सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (16:42 IST)

निर्भया प्रकरणः दोषी ठरलेल्या अक्षयची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक अक्षय ठाकूर याची याचिका फेटाळली आहे. बुधवारी सकाळी न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या एका खंडपीठाने अक्षयच्या याचिकेवर सुनावणी घेतली.
 
न्यायाधीश भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती न्यायाधीश बोपण्णा यांचा समावेश आहे.
 
कोर्टात मांडली बाजू
सुनावणीच्या वेळेस दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडण्यासाठी 30-30 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.
 
अक्षय ठाकूरचे वकील एपी सिंग यांनी कोर्टात पूर्ण याचिका वाचून दाखवली. निर्भयाच्या मित्राने पैसे घेऊन टीव्ही वाहिन्यांना मुलाखती दिल्या, त्यामुळे त्याच्यावर या खटल्यात मुख्य साक्षीदार म्हणून भरवसा टाकता येत नाही. त्यानंतर त्यांनी एका माजी जेलरच्या पुस्तकात दिलेल्या काही माहितीचा उल्लेखही केला.
 
अक्षय परिस्थितीने गरीब असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. तसंच त्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, असंही वकिलांनी सांगितलं. फाशी देऊन अपराध्याला संपवण्यात येईल, मात्र अशा प्रकारचे गुन्हे थांबणार नाहीत म्हणून त्याला फाशी देण्यात येऊ नये, असं ए. पी. सिंह यांनी सांगितलं.
 
त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा खटला फाशीची शिक्षा देण्यासाठी एकदम योग्य असल्याचं सांगितलं. तसंच ही केस 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' (अत्यंत दुर्मिळ) प्रकारात मोडते, असं स्पष्ट केलं. "दोषी व्यक्तीच्या बाजूने कोर्टात वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणून केवळ फाशीची वेळ टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांना कोणतीही सहानुभूत दाखवण्यात येऊ नये," अशी बाजू मेहता यांनी मांडली.
 
मंगळवारी झालेल्या सुनावणीत अक्षयच्या वकिलांनी सार्वजनिक आणि राजकीय दबावामुळे अक्षयला दोषी ठरवण्यात आलं आणि आता राजकीय लाभ मिळवण्यासाठी त्याला फाशी देण्याची घाई सुरू आहे, असं सांगितलं होतं.
 
या निकालानंतर आपण आणखी एक पाऊल न्यायाच्याजवळ गेलो आहोत, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने माध्यमांशी बोलताना दिली आहे.
 
अक्षय ठाकूरवरील आरोप काय?
34 वर्षांचा अक्षय ठाकूर मूळ बिहारचा आहे. घटना घडल्याच्या (16-17 डिसेंबर 2012) पाच दिवसांनंतर म्हणजेच 21 डिसेंबर 2012 रोजी त्याला बिहारहून अटक करण्यात आली होती.
 
त्याच्यावर बलात्कार, हत्या आणि अपहरण करण्याबरोबर पुराव्यांशी छेडछाड करण्याप्रकरणीचे आरोप होते.
 
अक्षय त्याच वर्षी दिल्लीत आला होता. दुसऱ्या एक दोषी विनय प्रमाणेच त्यानेही कोर्टात आपला बचाव करताना आपण बसमध्ये त्या रात्री नव्हतोच, असं सांगितलं होतं.