाक्चातुर्य ऐकायलाही मिळतं. मात्र आजच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मोटिव्हेशनची गरज असताना कॅप्टनच्या जांभया पाहायला मिळाल्या.
 
पाकिस्तान संघासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीटच्या माध्यमातून सल्ले पुरवले होते. वाचा ते पाच सल्ले इथे
 
1992 मध्ये इम्रान यांच्या नेतृत्वामध्येच पाकिस्तानने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. इम्रान यांनी टॉस जिंकून बॅटिंगचा सल्ला दिला होता. इम्रान यांनी अष्टपैलू खेळाडूंऐवजी स्पेशालिस्ट खेळाडूंवर भर देण्यास सुचवलं होतं. मात्र सर्फराझने तो सल्लाही मानला नाही.
 
खूप कंटाळा आल्यानंतर किंवा समोर कंटाळवाणा पिक्चर किंवा तत्सम काही सुरू असेल तर जांभया अनावर होतात. वर्ल्ड कपचं व्यासपीठ आहे, पारंपरिक प्रतिस्पर्धी समोर आहेत, पावसाळी ढगाळ वातावरण दाटलं आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी स्टेज सेट असताना बॉलर्स आणि फिल्डर्सची सर्वसाधारण कामगिरी पाहून सर्फराझला जांभया आवरेना असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
 
सुरक्षेच्या कारणांमुळे बहुतांशी देश पाकिस्तानात मॅच खेळण्यासाठी जात नाहीत. यामुळे पाकिस्तानच्या मॅचेस तटस्थ ठिकाणी होतात. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांना मिळतच नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नाही.
 
अंतर्गत बंडाळ्या हे तर पाकिस्तान क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. सर्फराझच्या नेतृत्वात गोष्टी बदलतील अशी आशा होती. कीपिंग आणि बॅटिंग दोन्ही आघाड्या सांभाळणाऱ्या सर्फराझवर अनेकबाजूंनी दबाव आहे. जांभया प्रकरणाने सर्फराझची आणखी नाचक्की होत आहे.