बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (17:52 IST)

IndvsAus : 'टीम इंडियाचा 4-0 असा सपशेल धुव्वा उडेल' म्हणणाऱ्यांना चपराक

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अॅडलेड टेस्ट मध्ये 36 रन्समध्ये ऑलआऊट झाल्यानंतर टीम इंडियावर माजी खेळाडू आणि समीक्षकांनी टीकेची झोड उठवली होती.
 
भारतीय संघाचा मालिकेत 4-0 असा धुव्वा उडेल असं भाकीत अनेक माजी खेळाडूंनी वर्तवलं होतं. टीम इंडियाने या टीकेचा विचार न करता कृतीतून उत्तर देत ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला.
 
टीका करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार, इंग्लंडचे माजी कर्णधार, माजी खेळाडू यांचा समावेश होता.
 
कोण काय म्हणालं होतं?
 
विराट कोहली शिवाय पुढच्या दोन टेस्टसाठी भारतीय बॅटिंग तग धरू शकेल का? अॅडलेड टेस्ट गमावल्यानंतर ते संकटात सापडले आहेत - मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार
 
टीम इंडियाला व्हाईटवॉश मिळण्याची शक्यता दिसते. कर्णधार कोहली मायदेशी परतला आहे. अॅडलेडमधल्या मानहानीकारक पराभवानंतर संघाला सावरू शकेल असं कुणीच दिसत नाही - रिकी पॉन्टिंग, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार
 
अॅडलेडमधल्या दारुण पराभवानंतर टीम इंडिया कसं पुनरागमन करणार? मला तरी ते शक्य वाटत नाही. ऑस्ट्रेलिया ही मालिका 4-0 फरकाने जिंकू शकते - मार्क वॉ, ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू
 
अॅडलेडमध्ये नामुष्की.टीम इंडिया या मालिकेत 4-0 अशी सपशेल पराभूत होईल- मायकेल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार
 
टीम इंडियाला जिंकण्याची संधी अॅडलेडमध्ये होती. या टेस्टमध्ये त्यांच्यावर नीचांकी धावसंख्येची नामुष्की ओढवली. इथून पुढे ते मालिकेत पुनरागमन करू शकतील असं वाटत नाही - ब्रॅड हॅडिन, ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू
 
ऋषभ पंतच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियावर तीन विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवला. ऋषभ पंतने नाबाद 89 करत टीम इंडियाला खळबळजनक विजय मिळवून दिला.
 
या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशी जिंकली.
 
तब्बल 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन इथे टेस्ट मॅच गमावली आहे.
 
ब्रिस्बेन टेस्टमध्ये पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर 98 ओव्हर्समध्ये 324 रन्सचं लक्ष्य होतं. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी दिमाखदार विजय साकारला.
 
अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात टीम इंडियाचा 36 रन्समध्येच खुर्दा उडाल्याने मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
 
यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 आघाडी घेतली. पॅटर्निटी लिव्हसाठी कर्णधार विराट कोहली या मॅचनंतर मायदेशी परतला. फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.
 
चार बदल आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने मेलबर्न टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. अजिंक्य रहाणेची शतकी खेळी या विजयाचं वैशिष्ट्य ठरली. मोहम्मद सिराजने पदार्पणात पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स पटकावल्या.
 
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रेक्षकां कडून शेरेबाजी होत असल्याची तक्रार केली. भारतीय संघ व्यवस्थापनाने मॅच रेफरींकडे यासंदर्भात तक्रार केली.
 
सिडनी इथे झालेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने चिवटपणे प्रतिकार करत टेस्ट अर्निणित राखली. रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी यांनी दुखापतग्रस्त असतानाही साडेतीन तास किल्ला लढवत टेस्ट अनिर्णित राखली.
 
दुखापतग्रस्तांची संख्या वाढतच गेली आणि ब्रिस्बेन टेस्ट मध्ये टीम इंडियाला फिट अकरा खेळाडू उभे करता येतील का अशी शक्यता सुद्धा निर्माण झाली होती.