मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (19:17 IST)

कोरोना रुग्णांची संख्या वर-खाली, राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे दाटले ढग?

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात कठोर निर्बंध लादण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, "नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाही. हे अतिशय घातक आहे. यामुळे आपल्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्यात कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील."
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
 
त्यांनी म्हटलं, "कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन ते अडीच हजारांदरम्यान होती. ती आता 4 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, तिथं कडक पावलं उचलली पाहिजे.
 
"जर हे वेळेत केलं नाही, तर आता पाश्चिमात्य देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जावं लागतंय. हे नियंत्रण करू शकलो नाही तर मग लॉकडाऊनच्या निर्णयाला जावं लागतं. ते आपणाला जायचं नाहीये. अजिबात जायचं नाहीये, हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात कसा राहिल, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.
 
आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
 
याविषयी टोपे म्हणाले, जे अधिकारी ट्रेकिंग, टेस्टिंगमध्ये लक्ष देत नाही, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. सध्या नियम पाळले जात नाहीये, हे स्पष्ट दिसतंय. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले. मात्र, नियम पाळावे लागतील, जर नाही पाळले तर पाश्चिमात्य देशात लॉकडाउन सुरू झालाय, त्यामुळे लॉकडाउन आपल्यालाही करावं लागेल. मात्र, हे टाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल."
 
अमरावती जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. त्यात रविवारी 399 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजार 294 रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या 435 वर पोहचली आहे. अचानक वाढत्या कोरोना संक्रमणामुळं अमरावती करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.